नाशिक : नाशिक महानगरपालिकेने दि. २१ फेबु्रवारीपासून आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार अनधिकृत नळजोडण्या शोधून त्या बंद करणे व अनधिकृत व त्यास जबाबदार असलेले नळ कारागीर (प्लंबर) यांच्यावर दंडात्मक कारवाई करून पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदविण्याची धडक मोहीम हाती घेतली आहे.
शहरातील सर्व विभागातील पाणीपुरवठ्याचे अभियंते यांच्यामार्फत कारवाई सुरू असून आजमितीस १२९ अनधिकृत नळजोडण्या शोधून अनधिकृत नळजोडणी धारकांवर वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नाशिक पश्चिम विभागात सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये उपअभियंता ना. पश्चिम यांनी नितेश शहा, विनोद लुथरा, डॉ. विलास पाटील इ. अनधिकृत नळजोडणीधारकांवर गुन्हा दाखल केलेला आहे.
ही मोहीम यापुढेही धडकपणे सुरू राहणार असून नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अनधिकृत नळजोडणी/पाणी चोरीबाबत काही माहिती असल्यास त्याबाबत पाणीपुरवठा विभागास माहिती द्यावी. माहिती देणार्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे मनपातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.