भाजपच्याच काळात मुरबाडचा वेगाने विकास : खा. कपिल पाटील

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2018
Total Views |

पोटगाव-बिरवाडी पुलाचे भूमिपूजन

 
 
 
 
मुरबाड : “राष्ट्रीय महामार्गाच्या माध्यमातून मुरबाड आता महत्वाच्या शहरांना जोडले जाणार असून, भाजपच्याच कारकीर्दीत मुरबाड तालुक्याचा वेगाने विकास झाला,” असे प्रतिपादन भाजपचे खा. कपिल पाटील यांनी शुक्रवारी येथे केले.
 
कल्याण-माळशेज चौपदरी रस्त्याला तत्त्वतः मंजूरी मिळाली असून, मुरबाड तालुक्यातून जाणार्‍या ५४८ सी महामार्गाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लवकरच भूमिपूजन करण्यात येईल, अशी माहिती पाटील यांनी दिली. खा. कपिल पाटील व आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पोटगाव-बिरवाडी पुलाचे भूमिपूजन शुक्रवारी करण्यात आले. त्यावेळी खा.पाटील बोलत होते. पोटगाव-बिरवाडी येथे प्रकल्पग्रस्तांची वसाहत उभारण्यात आली आहे. मात्र, मुरबाडी नदीला पूर आल्यानंतर छोट्या पुलामुळे या गावाचा पावसाळ्यात संपर्क तुटत असे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे हाल होत असत. त्यामुळे या ठिकाणी मोठा पूल उभारण्याची मागणी केली होती. यासंदर्भात खा. कपिल पाटील व आ. किसन कथोरे यांनी एमआयडीसीकडे पाठपुरावा सुरू केला होता. अखेर या पुलाला एमआयडीसीने निधी मंजुरी दिल्यानंतर पुलाचे भूमिपूजन शुक्रवारी पूर्ण झाले.
 
या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेतील पंचायत समितीचे सभापती जनार्दन पादीर, उपसभापती सीमा घरत, माजी आ. दिगंबर विशे, जिल्हा परिषदेतील भाजपचे गटनेते उल्हास बांगर, सदस्य सुभाष घरत, पंचायत समितीचे सदस्य श्रीकांत धुमाळ, भाजपचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे, तालुकाध्यक्ष जयवंत सूर्यराव, भाजपच्या महिला आघाडीच्या अध्यक्षा शीतल तोंडलीकर, सुहास मोरे, मोहन सासे, सदाभाऊ सोमणे आदी उपस्थित होते.
 
मुरबाड तालुक्याचा विकास हे भाजपचे ध्येय आहे. त्या दृष्टिकोनातून तालुक्यात विकासकामे सुरू आहेत. तालुक्यातून वेगवान वाहतुकीसाठी लवकरच राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू होईल. तर कल्याण-माळशेज रस्त्याला मंजूरी मिळाली आहे. या संदर्भात डीपीआर (सविस्तर प्रकल्प आराखडा) नव्याने तयार करण्याचे काम सुरू आहे. डीपीआर तयार झाल्यावर भूसंपादनाचे काम सुरू होईल. त्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल. पावसाळ्यात दरड कोसळल्यामुळे बंद पडणार्‍या माळशेज घाटात बोगदा तयार केला जाणार आहे. त्यामुळे वाहतूक बंद पडणार नाही, असे नमूद करीत खा. कपिल पाटील यांनी तालूक्याचा संपूर्ण विकास करण्याचे आश्‍वासन दिले. मुरबाड तालुक्यात विकासाचे एकही काम शिल्लक राहणार नाही, असा विश्‍वास आ. कथोरे यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@