मलालाची घरवापसी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    31-Mar-2018   
Total Views |

इक्बाल मसीह हा पाकिस्तानमधील एक बालक. त्याचा जन्म १९८३ मध्ये लाहोर जवळील मुरिडके या शहरात झाला. वयाच्या चौथ्या वर्षापासून तो काम करू लागला, त्याचे कारण घरातले अठराविश्व दारिद्र. असा तो एकटा नव्हता. अशी बरीच मुले होती. ती पळून जाऊ नये म्हणून त्यांना साखळीने बांधले जाई. इक्बाल दिवसाचे १२ तास काम करायचा. कुठलीही सुटी नाही. १२ तासांत फक्त अर्ध्या तासाची विश्रांती. वयाच्या दहाव्या वर्षी तो तिथून पळ काढण्यात यशस्वी झाला. काही सामाजिक संस्थांच्या मदतीने त्याने पुढे शिक्षण घेतले. पाकिस्तानमध्ये बाल अत्याचार विरोधात तो त्या मुलांचा आवाज ठरला. तीन हजार मुलांची सुटका करण्यात इक्बालचा मोठा हातभार होता. आंतरराष्ट्रीय पातळीवर इक्बालची दखल घेतली गेली. पण, १९९५ साली वयाच्या १५ व्या वर्षी त्याचा गोळी घालून खून करण्यात आला.


मलाला युसुफझई... वय वर्ष १२... तालिबान्यांनी तिच्यावर गोळ्या झाडल्या. का ? कारण, ती मुलींच्या शिक्षणासंबधी जनजागृती करत होती. ‘बीबीसी’सारख्या आंतरराष्ट्रीय माध्यमांत तिचे लेख प्रकाशित होत होते. हे तालिबान्यांना रुचले नाही. पण, इक्बाल मसीहसारखं दुर्दैव मात्र तिच्या वाटेला आलं नाही. हल्ल्यानंतर मलालावर पाकिस्तानात उपचार सुरु होते. त्यात प्रगतीही दिसत होती. पण, तिच्या जीवाला धोका असल्यामुळे मलालाला पुढील उपचारासाठी इंग्लंडमध्ये हलवण्यात आले. मलाला पाकिस्तानमधील मुलींच्या शिक्षणाच्या न्याय्य हक्कांसाठी लढत होती. प्राणघातक हल्ला झाला तरी मलाला बधली नाही. मुलींना शिक्षण मिळावे म्हणून तिने आपला लढा अजून धारदार केला. अर्थात, यात सिंहाचा वाटा होता तिच्या वडिलांचा. तिचे वडील झियाउद्दीन युसुफझई. स्त्री शिक्षणाच्या लढ्याची वैचारिक बैठक घडवण्यात त्यांचा मोलाचा वाटा. इंग्लंडमध्ये राहून तिने ‘मलाला फंड’ नावाची संस्था स्थापन केली आणि आपल्या कार्याला एक संस्थात्मक रूप दिले. आता ती पाकिस्तानातात परत दाखल झाली आहे, पण केवळ चारच दिवसांसाठी. आज ती जगभरातील मुलींच्या शिक्षणासाठी काम करत असली तरी तिला मायदेश परका झाला आहे. पाकिस्तान दौर्‍यातील माहितीही खूप गोपनीय ठेवण्यात आली आहे. त्याचे कारण आजही तिथे तालिबानी सक्रिय आहेत. सहा वर्षांनंतर मलाला पाकिस्तानात पोहोचली. या सहा वर्षांत जगात काय काय घडले ? मलालाला २०१४ साली ‘नोबेल’ पुरस्कार मिळाला. ‘नोबेल’ मिळवणारी ती सर्वात लहान विजेती ठरली, तसेच पाकिस्तानमधील पहिल्या महिला नोबेल विजेत्याचाही मान मलालाला मिळाला. यामुळे जगाच्या कानाकोपर्‍यात ‘मलाला’ हे नाव पोहोचले. एकीकडे जगभरात मलालाच्या कार्याची दखल घेतली जात होती, दर दुसरीकडे पाकिस्तानात दहशतवादी हल्ल्यांचे सत्र सुरुच होते. २०१४ च्या डिसेंबर महिन्यात दहशतवाद्यांनी तेथील सैनिकी शाळेवर हल्ला चढवला. निर्दोष विद्यार्थ्यांवर क्रूरपणे गोळ्या झाडून त्यांना संपविण्यात आले. या हल्ल्याची जी छायाचित्रं नंतर जगासमोर आली, ती अंगावर शहारे आणणारी होती. या अशा परिस्थितीत ती पाकिस्तानमध्ये राहू शकत नाही, हे तिच्या लक्षात आले आणि ती सध्या ब्रिटनमध्ये स्थायिक असून ऑक्सफर्ड संस्थेत पुढील शिक्षण घेत आहे. कॅनडाने तिला नागरिकत्वही बहाल केले.


जगात तिच्या कार्याचा गवगवा होत असला तरी सोशल मीडियावर तिच्यावर थोडी टीकाही केली गेली. ‘एक गोळी डोक्यात गेली आणि मलाला आंतरराष्ट्रीय ख्यातीची मत व्यक्त करणारी व्यक्ती झाली,’ असा टोमणा नेटकर्‍यांनी मारला. बर्‍याच जणांना तिचे कार्य इतके मोठे वाटत नाही. पण, ट्रोलर्सना काय म्हणणार ? लोकांना चांगल्या गोष्टीतही वाईटपणा दिसून येतो. पण, अशा अनेक मलाला आहेत त्यांच्या हाकेला ‘ओ’ देण्याची गरज आहे. अशा अनेक मलाला आहेत, ज्या या दहशतवादाला बळी पडल्या आहेत. त्यांचा आवाज या गोळ्यांच्या आवाजात गडप झाला आहे. मलाला या आवाजाला प्रतिसाद देईल आणि एका नव्या जगाचे रूप समोर येईल अशी आशा करायला हरकत नाही.
 
 
- तुषार ओव्हाळ 
@@AUTHORINFO_V1@@