अपारंपरिक, समाजाभिमुख शंकराचार्य...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती समाधिस्थ झालेत आणि भारतातील सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील एक देदीप्यमान पर्व संपले. ते ब्रह्मलीन झालेत आणि या जिवा-शिवाच्या मिलनात, खुनाच्या आरोपाची त्यांची वेदनाही विरघळून टाकली असेल, निश्चित. त्यांनी त्यांच्या परीने त्यांचे कर्तव्य केले; परंतु, हिंदू समाजाने, शंकराचार्यांच्या तपस्वी जीवनावर लावण्यात आलेला खुनाच्या आरोपाचा कलंक कधीही विसरता कामा नये. तो न विसरणे हे आपले कर्तव्य आहे.
जयेंद्र सरस्वती सर्वसामान्य पठडीतील शंकराचार्य नव्हते. असाधारण होते. त्यांचे गुरू चंद्रशेखरेंद्र सरस्वती, जे कांची महास्वामी म्हणून ख्यात होते, फार उच्च श्रेणीचे तपस्वी होते. दक्षिणेत तर त्यांना ‘चालती-बोलती देवता’ मानायचे. चंद्रशेखरेंद्र सरस्वती यांनी या २५०० वर्षे जुन्या मठाला, भारतातील सर्व मठांमध्ये गौरवाचे शिखर प्राप्त करून दिले. विनम्रता आणि साधेपणाचे ते प्रतीक होते. त्यांच्या प्रगाढ शांतपणा आणि मौनामुळे लाखो भाविक त्यांचे शिष्य बनले होते. सर्वोच्च बुद्धिवंत, शक्तिमान राजकारणी आणि जीवनाच्या सर्व स्तरातील अत्यंत आदरणीय स्त्री-पुरुष, महास्वामींच्या दर्शनासाठी आणि त्यांची अमृतवाणी ऐकण्यासाठी रांगा लावत असत. अशा या थोर तपस्व्याचे थेट शिष्य असलेले जयेंद्र सरस्वती मात्र दुसऱ्या टोकाचे व्यक्तिमत्त्व होते. महास्वामी मौन असायचे, जयेंद्र सरस्वती बोलके होते. महास्वामी अंतर्मुखी, तर जयेंद्र सरस्वती बहिर्मुखी. महास्वामी पायी फिरायचे, तर जयेंद्र सरस्वतींनी मोटारकार आणि प्रसंगी विमानाने भारतभ्रमण केले. गुरू प्रसिद्धिपराङ्मुख, तर शिष्याला प्रसिद्धीचे वावडे नव्हते. महास्वामी आत्मसंवादात मग्न असायचे, तर जयेंद्र सर्व जगाशी संवाद साधणारे होते. मठात हा जो बदल येत होता तो अमान्य असणाराऱ्यांवर रुसून, एकदा जयेंद्र सरस्वती कुणालाही न सांगता मठातून निघून गेले होते. मठ हादरला. पण काही काळानंतर, जयेंद्र सरस्वती, स्वत:ला शांत केल्यावर परतले. खरेच, परंपरेच्या बाहेर जाणारे ते शंकराचार्य होते.
१९९४ साली महास्वामींच्या समाधीनंतर, जयेंद्र सरस्वतींनी शंकराचार्यांची गादी सांभाळली आणि त्यानंतर एरवी शांत, स्तब्ध व आपल्यातच मग्न असलेला हा कांची कामकोटीचा मठ, सामाजिक जाणिवांच्या स्पंदनांनी सळसळू लागला. कट्टर पारंपरिकपणाच्या मर्यादा ते जाणून होते आणि म्हणून त्यांनी, या पूर्वी कुणी कल्पनाही केली नसेल अशा नवनव्या क्षेत्रांपर्यंत मठाची कार्यकक्षा आणि प्रभाव विस्तारणे सुरू केले. महास्वामींच्या अधिपत्याखाली केवळ आध्यात्मिक उगमस्थान असलेला हा मठ आता, समाजाच्या सेवेत थेट सहभागी होऊ लागला होता. आज कांची कामकोटीचा मठ, ५० वैदिक पाठशाळा व मंदिरांसोबतच, एक अभिनव विद्यापीठ व डझनावरी शाळांचे संचालन करीत आहे. जयेंद्र सरस्वतींनी मठाचे ‘मनाई नियम’ तोडून, समाजातील उपेक्षित लोकांकडे धाव घेतली. स्वामीजी दलित वस्त्यांमध्ये फिरले आणि लाखो नवे अनुयायी तयार केलेत. एका आध्यात्मिक आणि परंपरावादी मठाला त्यांनी अशा प्रकारे सामाजिक जाणिवांनी स्पंदनशील बनविले. यातून ते जसे अतिशय लोकप्रिय झालेत, तसे काही परंपरावाद्यांना ते डोळ्यांत खुपूही लागले होते.
शतकानुशतके प्राणपणाने जपलेल्या रूढी-परंपरांपासून मठाला दूर नेणाऱ्या, स्वतंत्र वृत्तीच्या जयेंद्र सरस्वतींना धडा शिकविण्याचे कारस्थान मठात शिजू लागले आणि त्याची परिणती त्यांच्या विरोधात अभियान छेडून, तसेच मतभिन्नता असणाऱ्यांपैकी एकाच्या खुनात झाली. ज्या राज्यात द्रविड कळघम आणि त्याच्या पिलावळींच्या हातून हिंदू धर्म सातत्याने अन्याय्य आघात सहन करीत होता, तिथे यानिमित्त जयेंद्र सरस्वतींवर हल्ला चढविण्याची संधी राजकीय पक्ष आणि इतरांना मिळाली आणि त्याचे पर्यवसान स्वामींच्या अटकेत झाले. देशात हलकल्लोळ उसळला. परंतु, तामिळनाडूत मात्र राजकीय पक्ष, बुद्धिवंत, चळवळीतील कार्यकर्ते आणि अगदी मीडियानेही, कांची मठ व स्वामींविरुद्ध विषारी प्रचारअभियान चालविले. या खोटारडेपणाविरुद्ध प्रसिद्ध भारतीय विचारवंत एस. गुरुमूर्ती यांनी ‘न्यू इंडियन एक्सप्रेस’ मध्ये पाच लेखांची मालिका लिहून तामिळनाडू सरकार व पोलिसांना उघडे पाडले. त्यावरून सरकारने आपली चूक मान्य करायची सोडून, गुरुमूर्तींच्याच अटकेचे आदेश काढले. एवढेच नाही, तर कुठल्याही आरोपीला नियमानुसार मिळणारा जामीनही स्वामीजींना नाकारण्यात आला. मद्रास हायकोर्टनेही नकार दिला. सरतेशेवटी सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला.
हिंदू धर्माला उच्च वर्णीयांचा आणि ब्राह्मणांचा धर्म ठरवून त्याचा पुरजोर विरोध करणाऱ्या सर्व द्रविड पक्षांना, जयेंद्र सरस्वती एक आव्हान बनले होते. स्वामींनी ख्रिश्चन मिशनरीजच्या धर्तीवर ‘जन कल्याण, जन जागरण’ नावाची चळवळ सुरू केली. विशेषत: झोपडपट्ट्यांमध्ये मठाचे सेवाकार्य फार मोठ्या प्रमाणात सुरू झाले. दलितांच्या वस्तीत जाऊन त्यांच्यात जागृती आणून, त्यांना हिंदू धर्मात सन्मानाचे स्थान देण्याचे, तसेच वस्ती-वस्तीत नवनवी मंदिरे स्थापन करण्याचे कार्य सुरू झाले. मायलापोर कपिलेश्वर मंदिरात दलित पुजाऱ्याची नियुक्ती करून, स्वामींनी कथित सुधारकांची बोलतीच बंद केली! तामिळनाडूतील बहुतेक मंदिरांचे व्यवस्थापन स्वामींच्या निगराणीत सुरू झाले. या सर्व कार्यामुळे, हिंदू धर्माची भीती घालून तयार करण्यात आलेल्या विविध राजकीय पक्षांच्या व्होट बँक्स धोक्यात आल्या. मिशनरीजही चिंतीत होतेच. या सर्व गोष्टींचा वचपा जयललिताने, स्वामींवर खुनाचा आरोप ठेवीत त्यांना अटक करून काढला, असे मानले जाते. नाहीतर, २००४ सालापर्यंत सलोख्याचे संबंध असलेल्या जयललिता अशा उलटल्याच नसत्या. ‘मरता क्या नहीं करता!’ हेच खरे.
शेवटी न्यायालयाने जयेंद्र सरस्वती व त्यांचे उत्तराधिकारी विजयेंद्र सरस्वती यांची, खुनाच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. न्या. नरसिंह रेड्डी यांची या खटल्यातील निरीक्षणे डोळ्यांत अंजन घालणारी आहेत. ते म्हणाले, अडीच हजार वर्षांचा इतिहास असलेल्या या प्रतिष्ठित, गौरवशाली मठाला बदनाम करण्यासाठी काही व्यक्तींची, तसेच सरकार व मीडियाची अभूतपूर्व सक्रियता अतिशय खेदकारक आहे. मानवी अधिकार, निष्पक्षता, सन्मान या सारख्या मुद्यांचा घोष करणाऱ्यांच्या उदासीन मौनावर ताशेरे ओढत न्या. रेड्डी म्हणाले की, कांची मठाचा विश्वासघात होत असताना समाजातील शक्तिशाली गट आनंद साजरा करीत होता, तमासगिर बनला होता, याचा साऱ्या देशाला धक्का बसला आहे. जयेंद्र सरस्वतींचा जो अनादर करण्यात आला, त्यांच्यावर चिखल उडविण्यात आला, त्याची तर तुलनाच होऊ शकत नाही, असे मत नोंदवून न्यायमूर्ती म्हणाले की, शंकराचार्यांविरुद्ध अत्यंत गलिच्छ भाषेचा थेट वापर करण्यात आला. या लोकांनी शंकराचार्यांची स्थिती कौरवांच्या दरबारातील द्रौपदीसारखी करून टाकली आहे. यावरून, शंकराचार्यांना किती मानसिक यातना झाल्या असतील याची कल्पना यावी. गंमत म्हणजे, या खटल्यात जयेंद्र सरस्वतींचे नाव घ्यावे म्हणून तामिळनाडू पोलिस ज्या दोन गुन्हेगारांवर प्रचंड दबाब आणत होते, त्या दोघांनीही न्यायालयात पोलिसांचा दबाब झुगारत, पोलिसांनीच हे षडयंत्र रचल्याचे सांगितले. हे एक षडयंत्र होते आणि त्यातून जयेंद्र सरस्वती निर्दोष मुक्त झालेत, तरीही सेक्युलर मीडिया व लिबरल बुद्धिवंत यांनी आजतागायत जयेंद्र सरस्वतींची बदनामी करणे सुरूच ठेवले आहे. ही वेदना घेऊनच जयेंद्र सरस्वती यांचे शरीर शांत झाले आहे.
जयेंद्र सरस्वतींसारख्या लोकविलक्षण संन्याशावर खुनाचा आरोप लावणारे व त्यांना त्या आरोपाखाली अटक करणारे षडयंत्र, तामिळनाडू राज्यात शिजले व अंमलात आले, हा एक फार मोठा कलंक या राज्याच्या राजकीय, न्यायिक व मीडियाच्या इतिहासाला लागलेलाच राहील. केवळ तामिळनाडूच का? उर्वरित भारतातीलही बहुसंख्य हिंदू, या संपूर्ण प्रकरणात खिशात हात घालूनच बसले होते. ही खंत आम्हां सर्वांना वाटली पाहिजे. या खंतेचे प्रायश्चित्त कसे करायचे, आता हेही सांगितले पाहिजे का?
@@AUTHORINFO_V1@@