माफी... का, कशाची?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    03-Mar-2018
Total Views |
 
 
 
देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीला देशातल्याच एका विद्यापीठात पाऊलही ठेऊ न देण्याची धमकी कोण कशाच्या जीवावर देतो? राष्ट्रपतींना अशी धमकी देण्याची एखाद्याची हिंमतच होते कशी? ही नेमकी कोणती मानसिकता आहे, ज्याला आपण कोणाला आणि कोणत्या कारणाने विरोध करतोय, याचेही भान नाही? की सज्जाद सुभानच्या आडून दुसर्‍या कोणाला तरी राष्ट्रपती, भाजप आणि रा. स्व. संघावर आरोपबाजी करायचीय? याचाही विचार व्हायला हवा.
 
’’राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांनी माफी मागितल्याशिवाय त्यांना विद्यापीठात पाऊल ठेऊ देणार नाही,’’ अशा शब्दांत अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या विद्यार्थी संघटनेचा उपाध्यक्ष सज्जाद सुभान याने धमकी दिली. सज्जाद सुभानने दिलेली ही धमकी फक्त राष्ट्रपतींना दिलेली नसून देशाच्या सार्वभौमत्वाला दिलेले उघड उघड आव्हान असल्याचेच मानले पाहिजे. कारण, घटनेने राष्ट्रपतींनाच देशाचा घटनात्मक प्रमुख म्हणून घोषित केले आहे. एवढेच नव्हे तर देशाच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखपदीही राष्ट्रपतीच असतात. राष्ट्रपती हेच देशाचे प्रथम नागरिक असून त्यांच्याच नावाने देशाचा देशांतर्गत आणि जगभरात कारभार चालतो. त्यामुळे देशाच्या सर्वोच्च पदावरील व्यक्तीला देशातल्याच एका विद्यापीठात पाऊलही ठेऊ न देण्याची धमकी कोण कशाच्या जीवावर देतो? राष्ट्रपतींना अशी धमकी देण्याची एखाद्याची हिंमतच होते कशी? ही नेमकी कोणती मानसिकता आहे, ज्याला आपण कोणाला आणि कोणत्या कारणाने विरोध करतोय, याचेही भान नाही? की सज्जाद सुभानच्या आडून दुसर्‍या कोणाला तरी राष्ट्रपती, भाजप आणि रा. स्व. संघावर आरोपबाजी करायचीय? याचाही विचार व्हायला हवा. आणखी एक गंभीर बाब म्हणजे, सज्जाद सुभान केवळ धमकी देऊनच थांबला नाही, तर त्याने राष्ट्रपती विद्यापीठात आल्यास हिंसाचार भडकेल आणि त्याला राष्ट्रपतीच सर्वस्वी जबाबदार असतील, असे म्हणण्यापर्यंतही मजल मारली. त्यामुळे अशा प्रकारच्या धमक्या आणि इशारे देणार्‍यांवर कारवाईही करायला हवी. तर सज्जाद सुभान ज्या विद्यार्थी संघटनेचा उपाध्यक्ष आहे त्यातही उभी फूट पडल्याचे ताज्या घटनाक्रमातून पुढे आले. विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष-मशकूर अहमद उस्मानी याने सज्जाद सुभानच्या विधानांचा विरोध करत आम्ही मोकळ्या मनाने राष्ट्रपतींचे स्वागत करणार असल्याचे सांगितले. विद्यापीठ प्रशासनानेदेखील आमचा राष्ट्रपतींच्या विरोधाशी कसलाही संबंध नसल्याचे म्हटले आहे. या दोन्ही सकारात्मक बाबी म्हटल्या पाहिजे.
 
अलीगड मुस्लीम विद्यापीठात राष्ट्रपतींना होत असलेल्या विरोधाचे मूळ २०१० सालच्या एका घटनेत आहे. त्यावेळी विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते होते. रंगनाथ मिश्रा आयोगाने सामाजिक व आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या धार्मिक व भाषिक अल्पसंख्य गटांना १५ टक्के आरक्षण देण्याची शिफारस केली होती. यावर रामनाथ कोविंद यांनी आपले मत मांडत हे शक्य नसल्याचे म्हटले होते. कारण, मुस्लीम आणि ख्रिश्चन समुदायाला अनुसूचित जातीमध्ये समाविष्ट करणे असंवैधानिक आहे. कोविंद यांच्या या उत्तरावर शीख समुदायाला अशा प्रकारचे आरक्षण दिले जात असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी मुस्लीम आणि ख्रिश्चन धर्म भारताबाहेरील असल्याचे म्हटल्याचा विरोधकांचा आरोप आहे आणि त्यावरुनच कोविंद यांना विरोध करत माफीची मागणी केली जातेय. पण, रामनाथ कोविंद यांनी जे विधान केले त्यात अजिबातच तथ्य नसल्याचे कोणीही नाकारु शकत नाही. भारतीय धर्मांबद्दल ज्या ज्या वेळी विचारले, माहिती दिली जाते त्या त्यावेळी हिंदू, बौद्ध, जैन, शीख हीच नावे समोर येतात. त्याला कारणही तसेच आहे. या चारही धर्मांचे मूळ भारतातीलच आहे, तर मुस्लीमधर्माचा उदय अरबस्तानात आणि ख्रिश्चन धर्माचा जन्म जेरुसलेममध्ये झाला, हेही सत्य आहे. आजही या दोन्ही धर्मानुनयांच्या धर्मनिष्ठा या भारताबाहेर मक्का-मदिना वा जेरुसलेम-व्हॅटिकन सिटीतच असतात. रामनाथ कोविंद यांनी तेच म्हटले आहे आणि कोविंद यांच्या विधानावरुन त्यांच्या मनात या दोन्ही धर्मांबद्दल घृणा असल्याचेही निदर्शनास येत नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे, रामनाथ कोविंद यांनी मुस्लीमआणि ख्रिश्चन या दोन्ही धर्मानुनयांच्या देशभक्तीवरदेखील कुठलेही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाही. तर केवळ जे सर्वांना माहिती आहे, तेच सत्य सांगितले आहे, त्यामुळे त्यांच्या विधानांवरुन काहूर माजवण्यात खरे तर अर्थच नाही. पण, ज्यांच्या डोक्यातच भाजप आणि संघद्वेषाचा विखार भरलाय त्यांना हे कसे समजणार?
 
यातली आणखी एक गोष्ट म्हणजे, ज्यावेळी रामनाथ कोविंद यांनी हे विधान केले, त्यावेळी ते भाजपचे सदस्य होते. पण आज ते ‘राष्ट्रपती’ या पक्षातीत पदावर विराजमान आहेत. राष्ट्रपतीपद स्वीकारताना पक्षाचे सदस्यत्व सोडावे लागते, राष्ट्रपती हे कोणत्याही पक्षाचे वा संघटनेचे सदस्य नसतात, तर ते देशाचे राष्ट्रपती असतात, याचीही विरोध करणार्‍यांना माहिती नाही का? म्हणूनच राष्ट्रपतींना विरोध करणार्‍यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते.
 
दुसरीकडे याच अलीगड मुस्लीम विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचा सचिव मोहम्मद फहद याने आम्ही संघी मानसिकतेचा विरोध करणार असल्याचा फुत्कार सोडला. शिवाय रा. स्व. संघ मानवताविरोधी असल्याचे तारेही तोडले. फहदच्या या विधानांवरुन या व्यक्तीचे डोके ठिकाण्यावर आहे का, असेच विचारावेसे वाटते. या माणसाला देशाची आणि देशातल्या सर्वात मोठ्या स्वयंसेवी संघटनेची तरी माहिती आहे का? की कोणीही उठवलेल्या बिनबुडाच्या वावड्यांवरच हा माणूस विश्र्वास ठेवतो? खरे तर संघाची मानसिकता समजून घेण्यासाठी फहदने संघातच यायला हवे, म्हणजे त्याला खरा संघ काय आहे, हे समजेल.
 
जवाहरलाल नेहरु विद्यापीठातले कम्युनिस्टांच्या हातातले खेळणे म्हणजे कन्हैय्या कुमार. कन्हैय्या कुमारला ज्या दिवसापासून माध्यमांनी पडद्यावर आणले, त्या दिवसापासून त्याने संघद्वेषाच्या गुळण्या करायला त्याने सुरुवात केली. त्या गुळणीत काहींना अमृताचे तुषारही दिसले. त्यात न्हाऊन घ्यायला आपल्या महाराष्ट्रातल्या काही पुरोगामी म्हणविणार्‍यांनीही चढाओढ सुरु होती. याच गुळणीची लागण अलीगड मुस्लीम विद्यापीठातल्या मोहम्मद फहदला झाली असावी, म्हणूनच त्याच्या तोंडी संघद्वेषाची भाषा आल्याचे दिसते. कोणत्याही नैसर्गिक आपत्तीवेळी धावून येणारे, राष्ट्राच्या उन्नतीसाठी सदैव झटणारे, देशाला पुन्हा एकदा विश्र्वगुरुपदी आरुढ करण्यासाठी तन-मन-धन अर्पण करुन कार्य करणारे, देशावर आलेल्या कोणत्याही संकटाला भिडून ते मुळापासून उखडून फेकण्याची भावना आणि क्षमता असणारे, समाजातील रंजल्या-गांजल्यांच्या उत्कर्षासाठी लाखो सेवाप्रकल्प सुरु करणारे स्वयंसेवक म्हणजे संघाची मानसिकता आहे, हे फहदला माहिती नाही का? मोहम्मद फहद याला या मानसिकतेला विरोध करायचाय का? असे असेल तर फहदने नक्कीच वेड्यांच्या इस्पितळात जाऊन उपचार करुन घ्यायला हवेत. म्हणजे तरी त्याच्यात थोडीफार सुधारणा होऊन त्याचे डोके ताळ्यावर येईल.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@