अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2018
Total Views |

१३ विधेयके संमत करण्यात सरकारला यश

 
 
 
मुंबई : गेल्या साधारण एक महिन्यापासून सुरू असलेल्या राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची काल सांगता झाली. या अधिवेशनात एकूण १३ विविध विधेयके विधानसभा व विधानपरिषदेत अशा दोन्ही सभागृहात संमत करून घेण्यात सरकारला यश मिळाले. आता विधीमंडळाचे पुढील अर्थात पावसाळी अधिवेशन दि. ४ जुलैपासून सुरू होईल.
 
दि. २६ फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या अधिवेशनात विधानसभेमध्ये एकूण २२ दिवस कामकाज झाले. हे कामकाज एकूण १८२ तास भरल्याचे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी सांगितले. या २२ दिवसांत दररोज साधारण ७ तास ४६ मिनिटे विधानसभा सभागृहाचे कामकाज चालले. एकट्या विधानसभेने १९ विधेयके संमत केली तर त्यातील १३ विधेयके विधानपरिषदेतही संमत करून घेण्यात सरकारला यश मिळाले. तसेच, विधानसभा नियम २९३ नुसार ८ विविध विषयांवरील प्रस्तावांवर चर्चा झाली. संपूर्ण अधिवेशनकालात विधानसभेतील आमदारांची सरासरी उपस्थिती ७९.६ टक्के इतकी होती. यातील सर्वाधिक उपस्थिती ८९.८४ टक्के इतकी होती आणि सर्वांत कमी ५८.२० टक्के इतकी होती.
 
 
पुढील अधिवेशन मुंबईत की नागपुरात ?
प्रथेप्रमाणे हे अधिवेशन संपत असताना पुढील अधिवेशनाची तारीख विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केली. मात्र, हे अधिवेशन राजधानी मुंबईत होणार की उपराजधानी नागपुरात हे मात्र स्पष्ट करण्यात आलेले नाही. दरवर्षी नागपुरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन घेण्याऐवजी पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याचा सरकारचा प्रस्ताव असून असे झाल्यास डिसेंबरमधील हिवाळी अधिवेशन हे मुंबईतच होईल. या प्रस्तावाबाबत विरोधी पक्षनेत्यांसह सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करण्यासाठी सरकारने वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार, संसदीय कार्य मंत्री गिरीश बापट व उद्योग मंत्री सुभाष देसाई यांची त्रिसदस्यीय मंत्रीसमिती स्थापन केली आहे. त्यामुळे सरकारकडून याबाबत वेगाने हालचाली होत असल्याचे दिसत असून पुढील अधिवेशन हे नागपुरात होण्याची दाट शक्यता आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@