सावरकरांचे निर्दोषत्व...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2018
Total Views |



स्वा. सावरकरांच्या बाबतीत विशेष न्यायालयाच्या निकालाविरुद्ध, ज्यात न्यायालयाने सावरकरांना ‘दोषमुक्त’ म्हटले होते, त्याविरोधात सरकारने कधीही अपिल केले नाही, त्यामुळे कपूर आयोगाचा सावरकरांविषयीचा निष्कर्ष निरर्थक ठरतो. पण, हे ज्यांना कळत नाही, वा कळत असूनही वेड पांघरुन आपणच एकमेव शहाणे असल्याचे मिरवायचे असते, ते लोक कपूर आयोगाच्या खोडसाळपणालाच प्रमाण मानतात.

गांधीहत्येच्या कलंकातून स्वा. सावरकरांना सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच निर्दोष मुक्त केले. देशातल्या सर्वाधिक गाजलेल्या खटल्याच्या या वृत्ताची दै. ‘मुंबई तरुण भारत’ वगळता अन्य कोणत्याही माध्यमाने साधी दखलही घेतली नाही. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या ताज्या निकालात कपूर आयोगाच्या अहवालातील स्वा. सावरकरांचा एका वाक्यात केलेला उल्लेख फेटाळत त्याला कसलाही पुरावा नसल्याचे स्पष्ट केले, ही लाखो सावरकरप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठांच्या दृष्टीने आनंददायक व स्वागतार्ह गोष्ट. आता ज्या ज्या लोकांनी गांधीहत्येमध्ये सावरकरांचा सहभाग असल्याचे बालंट ठेवले, त्या त्या लोकांची तोंडे नक्कीच बंद होतील. तरीही आपला सावरकरद्वेषाचा कंडू शमवण्यासाठी त्यांचे नाव गांधीहत्येत गोवण्याचा खोडसाळपणा कथित बुद्धिजीवी आणि पुरोगामी मंडळी नेहमीच करतात. गांधीहत्येच्या चौकशीसाठी नेमलेल्या कपूर आयोगाच्या अहवालात जाता जाता नमूद केलेल्या - ''All these facts taken together were destructive of any theory other than the conspiracy to murder by Savarkar and his group.'' या एका वाक्याचा आधार घेत ही मंडळी सतत द्वेषाच्या गुळण्या टाकताना दिसतात. पण, सर्वोच्च न्यायालयाच्या आताच्या निकालात कपूर आयोगातील निष्कर्षासंदर्भात, ‘‘ही चौकशी स्वा. सावरकरांच्या मृत्यूनंतर करण्यात आली. या चौकशीवेळी सावरकरांना अथवा त्यांच्या प्रतिनिधींना आपली बाजू मांडण्याची कोणतीही संधी देण्यात आली नाही. केवळ गोडसे आणि इतर मंडळी सावरकरांशी संबंधित असल्याच्या सर्वसाधारण निरीक्षणावरून हा निष्कर्ष काढण्यात आला असून तो कुठल्याही प्रकारे सावरकरांच्या सुटकेआड येत नाही हे नि:संशय,’’ असे म्हटले. यावरुन गांधीहत्येप्रकरणी न्यायालयाने स्वा. सावरकरांचे निर्दोषत्व निखालसपणे मान्य केल्याचे सिद्ध होते. पण, आजही काही सावरकरद्वेष्ट्या मंडळींचा न्यायालयाच्या निकालाऐवजी कपूर आयोगाच्या एका ओळीच्या, ज्याचा नंतर कुठेही उल्लेख नाही अशा वाक्यावरच विश्र्वास असल्याचे दिसते.

 
 

स्वा. सावरकरांचे गांधीहत्येत गोवलेले नाव, त्यांच्यावरील ठपका दूर करण्यासाठी मुंबईतील अभिनव भारत संस्थेच्या डॉ. पंकज फडणीस यांनी याचिका दाखल केली होती. याआधी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातही अशी याचिका दाखल केली होती. परंतु, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयात गेले. इथेही त्यांनी एकाकी लढा देत स्वा. सावरकरांवरील गांधीहत्येचा कलंक मिटवण्यासाठी निकराचे प्रयत्न केले. याची परिणती म्हणून सर्वोच्च न्यायालयाने आता गांधीहत्येतून सावरकरांचे नाव वगळत त्यांचे निर्दोषत्व देशासमोर आणले. पण, ज्यांना गांधीहत्येत स्वा. सावरकरांचा सहभाग असल्याच्या कथित आरोपावरुन आपल्या स्वार्थी राजकारणाच्या पोळ्या शेकायच्या असतात, ती मंडळी आजही कपूर आयोगातील एका वाक्यालाच धरुन बसतात.

 
 

मात्र, एखाद्या घटनेच्या चौकशीसाठी नेमलेल्या आयोगाचे निष्कर्ष वा त्यांच्यासमोरील पुरावे न्यायालयावर बंधनकारक नसतात. न्यायालय ते फेटाळू शकते, पण न्यायालयाचे निर्णय फेटाळण्याचा वा चूक म्हणण्याचा अधिकार आयोगाला नसतो. आयोगाचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असले, तरी विशेष न्यायालयाचा निर्णयाधिकार त्यांच्यापेक्षा वरचढ असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, स्वा. सावरकरांच्या बाबतीत विशेष न्यायालयाच्या निकालाविरुद्ध, ज्यात न्यायालयाने सावरकरांना ‘दोषमुक्त’ म्हटले होते, त्याविरोधात सरकारने कधीही अपील केले नाही, त्यामुळे कपूर आयोगाचा सावरकरांविषयीचा निष्कर्ष निरर्थक ठरतो. पण, हे ज्यांना कळत नाही, वा कळत असूनही वेड पांघरुन आपणच एकमेव शहाणे असल्याचे मिरवायचे असते, ते लोक कपूर आयोगाच्या खोडसाळपणालाच प्रमाण मानतात. त्यांनी आता डोळे उघडे ठेवून पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल पाहण्याची, वाचण्याची आणि क्षमता असेल तर आकलन करुन घेण्याची गरज आहे.

 
 

ज्यांचे जहाज लोकशाहीच्या सागरात रसातळाला जातेय, ते या काडीच्या ज्याला कसलाही पुरावा नाही, त्या वाक्याचा आधार घेत सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करतात. पण, ज्याला पुरावाच नाही ते कितीही वेळा लिहिले, ऐकवले तरी जनतेने त्यांना नाकारल्याने हे लोक शेवटी तोंडावरच आपटतात. आताही तसेच झाले. गांधीहत्येचा खटला आणि त्यातील स्वा. सावरकरांचा कथित सहभाग हा देशातील सर्वात जास्त गाजलेला आणि चर्चिला गेलेला विषय. देशातील बुद्धिजीवी, पुरोगामी मंडळींनी सावरकरद्वेषाचा नमुना दाखवत सुरुवातीपासूनच सावरकरांविरोधातच लिखाण केले. त्यांच्या लिखाणातून त्यांनी सावरकरांनी गांधीहत्या केल्याचे म्हणायलाही मागेपुढे पाहिले नाही. सावरकरांच्या बदनामीची सुपारी घेऊनच त्यांनी हे केल्यासारखे वाटावे, असा त्यांचा सगळा इतिहास दिसतो. आता स्वा. सावरकरांच्या निर्दोषत्वावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले, तरीही अजून मुख्य माध्यमे वा कथित बुद्धिजीवी, पुरोगामी मंडळींनी त्याची दखल घेतल्याचे दिसले नाही. हे सावरकरद्वेषाचेच द्योतक!

 
 

काँग्रेसच्या सत्ताकाळात नेमण्यात आलेल्या कपूर आयोगाचे देशाच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रावर विपरित परिणामझाल्याचे पाहायला मिळते. विशेष न्यायालयाने स्वा. सावरकरांना गांधीहत्येतून निर्दोष मुक्त केल्यानंतरही कपूर आयोग नेमण्यामागे सावरकरद्वेष हा एक मुद्दा होताच तसाच तो हिंदुत्वनिष्ठ आणि रा. स्व. संघाच्या वाढत्या शक्तीला थोपवणे हाही होता. आयोगाने काढलेल्या निष्कर्षाचा, त्यातील एखाद्या वाक्याचा उपयोग करत कांग्रेसने जनतेमध्ये संघ आणि हिंदुत्वनिष्ठांविरोधात विष कालवण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला. सोबतच ब्राह्मण समाजाला लक्ष्य करत तो संपूर्ण समाजच कसा गुन्हेगार आहे, हे लोकांच्या मनावर बिंबवण्याचे लोकांमध्ये फूट पाडण्याचे कामही केले. आजही आपल्याला काँग्रेसी नेते, गांधी घराणे आणि मुख्यतः काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या तोंडून गांधीहत्या, त्यातील स्वा. सावरकरांचा कथित हात, संघाचा हत्येच्या कटातील कथित सहभाग आणि हिंदुत्वनिष्ठांविरोधात आरोपांची राळ उडवून देण्याचे कामनित्यनेमाने सुरुच आहे. काँग्रेसची जनतेच्या मनात जागा निर्माण करण्याची क्षमता, शक्ती जसजशी क्षीण होत गेली, त्या त्या वेळी काँग्रेसने गांधीहत्येचे भांडवल नियमितपणे केले. काँग्रेसने गेल्या कित्येक वर्षांपासून आजपर्यंत स्वा. सावरकर, संघ आणि भाजपच्या बदनामीचे कारस्थान कपूर आयोगाच्या बिनबुडाच्या निष्कर्षांवर रचले. कपूर आयोगातील एका वाक्यातील सावरकरांचा उल्लेख हे त्या कारस्थानाचे मूळ. आता तर समाजमाध्यमांच्या जमान्यात फेसबुक, व्हाट्‌सऍप, ट्विटरद्वारेही हा द्वेष पसरवला जातोच आहे. विविध समाजगटांत त्यामुळे एक दरी निर्माण झाल्याचेही पाहायला मिळते आणि त्याला काँग्रेसच्या तुकड्यांवर पोसलेले बुद्धिजीवी, पुरोगामी, लेखक मंडळी सुनियोजितपणे खतपाणी घालण्यात आघाडीवर असल्याचेही दिसते. पण, आज सर्वोच्च न्यायालयानेच कपूर आयोगातील निष्कर्ष फेटाळत त्याचे भांडवल करणार्‍यांना चांगलीच चपराक लगावली. असे असले तरी स्वा. सावरकरांचा गांधीहत्येत सहभाग असल्याचा आरोप करणार्‍यांची अवस्था त्या गर्दभासारखी आहे, ज्याला उकिरडा चिवडू नको असे कितीही सांगितले तरी ते त्याच उकिरड्यातल्या घाणीत लोळायला उड्या मारत पुढे सरसावते.

 
 

सर्वोच्च न्यायालयाने गांधीहत्येतील स्वा. सावरकरांच्या सहभागाच्या संशयाला मूठमाती दिली, पण त्या आधीही स्वा. सावरकर देशातील कोट्यावधी राष्ट्रभक्तांसाठी प्रातःस्मरणीय आणि प्रेरक क्रांतिकारक म्हणून वंदनीय होतेच आणि यापुढेही राहतीलच. पण, आता न्यायालयाच्या निकालामुळे स्वा. सावरकरांवरील गांधीहत्येच्या ठपक्याला तिलांजली मिळाल्याने त्यांना ‘भारतरत्न’ मिळायचा मार्ग मोकळा झाला आहे, असे म्हणायला हरकत नसावी, हेही खरेच.

@@AUTHORINFO_V1@@