समाजमन जाणणारा मानसशास्त्रज्ञ...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2018
Total Views |
 
 
 
गुंतागुंतीचे मानवी जीवन अधिक सुसह्य करण्यासाठी आज मानसशास्त्राची गरज भासते. अशा परिस्थितीत प्रा. कुलथे यांनी मानसशास्त्राच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे कार्य हाती घेतले आहे.
 
मानसशास्त्र हे आता बर्‍यापैकी सर्वसामान्यांच्या परिचयाचे झाले आहे. मानसशास्त्राच्या विविध शाखाही प्रचलित आहेत. त्यातील औद्योगिक मानसशास्त्र आणि क्रीडा मानसशास्त्राचा उपचारासाठी मोठ्या प्रमाणात वापरदेखील केला जातो. मानव आणि प्राण्यांच्या वागणुकीविषयीचा शास्त्रीय अभ्यास म्हणजे मानसशास्त्र होय. मनुष्यप्राण्याचा स्वभाव जाणून घेणे, त्याबाबत अंदाज करणे, त्याची वागणूक बदलण्यासाठी विविध कार्यपद्धती विकसित करणे आणि उपचाराची पद्धत ठरविणे. यासाठी मानसशास्त्रज्ञ वेगवेगळ्या शास्त्रीय पद्धती उपयोगात आणतात. संशोधन हे प्रयोगशाळेतदेखील केले जाते. जेथे ज्या गोष्टींचा अभ्यास करायचा आहे, त्या गोष्टी नियंत्रणात ठेवणे शक्य असते किंवा प्रत्यक्ष जीवनात स्वभावाचा अभ्यास केला जाऊ शकतो. मानसशास्त्रामध्ये अशाचप्रकारे विविध विभाग आहेत आणि प्रत्येक विभाग हा वर्तनाचे किंचित वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विश्लेषण करत असतो.
 
सामाजिक मानसशास्त्रज्ञ हे मानवाच्या वर्तनावर होणार्‍या विविध सामाजिक परिस्थितींचा अभ्यास करतात. तुलनात्मक मानसशास्त्र प्राण्यांच्या विविध जातींचा अभ्यास करुन त्यांच्या वर्तनाच्या जीवनशास्त्राशी संबंधित आहे. ज्ञानविषयक मानसशास्त्रज्ञ हे स्मरणशक्ती, विचार, समस्या निवारण आणि शिकण्याच्या मानसशास्त्रीय पैलूंचा अभ्यास करते. ‘क्लिनिकल सायकालॉजिस्ट’ व्यक्तीस किंवा त्याच्या समूहास त्यांच्या वर्तनात बदल घडवून आणण्यासाठी विविध मार्गांचा अभ्यास करतात. शारीरिक व सामाजिक घटकांचे व्यक्तींच्या कार्यस्थानी होणारे परिणाम व त्यामुळे त्यांच्या उत्पादन क्षमतेवर होणारे परिणाम यांचा अभ्यास ‘इंडस्ट्रीअल सायकॉलॉजिस्ट्‌स’ करतात. समाज मानसशास्त्रज्ञ विविध शास्त्रीय पद्धतींचा वापर, सामाजिक समस्यांचा अभ्यास करण्यासाठी व त्या सोडवण्यासाठी करतात. ज्या काळात हे शास्त्र फारसे प्रचलित नव्हते, तेव्हा कर्ज काढून, या शाखेत आपले करिअर घडविण्याच्या हेतूने नंदकुमार काशीनाथ कुलथे यांनी जीवनाची दिशा निवडली. तसेच आपल्या या मानससशास्त्रीय शिक्षणाचा लोकांनाही फायदा व्हावा, हा ही लोकसेवेचा उद्दात हेतू होताच.
 
नाशिकच्या गोराराम लेनमध्ये जुन्या वाड्यात नंदकुमार कुलथे निवासी होते. फक्त ‘मानसशास्त्र’ हा खास विषय बीएसाठी घेता यावा म्हणून त्यावेळी त्यांनी पंचवटी महाविद्यालयात प्रवेश घेतला. प्रा. भोरे सरांनी त्यांना मार्गदर्शन केले. पुढे कॅनरा बँकेचे शैक्षणिक कर्ज घेऊन त्यांनी मानसशास्त्रात एम.एची पदवीही संपादित केली. त्यानंतर नोकरीचा शोध घेऊन अनेक ठिकाणी प्राध्यापक म्हणून कामाचा अनुभव घेतला. त्यानंतर शहादा येथील अण्णा पाटील यांच्या महाविद्यालयात त्यांनी प्राध्यापकी करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मानसशास्त्राचे धडे देण्यास सुरुवात केली. सुमारे २५ वर्षे प्राध्यापकी केल्यावर त्यांनी स्वेच्छा निवृत्ती पत्करली. हे करताना त्यांनी मानसशास्त्रावर आधारित अनेक पुस्तकांचे लेखन केले. त्यांच्या पुस्तकांना राज्य सरकारचे पुरस्कारदेखील मिळाले आहेत. ख्यातनाम मानसशास्त्रज्ञ आणि मुंबई विद्यापीठाच्या उपयोजित मानसशास्त्र विभागाचे निवृत्त प्रमुख डॉ. सी. जी. देशपांडे यांच्यासारख्या ज्येष्ठ प्राध्यापकांचे मार्गदर्शन त्यांना लाभले. प्रारंभी वृत्तपत्रांत पत्रे, छोटे लेख असे लेखन करणार्‍या कुलथे यांनी ‘अमृत’ मासिकात परिश्रमपूर्वक अभ्यास, पाहण्या करून मौलिक लेखन केले. आपले काम करताना समाजासाठी त्याचा उपयोग कसा होईल, याचा विचार त्यांनी सातत्याने केला. त्यांचे वडील स्व. काशीनाथराव कुलथे हे सिन्नर तालुक्यातील कीरतांगळी येथील राहणारे. त्यांनीदेखील आयुष्यभर नाशिक रोड प्रेसमध्ये नोकरी करून अखंड समाजसेवा केली. वडिलांचाच आदर्श वेगळ्या पद्धतीने जोपासताना, नंदकुमार कुलथे यांनी शक्य तेवढ्या आधुनिक कल्पना आचरणात आणायचा प्रयत्न केला. नाशिक, शहादा, पुणे या कार्यक्षेत्रात त्यांनी काम केले. नुकतेच पुण्यात त्यांच्या ’मानसरंग’ या पुस्तकाच्या सुधारित आवृत्तीचे प्रकाशन डॉ. सी. जी. देशपांडे यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्कृत अभ्यासक, संशोधिका इंदू देशपांडे तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. या पुस्तकाच्या प्रथम आणि द्वितीय आवृत्तीस अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यात महाराष्ट्र शासनाच्या उत्कृष्ट साहित्य निर्मितीचा पुरस्कार आणि महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुरस्काराचा समावेश आहे. मानवी जीवनातील विविध रंगछटांचे ललित भाषेत सर्वसामान्यांना आकलन होईल असे विवेचन त्यात केले आहे. त्यामुळे हे पुस्तक लोकप्रिय ठरले.
 
’बातचीत मनोविकार तज्ज्ञांशी’ हे कुलथे यांचे वाचकांच्या पसंतीस उतरलेले एक पुस्तक, तर ’अंतरंग युवा मनाचे’ हे खास युवकांची मनोवस्था जाणून घेणारे पुस्तकदेखील चांगलेच लोकप्रिय झाले. या बरोबरच कथा, कविता असे लेखनदेखील त्यांनी केले. गुंतागुंतीचे मानवी जीवन अधिक सुसह्य करण्यासाठी आज मानसशास्त्राची गरज जास्त भासते. मुलांच्या हट्टीपणासारख्या वर्तनापासून ते त्यांच्या करिअरविषयक प्रश्र्नांपर्यंत आज मानसशास्त्राचा आधार घेतला तर बरेच प्रश्न लवकर सुटू शकतात. किंबहुना, त्याची नितांत गरज असते. अशा परिस्थितीत प्रा. कुलथे यांनी समाजाला दिशा देण्याचे अनोखे कार्य हाती घेतले आहे. ते स्तुत्य असून, भावी काळातदेखील त्यांच्याकडून असेच कार्य सुरु राहावे यासाठी त्यांना शुभेच्छा!
 
 
 
 
- पद्माकर देशपांडे

 
@@AUTHORINFO_V1@@