श्यामनगरमधील हजारो रहिवासी मूलभूत सुविधांपासून वंचित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    29-Mar-2018
Total Views |


 

 पालिकेचा प्रशासनाचा आडमुडेपणा

पाणी टंचाई, रस्ता नाही

मुंबई: अंधेरी पश्चिमेला श्यामनगर झोपडपट्टी असून येथील रहिवाशांना पालिका प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे रस्ता, पाणी टंचाई, शौचालयाची कमतरता आदी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पालिकेकडे वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे आज घडीला श्यामनगरमधील चार हजार रहिवाशी मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत. दरम्यान, येथील नगरसेविकाही याकडे दुर्लक्ष करत असून आमदार भारती लव्हेकर आणि प्रभाग समिती अध्यक्ष योगीराज दाभाडकर या समस्यांचा पाठपुरावा करत आहेत. तसेच आमदार निधीतून १२ सीटर शौचालय उभारण्यात येणार येणार असल्याचे रहिवाशांनी दै. मुंबई तरूण भारत’शी बोलताना सांगितले. अंधेरीतील पश्चिम येथील श्यामनगर झोपडपट्टी ही जिल्हाधिकार्‍यांच्या जागेवर आहे. परंतु येथे राहणार्‍या लोकांना एका खाजगी विकासकाने रस्त्यासाठी जागा सोडली होती. परंतु त्या जागेतून जलवाहिनी तसेच मलनिस्सारण वाहिनी जात होती. मात्र, स्टेडियम बांधण्यासाठी पालिकेने ही जागा २०१७ मध्ये विकत घेतली आहे. परंतु येथे राहणार्‍या नागरिकांसाठी पालिकेमार्फेत कोणतीही पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नाही.

या परिसरात डोंगर, उद्यान, इमारती असून हा एकमेव रस्ता येथे होता. परंतु, त्याची पर्यायी व्यवस्था करण्यात आली नसून लोकांचा संपर्कच तुटला आहे. येथे सेंट कॅथरिन्स शाळा असून तिथे विद्यार्थ्यांना येण्याजाण्यास अडथळा झाला आहे. सेंट कॅथरिन्स आश्रमामार्फत येथे विविध उपक्रम राबविण्यात येतात. येथे महिलांसाठी शिवण क्लास, वर्षभरासाठी ५० रुपयांत १० वी पर्यंतच्या गरीब विद्यार्थ्यांना ट्युशन दिले जाते. तसेच या परिसरात असलेल्या जलवाहिनीद्वारे सकाळी ८ ते १०.३० येथे पाणी येते. रहिवाशांना डोक्यावर हांडा घेऊन लांबच लांब रांगा लावून लोकांना पाणी भरावे लागते. ही जलवाहिनी जेथून गेली आहे त्याठिकाणी स्टेडिअमच्या कामगारांसाठी शौचालय बांधण्याच आले आहे. तसेच मलःनिस्सारण वाहिनी बुजवून टाकली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर मलनि:सारणाचे पाणी साचून दुर्गंधी पसरली आहे. असे असूनही पालिका अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. पालिकेच्या प्रकल्पात एखादी जागा बाधित होत असेल तर पब्लिक अफेक्टेड पॉलिसी अंतर्गत त्या रहिवाशांची व्यवस्था केली जाते. परंतु जागा जिल्हाधिकार्‍यांकडे असून त्या नागरिकांना सोयी सुविधा पुरवण्याची जबाबदारी जिल्हाधिकार्‍यांची असल्याची पालिका अधिकारी सांगत असल्याचे या रहिवाशांकडून सांगण्यात आले. तसेच याठिकाणी ४ हजार लोक राहत असून त्यांच्यासाठी केवळ १२ शौचालय उभारण्यात आल्यामुळे आपली कुचंबणा होत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले.

पत्राचे उत्तर देण्यास सहा वर्ष

झोपडपट्टी घोषित करण्यासाठी रहिवाशांनी जिल्हा अधिकार्‍यांना २००३ मध्ये पत्र लिहले होते. परंतु त्याचे उत्तर २००९ मध्ये आले. कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता गलिच्छ वस्तीसाठी कागदपत्रे मागविण्यात आली होती. परंतु त्याची पूर्तता न केल्यामुळे हे पत्र दप्तरी दाखल करण्यात आले असे उत्तर देण्यात आले.

मुंबईत जागा महापालिका, म्हाडा, एसआरए, खाजगी प्राधिकरणाच्या मालकीच्या आहेत. त्यातील एक संस्था एका ठिकाणी काम करत असेल, तर दुसरी संस्था त्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. जर पालिकेच्या जागेत कोणी बाधित होत असेल तर पीएपी अंतर्गत त्यांची व्यवस्था केली जाते. परंतु जागा जर जिल्हाधिकार्‍यांची असेल आणि सोयीसुविधा पालिकेच्या जागेतून असेल तर अशा बाधित लोकांसाठी कोणतेही धोरण अस्तित्वात नाही. अशा नागरिकांसाठी नवीन धोरण करण्याची गरज आहे.

योगीराज दाभाडकर,

अध्यक्ष, प्रभाग समिती, के पश्चिम

आम्हाला पालिकेने पाणी रस्ता, गटार व्यवस्था करून द्यावी. गेल्या ५० वर्षांपासून आम्ही हा रस्ता वापरत आहोत. पूर्वी ही जागा खाजगी व्यावसायीकाकडे होती. तरी त्याने आमच्यासाठी व्यवस्था करून दिली होती. परंतु पालिका प्रशासन आमच्यावर अन्याय करत आहेत. पालिका अधिकारी अरेरावीची भाषा करत आहेत. आम्हाला येथूनच रस्ता हवा आहे.

स्थानिक रहिवाशी,

श्यामनगर झोपडपट्टी

 

 
नितीन जगताप
@@AUTHORINFO_V1@@