मुंबई विद्यापीठात भारतीय सैन्याविरोधात कार्यक्रम !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2018
Total Views |

विधानसभेत पडसाद, शिक्षणमंत्र्यांकडूनही दखल 

ही जेएनयूची छोटी आवृत्ती : अतुल भातखळकर

 
 
मुंबई : मुंबई विद्यापीठातील एका स्वायत्त अध्यासनामध्ये चक्क भारतीय सैन्याच्या विरोधातील भूमिका मांडणारे व्याख्यान आयोजित करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच, या प्रकरणाचे राज्याच्या विधानसभेतही पडसाद उमटले असून शिक्षण विभागाकडूनही याची गंभीर दखल घेण्यात आली आहे.


भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी आज विधानसभेत या कार्यक्रमाबाबत वाचा फोडली तसेच, या अशा कार्यक्रमांमागे देशद्रोही शक्ती असून ही 'जेएनयू'चीच छोटी आवृत्ती असल्याची टीका केली. मुंबई विद्यापीठांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेंटर फॉर सोशल जस्टीस हे एक स्वायत्त अध्यासन आहे. या ठिकाणी आज दि. २८ मार्च रोजी 'असमानता, भेदभाव, वंचितत्व आणि 'सामाजिक न्याया'ची संकल्पना' अशा विषयावर सेमिनार आयोजित करण्यात आले आहे. या सेमिनारमध्ये दुपारनंतरच्या सत्रात ललिता टी. यांचे 'काश्मीरवरील सैन्याचा ताबा : काश्मिरी महिलांवरील लैंगिक अत्याचार' अशा विषयावर व्याख्यान ठेवण्यात आले आहे. अतुल भातखळकर यांनी आज ही बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून देत हा भारतीय सैन्याचा अपमान करणारा कार्यक्रम असल्याची टीका केली. तसेच, यामागे देशद्रोही शक्ती असून ही 'जेएनयू'चीच छोटी आवृत्ती असल्याचा आरोप भातखळकर यांनी केला.


शिक्षण विभागाकडून दखल
अतुल भातखळकर यांच्या या आरोपाची दखल शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतली. ते म्हणाले की, हे अध्यासन हे विद्यापीठाचा स्वायत्त विभाग आहे. तिथे अशी काही माणसं आहेत जी मानवाधिकाराच्या नावाखाली काहीही बोलतात. भारतीय सैन्य विरोधातील हे सत्र होता कामा नये यासाठी विद्यापीठाच्या कुलगुरूंना सूचित करण्यात आले असून, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्यापर्यंतही हा विषय पोहोचवण्यात आला असल्याचे तावडे यांनी सांगितले.


अखेर वादग्रस्त व्याख्यान रद्द !
आज दुपारनंतरच्या सत्रात होणारे हे वादग्रस्त व्याख्यान रद्द करण्यात आल्याचे समजते. याबाबत या सेमीनारच्या आयोजकांशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली. 'सैन्याचा काश्मीरवरील ताबा : काश्मिरी महिलांवरील लैंगिक अत्याचार' या विषयावरील सदर व्याख्याता ललिता टी. या सदर सेमिनारलाच अनुपस्थित राहिल्याचे समजते. मात्र, त्या अनुपस्थित राहण्याचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.



@@AUTHORINFO_V1@@