प्रकाश आंबेडकरांना जे सांगितले, तेच विधानसभेत सांगितले !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2018
Total Views |

 

 

 
 
भिडे गुरूजी प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टीकरण
 

एल्गारमुळे लोकांना लढायला जात आहोत असे वाटू लागले !

 

मुंबई : संभाजीराव भिडे गुरूजींची अटक व त्यांच्याबाबत असलेले पुरावे याबद्दल भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना आदल्या दिवशी जे सांगितले तेच दुसऱ्या दिवशी विधानसभेत सांगितले, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच, डाव्या संघंटनांनी भीमा-कोरेगाव हिंसाचारापूर्वी आदल्या दिवशी पुण्यात आयोजित केलेल्या एल्गार परिषदेमुळे, भीमा-कोरेगावला जाणाऱ्या सामान्य भाविकांनाही आपण तिथे लढायला जात आहोत, असे वाटू लागल्याची टीकाही फडणवीस यांनी केली.

 

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सांगतेनंतर विधानभवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. भीमा-कोरेगाव प्रकरणाविषयी ते म्हणाले की, मिलिंद एकबोटे हे घटनेच्या आदल्या दिवशी त्या भागात गेले होते. त्यांनी पत्रकार परिषदही घेतली होती. तसेच, व्हिडिओंमध्ये दिसणाऱ्यांपैकी अनेकजण एकबोटेंशी संबंधित असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच, डाव्या संघटनांनी केलेल्या एल्गार मोर्चामुळे भीमा-कोरेगावला जाणाऱ्या सामान्य भाविकांनाही आपण लढाईला चाललो असल्याचे वाटू लागले. प्रत्यक्षात एल्गार परिषदेतील कोणीही भीमा-कोरेगावला मात्र गेले नाहीत, हेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच, संभाजी भिडे गुरूजींच्या अटकेसाठी प्रकाश आंबेडकरांनी काढलेल्या मोर्चादरम्यान घेतलेल्या भेटीत त्यांना मी जे सांगितले, तेच मी दुसऱ्या दिवशी विधानसभेत सांगितले, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीबाबतच्या बातम्यांबाबत ते म्हणाले की, माझी उद्धव ठाकरे यांच्याशी संध्याकाळी सहा वाजता भेट ठरली होती. परंतु, अंतिम आठवडा प्रस्तावावर माझे उत्तर ५.३० वाजता सुरू झाले. ते ७ पर्यंत चालणार हे लक्षात आल्यावर मी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याद्वारे उद्धव यांना निरोप पाठवला. त्यानंतर, कामकाज संपल्यावर माझी आणि उद्धव ठाकरे यांची फोनवरून चर्चाही झाली असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले. तसेच, नवनिर्वाचित राज्यसभा खासदार नारायण राणे हे विधानभवनात आल्याबद्दल मला माहितीही नव्हती, हेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.

@@AUTHORINFO_V1@@