शिक्षकांच्या प्रश्नांना नक्कीच न्याय देणार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2018
Total Views |

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची ग्वाही


 
मुंबई : विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवितानाच शिक्षकांच्या प्रश्नांना नक्कीच न्याय देण्यात येईल. तसेच त्यांचे प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यात येतील, अशी ग्वाही शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी दिली. तसेच छत्रपती शिवाजी महाराज, फुले, आंबेडकर, शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या राज्यातील बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना आणि खेडयापाडयावरील कातकरी समाजातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्वक शिक्षण देण्याचे काम अधिक गतीने करत राहणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
 
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मोठया आकाराची अक्षरे असलेली पाठयपुस्तके तयार करुन या मुलांमध्ये नविन विश्वास निर्माण केला. दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय घेऊन विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केल्याचे तावडे यावेळी म्हणाले. तसेच पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची ज्ञानपातळी मोजण्यासाठी पायाभूत चाचण्यांचे आयोजन करण्यात आले असून याचा फायदा राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना झाला. १०वीच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडील कल जाणून घेण्यासाठी आणि करिअर निवडीसाठी गेल्या दोन वर्षांपासून कलमापन चाचणी घेण्यात येत आहे. याचादेखील लाभ ३० लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना झाला असल्याचे तावडे म्हणाले.
 
आमचा हेतू शुद्ध
आम्हाला मिळालेल्या कालावधीत शिक्षण विभागाने अनेक चांगले आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतले. निर्णय घेताना आमचा हेतू हा शुद्ध आणि चांगला होता. मात्र, शिक्षण क्षेत्रातील काही लोकांनी शिक्षण विभागातील निर्णयांचा चूकीच्या पद्धतीने अपप्रचार केला असल्याचे तावडे म्हणाले.
 
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा ध्यास घेऊन काम
राज्यातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याच्या दृष्टीने काम केले आहे. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा ध्यास घेऊनच हे सरकार काम करत आहे. त्यामुळे भविष्यात कोणीही टिका केली तरीही राज्याचे गुणवत्तापूर्ण शिक्षण अधिक गतीने वाढविण्यासाठी आपण कटीबद्ध असल्याचे शिक्षणमंत्री म्हणाले.
 
फेरपरिक्षेचा विद्यार्थ्यांना फायदा
दहावीच्या विद्यार्थ्यांची फेरपरिक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. पहिल्या वर्षी ५७ हजार विद्यार्थ्यांना तर दुसऱ्या वर्षी ३७ हजार विद्यार्थ्यांना झाला. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे वर्ष वाचले. दहावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेतून नापास हा शिक्का हद्दपार केल्याचे तावडे यावेळी म्हणाले.
 
शिक्षकांना निवडणुकीची कामे न देण्याबाबत विनंती
शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देण्याबाबत चर्चा उपस्थित करण्यात आली होती. दरम्यान, निवडणूक आयोगाशी चर्चा करण्यात आली असून निवडणूकीची कामे शिक्षकांना न देण्याबाबतची विनंती करण्यात आलेली असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले.
 
गोपीनाथ मुंडे अध्यसन केंद्राचा आराखडा तयार
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विदयापीठाअंतर्गत सुरु करण्यात येणारे गोपीनाथ मुंडे अध्यसन केंद्राचा आराखडा तयार करण्यात आला आहे. हे अध्यसन केंद्र लवकर पूर्ण करण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार असल्याचे तावडे यांनी सांगितले.
 
@@AUTHORINFO_V1@@