वाघ-सिंह एकत्र, उंदिरांची काय भीती ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2018
Total Views |


मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल, २०१९ मध्ये युतीचे संकेत ?


मुंबई : उंदिरांनी पोखरण्याची आम्हाला भीती वाटत नाही कारण इथे 'वाघ' आणि 'सिंह' एकत्र आहेत. वाघ आणि सिंह कधी उंदिरांना भीत नाहीत, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत लगावला.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आरोप केलेल्या मंत्रालयातील 'उंदीर निर्मूलन' प्रकरणाचा आधार घेत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सरकारला उद्देशून बरीच टोलेबाजी केली होती. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, हे 'उंदीरपुराण' मनोरंजक व कल्पक होते. विखे-पाटील आपण उत्तम लेखक किंवा पटकथाकार होऊ शकता असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. तसेच, उंदीर पोखरण्याची आम्हाला भीती वाटत नाही, कारण इथे 'वाघ-सिंह' एकत्र आहेत. वाघ आणि सिंह उंदिरांना भीत नाहीत. त्यामुळे आम्ही आमच्या वाटेत येणाऱ्या उंदिरांचा निःपात करू आणि २०१९ मध्ये पुन्हा जनतेच्या आशिर्वादाने निवडून येऊ, असे म्हणत आगामी नाही निवडणुकीत भाजप व सेनेदरम्यान युती होण्याबाबत संकेत दिले.

राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही गेल्या काही दिवसांपूर्वीच भाजप व शिवसेनेत युती होईल अशा आशयाचे विधान हे विधानसभेतच केले होते. आज 'उंदिरपुराणा'च्या निमित्ताने थट्टा मस्करीत का होईना, स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनीच भाजप-शिवसेनेच्या एकत्र असण्याबाबत आणि पुढेही राहण्याबाबत स्पष्ट संकेत दिले असल्याने राजकीय क्षेत्रातील भुवया उंचावल्या गेल्या आहेत.


आणि, वाघ-सिंहाची भेट झालीच नाही !

एकीकडे सभागृहात मुख्यमंत्री भाजप व शिवसेनेच्या एकीबाबत बोलत असताना दुसरीकडे खुद्द शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांशी ठरलेली भेट मात्र रद्दच झाली. उद्धव ठाकरे हे आज सायंकाळी ५ च्या दरम्यान विधानभवन येथे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी येणार होते. मात्र, मुख्यमंत्री पूर्णवेळ विधीमंडळ कामकाजात व्यस्त राहिले. त्यात नेमके स्वतः मुख्यमंत्र्यांचेच अंतिम आठवडा प्रस्तावावरील उत्तर असल्याने मुख्यमंत्र्यांना विधानसभेत थांबावेच लागले. यामुळे उद्धव यांच्या मुख्यमंत्री भेटीची वेळ आधी ५ वरून ६ झाली, मग ६ ची ७ झाली आणि दोन तासांच्या विलंबानंतर अखेर ही भेट रद्द झाली. त्यानंतर मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांच्यामध्ये फोनवरून चर्चा झाल्याचे समजते.


@@AUTHORINFO_V1@@