प्रबुध्द जाणिवांची समृध्द वाटचाल

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2018
Total Views |



आंबेडकरी वैचारिक चळवळीतील परिवर्तनवादी साहित्यिक प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या निधनाने या चळवळीतील एक प्रमुख स्तंभ निखळला आहे. त्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या व्यक्तित्त्वाचा घेतलेला हा वेध.

ज्या मानवी समुहाचं अस्तित्व, अस्मिता आणि स्वाभिमान प्रतिगामी प्रस्थापित मठाधिपतींनी कित्येक वर्षापूर्वी इतिहास जमा केला, त्या समुहाची अस्मिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या प्रखर प्रज्ञासूर्याने मिळवून दिली. त्यांना सामाजिक समतेच्या अस्तित्वाची जाणीव प्राप्त करुन दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वैचारिक अंगाने समाज जागविला, शोषित - पीडितांना समाजभान दिलं, जो वैचारिक अंगार चिल्यापिल्यांना दिला तो वैचारिक अंगार विझू न देण्याचं काम ज्यांनी ज्यांनी केलं त्यापैकी प्रा. डॉ. गंगाधर पानतावणे हे एक. उपेक्षित, दीनदुबळ्या शोषितांची अस्मिता टिकविण्याचं ऐतिहासिक काम आंबेडकरी वैचारिक चळवळींनी केलेले आहे.

‘अस्मितादर्श’ ही एक वैचारिक सामाजिक चळवळ असून डॉ. गंगाधर पानतावणे या चळवळीचे अध्वर्यू म्हणून ओळखले जातात. हा फुले आंबेडकरी चळवळीचा आरसा आहे. प्रत्येकाने या आरशात पहावं, त्या सर्वांना डॉ. पानतावणेंनी जपलेल्या निष्ठा व अस्मिता दिसतील. नव्याने जागलेल्या आणि आपल्या अस्मितेचे मोहोळ उठविणार्‍या समाजाचे साहित्य ही बाब भारतीय साहित्याला नवखी होती. प्रसिध्दीचे साधन नसलेल्या दलित लेखक, कवी, विचारवंतांना आपल्या हक्काच्या मंचाची आवश्कता होती. सरांनी ‘अस्मितादर्श’ द्वारे हा मंच अशा नवख्यांना उपलब्ध करुन दिला. पानतावणे सर समीक्षक, संशोधक आणि विचारवंत त्यामुळे त्यांनी अस्मितादर्शला नव्या वाड्:मयीन जाणिवा, नव्या वाड्:मयीन प्रवृत्ती जोपासण्याची ताकद दिली. आज अस्मितादर्श आणि पानतावणे एक पूरक समीकरण झाले आहे.

अस्मितादर्श ही एक सामाजिक, वैचारिक चळवळ असल्याने अन्य त्याला त्यांनी धंदेवाईक चेहरा कधीच येऊ दिला नाही. पानतावणे म्हणतात की, ‘आम्हा साहित्यिकांचे प्रेरणास्थान डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. सामाजिक आणि राजकीय संघर्षातून आमच्या साहित्याची उत्पत्ती आहे. त्यामुळे आम्हाला निष्ठा आणि व्यवहार यात निष्ठेला अग्रक्रम द्यावा लागेल.’ म्हणूनच डॉ. पानतावणे सरांनी वैचारिक सामाजिक चळवळ साहित्याद्वारे गतीमान केलेली दिसते. त्यासाठी त्यानी अनेक माध्यमांचा वापर केला. काही कवी लेखकांची पुस्तकं प्रकाशित केली. विविध प्रकारचे वैचारिक परिसंवाद ‘अस्मितादर्श’द्वारे प्रकाशित आणि आयोजित केले.



डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मानवी संवेदना आणि तत्त्वज्ञान, सामाजिक मूल्यांची जाणीव व परिवर्तनाचा ध्यास सरांनी आपले ध्येय मानले. वाड्:मयीन नियतकालिकाच्या क्षेत्रात ‘अस्मितादर्श‘द्वारे स्वतंत्र, मूलभूत असा ठसा उमटविला. स्वच्छ ध्येयाने आणि निस्पृह कष्टाने या चळवळी उभ्या राहतात, त्यांना मानमरातबाची अथवा उपहासाची पर्वा नसते. डॉ. पानतावणेंनीसुध्दा आपल्यापरीने काम केले. त्यांची चिकाटी, निष्ठा आणि प्रबळ इच्छाशक्ती त्यांना सतत काम करण्यास प्रवृत्त करीत असे.

दलित साहित्य चळवळीला प्रारंभीच्या काळात प्रस्थापित साहित्य चळवळीकडे आणि साहित्यिकांकडे साशंकतेने पाहिले जात होते. साहित्य हे दलित असतं का ? असे प्रश्‍न उपस्थित करण्यात आले. वास्तविकत: दलित साहित्य चळवळीला प्रारंभीच्या काळात नाकारण्याची ही युक्ती होती. यासाठी डॉ. पानतावणेंनी अस्मितादर्शच्या विशेषांकातून समर्पक उत्तरे दिलीत. आव्हानांना समर्थपणे वैचारिक पातळीवरुन तोंड दिलेल्यांपैकी डॉ. पानतावणे सुध्दा एक होते. विविध वैचारिक परिसंवादाद्वारे त्यांनी या प्रश्‍नांना वाचा फोडली. त्यातून त्यांनी समाज आणि साहित्याची परस्पर पूरकता पटवून दिली. दलित ही संज्ञा एका विशिष्ट जातीचा संकेत करणारी नाही, तर ती एक जाणीव आहे. दलित साहित्य हे पारंपरिक समाजव्यवस्थेला, साहित्य संकल्पनेला छेद देणारे ठरले. नव्या मानवी संवेदनांना सामोरे जावून स्वत: चे अनुभवविश्व शब्दांकित करण्याचे काम दलित साहित्यिकांनी केले. त्यासाठी त्यांनी अस्मितादर्शचा यथायोग्य वापर केलेला आहे. नव्या अनुभव विश्वाला अस्मितादर्शद्वारे अग्रक्रम दिला. त्यासाठी स्वत: चे राग - लोभ बाजूला ठेवले. कधीही कुणाच्याही गटातटाचे म्हणून ते दिसले नाही किंवा त्यांनी कुणाचा दुस्वासही केला नाही. म्हणूनच आज असंख्य कवी, लेखक, साहित्यिकांचे नाव अस्मितादर्शशी पर्यायाने डॉ. पानतावणे सरांशी जोडल्या गेलेलं आहे. ‘अस्मितादर्श’ला ‘साहित्यिक व लेखक निर्मितीची प्रयोगशाळा’ म्हटले तर अतिशयोक्ती ठरु नये. सर म्हणजे परिस. त्यांनी ज्यांच्या साहित्याला अस्मितादर्शमध्ये स्थान दिले असे असंख्य लेखक, कवी आज स्वत: आवर्जून उल्लेख करुन स्वाभिमानाने सांगतात की, मला प्रथम अस्मितादर्शने माझ्या लेखनाचा मार्ग खुला करुन प्रोत्साहन दिले.

डॉ. पानतावणे म्हणजे आंबेडकरी जाणीवांचा सौंदर्य विचार. बुध्द, फुले, आंबेडकरी विचारांचे नवीन साहित्य निर्मिणे, सामाजिक मूल्य सांगण्याचे आणि प्रत्यक्ष कृतीत आणण्याचे दिशादर्शक काम त्यांनी केले आहे. त्याचे प्रतिबिंब त्यांच्या मूल्यवेध (१९७२), विद्रोहाचे पाणी पेटले आहे (१९७६), दलितांचे प्रबोधन (१९७८), मूकनायक (१९७८), वादळाचे वंशज (१९७८), प्रबोधनाच्या दिशा (१९८४), पत्रकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१९८७), हलगी (१९९०), चैत्य (१९९१), लेणी, स्मृतिशेष इ. ग्रंथांमधून दिसून येते. ज्या ग्रंथाचे त्यांनी संपादन केले आहे त्याठिकाणीही त्यांनी हीच दृष्टी आणि निष्ठा कायम ठेवलेली आहे. डॉ. गंगाधर पानतावणे यांनी संपादित केलेले ग्रंथ धम्मचर्चा (१९६३), विचारयुगाचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर (१९८१), दलित कथा (१९८०), दलित आत्मकथन (१९८५), महारांचा सांस्कृतिक इतिहास (१९८६), लोकरंग (१९८७), दलित साहित्य : चर्चा आणि चिंतन (१९९४), लोकचळवळीचे प्रणेते : महात्मा फुले (१९९४), तसेच त्यांच्या सतत होणार्‍या लेखनांमधूनही आंबेडकरी निष्ठेविषयी कुठेही प्रतारणा केलेली दिसणार नाही, किंवा बांधीलकीही सुटलेली दिसत नाही.

दलित साहित्यिकांना पूर्वी सभा संमेलनात स्थान मिळत नव्हते, म्हणून १९७४ पासून सरांच्या नेतृत्वाखाली अस्मितादर्शच्या लेखक वाचकांचा साहित्यिक मेळावा आयोजण्यास प्रारंभ झाला. या मेळाव्याचे आज अस्मितादर्श साहित्य संमेलनात रुपांतर झाले आहे. खोट्या राष्ट्रनिष्ठांवर ही मंडळी अस्मितादर्शच्या वैचारिक मंचावरुन तुटून पडली. आज आंबेडकरी विचारवंतांची पिढीच्या पिढी उभी करण्यामागे अस्मितादर्शचा पर्यायाने पानतावणे सरांचा फार मोठा वाटा आहे. त्यांनी आपले अध्यापनाचे काम सांभाळून एक साक्षेपी संपादक म्हणूनही अस्मितादर्शचा दर्जा कायम टिकवून ठेवला. त्यातून साहित्यिकांची पिढी घडवितांना जागृतीच्या स्फोटाच्या काळात अविष्काराला वाव मिळवून देण्याचे काम करतांना जागृतीला विधायक स्वरुप देऊन एक प्रभावी विचारक्षेत्र निर्माण करुन देण्याचे महान कार्य डॉ. पानतावणे यांनी केले आहे. म्हणून प्रसिध्द विचारवंत डॉ. मा. प. मंगुडकर पानतावणेंना दलित साहित्यिकांचे ‘पॉवर हाऊस’ म्हणतात. या पॉवर हाऊसने फुले, आंबेडकरी विचारांच्या चळवळीचा गाडा समर्थपणे चालविला. दलितांचे उपेक्षित जीवन चित्रीत करतांना दलितांच्या शौर्याच्या नोंदीही विशेष अंकातून टिपलेल्या दिसतात. म्हणून प्रख्यात दलित साहित्यिक शंकरराव खरात अस्मितादर्शला ‘दलितांचे गॅझेट’ संबोधतात. डॉ. पानतावणेंनी प्रबुध्द जाणिवांच्या समृध्द वाटचालीत आपल्या व्याख्यानातून सामाजिक प्रबोधनाच्या दिशा उजळविण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यांचे लेखन, व्याख्यान, सामाजिक जाणिवांचा विचार पसरविणारे असते. त्यात त्यांनी अनुभवाचा सच्चेपणा जपलेला असून ते बुध्द, फुले, आंबेडकरी संस्कृतीचे नाते टिकवीत आहेत. आज ही प्रबोधनाची मशाल शांत झाली असली तरी तिने प्रबुद्ध केलेली मने ही परंपरा पुढे चालवणार आहे, यात शंका नाही.

- सुरेश साबळे
@@AUTHORINFO_V1@@