... ‘तो’ निर्णय अखेर मागे - विनोद तावडे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-Mar-2018
Total Views |



विद्यार्थी, पालकांचा जीव भांड्यात पडला


मुंबई : शाळांच्या वार्षिक परीक्षा संपल्यानंतरही ३० एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाने मागे घेतला आहे. राज्य विद्या प्राधिकरणाने काढलेल्या या आदेशानंतर सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. मात्र विधीमंडळाच्या कामकाजाच्या अखेरच्या दिवशी शिक्षणमंत्र्यांनी हा निर्णय मागे घेण्याची घोषणा केली.

राज्यातील सर्व शाळांमधील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांचे अध्ययन ३० एप्रिलपर्यंत सुरू ठेवण्याचा आदेश राज्य विद्या प्राधिकरणाकडून काढण्यात आला होता. यामुळे शाळांचे वेळापत्रक, उत्तरपत्रिकांची तपासणी, विद्यार्थी पालकांचे गावी जाण्याचे बेत सर्वच कोलमडणार होते. त्यामुळे सर्वच स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत होती. राज्यातील सर्व शाळांच्या दीर्घकालीन सुट्ट्यांचा कलावधी निश्चित करण्याच्या उद्देशाने सदर निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान १ मे रोजी महाराष्ट्र दिन साजरा केल्यानंतर उन्हाळी सुट्ट्या देण्यात याव्यात असे या आदेशात नमूद करण्यात आले होते. तसेच या कालावधीत विद्यार्थ्यांसाठी गोष्टी, नाटके, कविता यांची पुस्तके वाचणे, हस्तकला, चित्रकला, लोककला, कार्यशाळा घेणे, क्रीडा शिबीरांचे आयोजन करणे असे निरनिराळे कार्यक्रम आयोजित करण्याच्या सुचना प्राधिकरणाच्या आदेशाद्वारे करण्यात आल्या होत्या. दरम्यान, सत्राच्या अखेरीस असे निर्णय झाल्याने त्याचा परिणाम शाळेच्या इतर कामकाजावर पडण्याची शक्यता होती. अनेक पालक गावी जाण्यासाठी दोन तीन महनांपूर्वीच तिकिटं आरक्षित करून ठेवतात, त्यालाही याचा फटका बसण्याची शक्यता होती. मात्र, हा निर्णय मागे घेतल्याने सर्वांचा जीव भांड्यात पडेल अशी प्रतिक्रिया एका शाळेच्या मुख्याध्यापकांनी संपर्क साधल्यास नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.

हा निर्णय केंद्र सरकारच्या आदेशानंतर घेण्यात आला होता. गरज भासल्यास पुढील शैक्षणिक वर्षात हा निर्णय लागू करण्यात येईल.
विनोद तावडे,
शिक्षणमंत्री
@@AUTHORINFO_V1@@