मातृभाषेतील महाजाल...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2018
Total Views |



सरकारी योजनांची माहिती आणि लाभ, डिजिटल पेमेंट्‌सचा वापर, ई-कॉमर्स, ऑनलाईन नोकरीचा शोध, उद्योग-व्यवसाय अशा जवळपास सर्वच क्षेत्रांत विकासाची गंगा प्रवाहित करायची असेल तर भारतीय भाषांच्या ऑनलाईन विस्ताराचे जाळे अधिक घट्ट विणावे लागेल. तसेच, केवळ प्रमाणभाषाच नाही तर बोलीभाषांचाही या संवाद प्रक्रियेत समावेश कसा करता येईल, याचाही विशेषत्वाने विचार होणे काळाची गरज आहे.

नेल्सन मंडेला सांगून गेले की, ‘‘तुम्ही एखाद्या व्यक्तीशी त्याला समजेल अशा भाषेतून संवाद साधलात तर ती गोष्ट त्याच्या मेंदूपर्यंत पोहोचते, पण जर तुम्ही त्या व्यक्तीशी त्याच्याच भाषेत संवाद साधलात, तर ती गोष्ट त्याच्या हृदयाला भिडते.’’ मंडेलांचे हे थोर विचार भारतीय भाषा आणि इंग्रजीच्या वापराबाबतही अगदी तंतोतंत लागू होतात. त्यामुळे इंग्रजी ही भारतातील दुसर्‍या स्थानावरील संवाद भाषा असली तरी ती आपल्या सर्वांच्या काळजाला मात्र हात घालतेच असे नाही. त्यामुळे इंग्रजीच्या तुलनेत भारतीय भाषांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतात आजघडीला २२ अधिकृत भाषा, हजारो बोलीभाषा, विविध लिपी रुढ असून त्यांचा महाजालावरील अर्थात इंटरनेटवरील वापरही निश्चितच दखलपात्र आहे. आज आपल्याला एखाद्या विषयाची माहिती आपल्या मातृभाषेत अगदी सहजगत्या उपलब्ध होते. म्हणजे विकिपीडियाचेच उदाहरण द्यायचे तर, एकट्या मराठी भाषेत ५० हजारांहून अधिक लेख आज विकिपीडियावर मराठी नेटकरींसाठी उपलब्ध आहेत. अभिमानाची बाब म्हणजे, ऑनलाईन सर्वाधिक वाचल्या जाणार्‍या भारतीय भाषांमध्येही आपली मायमराठीच अव्वल! त्यानंतर मग बंगाली, तामिळ, तेलुगू आणि इतर... त्यामुळे भारतीय भाषांनी इंटरनेटवर आपले एक विशिष्ट स्थान निर्माण केले आहेच आणि त्यात भर घालणारी एक आनंदाची गोष्ट म्हणजे, इंटरनेटवरील भारतीय भाषांचे वापरकर्ते वेगाने वाढत असल्याचे एका संशोधनातून समोर आले आहे.

इंटरनेट ऍण्ड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाचा नुकताच प्रकाशित झालेला अहवाल यावर अधिक प्रकाश टाकतो. हा अहवाल भारतीय भाषांच्या वाढत्या ऑनलाईन प्रचार आणि प्रसारामुळे २०० दशलक्ष वापरकर्ते इंटरनेटशी जोडण्याची पूर्ण क्षमता अधोरेखित करतो. म्हणजेच, २३ टक्के इंटरनेट न वापरणारा मोठा वर्ग माहितीच्या मुख्य प्रवाहाशी एकरूप होईल आणि असे झाल्यास जून २०१८ पर्यंत भारतात इंटरनेट वापरकर्त्यांची संख्या तब्बल ५०० दशलक्षच्या घरात पोहोचल्यास आश्चर्य वाटायला नको. तेव्हा, आजच्या या युगात माहितीचे माहात्म्य तसे सर्वज्ञातच. वर्तमानात तर हाच ज्ञानप्रवाह इंटरनेटवरील माहितीमधून अविरत वाहणारा. त्यामुळे छपाई क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवणार्‍या गुटेनबर्गपासून ते गुगलपर्यंतचा माहितीचा हा प्रवास अगदी मन थक्क करणारा. पंधराव्या शतकात छपाई क्षेत्रातील क्रांतीमुळे ज्ञान आणि माहितीचे विकेंद्रीकरण शक्य झाले. सर्वसामान्यांच्या आवाक्यापलीकडचे ज्ञानाचे दरवाजे छापील माध्यमांनी सताड उघडले. ज्ञानाचं सार्वत्रिकीकरण झालं. साक्षरतेला नागरी मूल्यं म्हणून जगमान्यता मिळाली. पुढेही छपाईच्या तंत्रज्ञानात कालपरत्वे आणि तांत्रिक अनुषंगाने आमूलाग्र प्रगती होतच गेली. संगणकाने छपाईच्या तंत्रज्ञानाची गती अधिकच वाढली.

फॉन्टस्‌चे महत्त्वही याच काळात वाढीस लागले. विविध लिपींनीही मग छापील माध्यमात आपली विशेष छाप उमटवायला प्रारंभ केला. त्यातही युनिकोडमुळे भारतीय भाषांना इंटरनेटवर एक स्वतंत्र अस्तित्व, एक वेगळा आवाज मिळाला. मुद्रित माध्यमांपर्यंतच कुंपणमर्यादा आखलेल्या भारतीय प्रादेशिक भाषांना एक जागतिक व्यासपीठ उपलब्ध झाले. जगाच्या कुठल्याही कोपर्‍यातून आपल्या मातृभाषेत व्यक्त होण्याची, माहिती मिळविण्याची, ती संपादित करण्याची कधीकाळी अशक्यप्राय वाटणारी गोष्ट युनिकोडने सहससाध्य करून दाखविली. त्यामुळे साहजिकच युनिकोडपूर्वी भारतीय भाषांचे सॉफ्टवेअर पुरविणार्‍या कंपन्यांची मक्तेदारीही मोडीत निघाली. कारण, ही भाषांची सॉफ्टवेअरच मुळात महागडी. म्हणजे, १५ हजारांचा लॅपटॉप आणि सात हजारांचे सॉफ्टवेअर. म्हणजेच, घोड्यापेक्षा त्याची नालच महाग, अशी काहीशी विचित्र स्थिती. परंतु, युनिकोडने या भाषांच्या ठेकेदारांना दणका देत, भारतीय भाषा इंटरनेटच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या मोबाईलपर्यंत पोहोचविली. थोडक्यात, युनिकोडने भारतीय भाषाभगिनींना एकाच ज्ञानकक्षेत आणले आणि माहितीचे प्रादेशिकीकरण शक्य झाले.

रामायण-महाभारतापासून ते आधुनिक लेखकांचे ब्लॉग्‌सही सर्वसामान्यांच्या आवाक्यात आले. मुक्त माध्यमांच्या सहजतेमुळे विविधांगी लेखन-विचारांचा प्रवाहही परंपरागत लेखक, प्रकाशकांच्या मक्तेदारीतून ‘मुक्त’ झाला. याच मुक्त माध्यमांनी ज्यांच्या लिखाणात ताकद आहे, आशयघनता आहे त्यांना लेखकतुल्य, कविसमान दर्जा बहाल केला. एकूणच काय तर अनेकविध विचारांची देवाणघेवाण इंटरनेट आणि मुक्त माध्यमांमुळे अगदी दैनंदिन झाली. त्यातच ‘आंतरभारती’ संकल्पनेमुळे भारतीय भाषांमधील साहित्यिक देवाणघेवाण वृद्धिंगत झाली. साहित्यिक अनुवादांना चालना मिळाली आणि एका विशिष्ट भाषेतील ज्ञानाचा खजिनाही मग या महाजालावर इतर भारतीय भाषांमध्ये वाखाणला जाऊ लागला. त्यामुळे भारतीय भाषांचा इंटरनेटवरील प्रभाव हा नक्कीच दुर्लक्षित करून चालणार नाही. भारतीय भाषांना इंटरनेटवर मानाचे आणि मोलाचे स्थान मिळाले असले तरी त्याने अगदीच हुरळून जाण्याचेही कारण नाही. इंटरनेटवरील भाषिक आकडेवारीवर एक नजर टाकली असता, इतर देशांच्या भाषांच्या तुलनेत भारतीय भाषांचा ऑनलाईन वाटा हा केवळ . टक्के इतकाच! त्याउलट इंटरनेटवर इंग्रजीनंतर सर्वाधिक वापरली जाणारी भाषा म्हणजे चीनची मांदारिन भाषा. त्याचे कारण म्हणजे चीनने त्यासाठी अवलंबिलेले रीतसर धोरण. याचाच मथितार्थ म्हणजे, भारतीय भाषांच्या इंटरनेटवरील प्रचार आणि प्रसारार्थ आणखी खूप मोठा पल्ला आपल्याला गाठावा लागेल.

परकीय भाषा, माध्यमे याविषयीचे गांधींजींचेयंग इंडियामधील एक विधान आजही तितकेच सूचक वाटावे. गांधीजी म्हणतात, ‘‘परकीय माध्यमांमुळे बालकांचा मेंदू थकतो आणि बुद्धीला मांद्य येते. त्यामुळे ती केवळ घोकंपट्टी आणि पोपटपंची करतात.’’ आजच्या इंग्रजी भाषेतील शिक्षणाचीही कमी-अधिक प्रमाणात हीच गत पाहायला मिळते. पण, हेही तितकेच खरे की, आजच्या काळात इंग्रजी किंवा परकीय भाषांचे महत्त्व दुर्लक्षित करून चालणारही नाही. इंग्रजीचेच काय, फ्रेंच, जर्मनसारख्या परदेशी भाषाही शिकायला हरकत नाही. पण, हा परदेशी कैवार घेताना आपल्यामातृभाषेला आपणमृतभाषेकडे तर ढकलत नाही ना, याची कुठे तरी जाणीव ठेवलीच पाहिजे आणि तसे होऊ द्यायचे नसेल तर केवळ गुगलच नाही, तर भारतीय कंपन्यांनीही प्रादेशिक भाषा ऑनलाईन वापरात कशा येतील, याचा सर्वंकष विचार करायलाच हवा. तसा विचार आज हळूहळू रुजत असला तरी खासकरूनडिजिटल इंडियाचे स्वप्न साकार करण्यासाठी भारतीय भाषांच्या सर्वसमावेशकतेशिवाय पर्याय नाहीच. कारण, इंटरनेटवर सर्वाधिक (७६ टक्के) भारतीय भाषा वापरणारा वर्ग हा ग्रामीण भारतातील आहे आणि शहरीइंडियामध्ये हेच प्रमाण ६६ टक्के आहे. त्यामुळे सरकारी योजनांची माहिती आणि लाभ, डिजिटल पेमेंट्सचा वापर, -कॉमर्स, ऑनलाईन नोकरीचा शोध, उद्योग-व्यवसाय अशा जवळपास सर्वच क्षेत्रांत विकासाची गंगा प्रवाहित करायची असेल तर भारतीय भाषांच्या ऑनलाईन विस्ताराचे जाळे अधिक घट्ट विणावे लागेल. तसेच, केवळ प्रमाणभाषाच नाही तर बोलीभाषांचाही या संवाद प्रक्रियेत समावेश कसा करता येईल, याचाही विशेषत्वाने विचार होणे काळाची गरज आहे. कारण अशिक्षित, पण आपल्या मातृभाषेत संवाद साधू शकणार्‍या शेवटच्या रांगेतील शेवटच्या व्यक्तीपर्यंत ही क्रांती जेव्हा पोहोचेल, तेव्हाच ती सर्वार्थाने फलस्वरूप होईल.

@@AUTHORINFO_V1@@