सरकारी रुग्णालयांत सुरू होणार प्री-कॅन्सर डिटेक्शन सेंटर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2018
Total Views |

केमोथेरपीची सुविधाही उपलब्ध होणार : आरोग्यमंत्री

 
 
 
 
मुंबई : राज्यातील प्रत्येक सरकारी रुग्णालयात टप्प्या-टप्प्याने कर्करोग पूर्व तपासणी केंद्र (प्री- कॅन्सर डिटेक्शन सेंटर) सुरू करण्याची घोषणा आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी विधानसभेत केली. तसेच, या ठिकाणी केमोथेरपीची सुविधाही उपलब्ध करण्याचा प्रस्ताव असल्याचे ते म्हणाले.
 
कर्करोगाच्या उपचार सुविधांबाबत विधानसभेत उपस्थित झालेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना डॉ. दीपक सावंत बोलत होते. मुंबईतील मालवणी येथे नुकतेच असे प्री कॅन्सर डिटेक्शन सेंटर सुरु केले असून पुढील महिन्यात तेथे केमोथेरपी सुविधा उपलब्ध करणार असल्याचे त्यांनी सांगितले. याच धर्तीवर, राज्यातील प्रत्येक शासकीय रुग्णालयात प्री- कॅन्सर डिटेक्शन सेंटर आणि केमोथेरपीची सुविधा उपलब्ध करुन देण्याची घोषणा त्यांनी केली. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून कॅन्सर रुग्णांना सध्या केमोथेरपीच्या दोन टप्प्यांचा लाभ देण्यात येत असून यापुढे हा लाभ उपचारासाठी चार टप्प्यांचा करता येईल का, यावर विचार करण्यात येईल. तसेच टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेली ‘कॅन्सर वॉरिअर’ ही संकल्पनाही अधिक प्रमाणात राबवण्याचे सूतोवाच त्यांनी केले.
 
जनआरोग्य योजनेतून ६८ हजार कर्करोगग्रस्तांना केमोथेरपी
महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून सरकारी आणि खासगी अशा एकूण २२९ रुग्णालयात वेगवेगळ्या कर्करोगावर उपचार केले जातात. त्यामध्ये ६८ हजार ३०० रुग्णांना केमोथेरपीचे उपचार देण्यात आले असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी यावेळी दिली. तसेच, रेडिओथेरपीच्या माध्यमातून ५९ हजार ८३८ रुग्णांवर उपचार करण्यात आले असून ३८ हजार ३८४ इतक्या रुग्णांवर शस्त्रक्रियेच्या माध्यमातून उपचार करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.
 
गोवंडीत कर्करोगग्रस्तांसाठी निवासव्यवस्था उभारणार
टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असलेल्या रुग्णांना या उपचारांदरम्यान निवासाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यासाठी पूर्व उपनगरांतील गोवंडी येथे दोन इमारती बांधण्याचा प्रस्ताव असल्याचीही माहिती आरोग्यमंत्र्यांनी यावेळी दिली. तिथे सुमारे ३०० सदनिकांची सोय करण्यात येईल. या ठिकाणी जीवनावश्यक सेवांसह आपत्कालीन परिस्थितीत उपचारासाठी डॉक्टरही उपलब्ध राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
 
@@AUTHORINFO_V1@@