कर्नाटक निवडणुका : १२ मे रोजी मतदान, तर १५ मे ला मतमोजणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2018
Total Views |

 
 
नवी दिल्ली : संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक निवडणुकांची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. येत्या १२ मे या दिवशी कर्नाटक विधानसभेसाठी मतदान घेण्यात येणार असून त्यानंतर लगेच १५ मे रोजी मतमोजणी घेण्यात येणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. 


निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ओ.पी.रावत यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये कर्नाटक निवडणुकांसंबंधी सविस्तर माहिती दिली. येत्या मे महिन्यामध्ये कर्नाटक विधानसभेचा कार्यकाळ समाप्त होत असून मे महिन्यामध्येच कर्नाटकातील २२४ विधानसभा जागांसाठी निवडणुका घेण्यात येणार असल्याचे रावत यांनी सांगितले. तसेच ही निवडणूक एकाच टप्प्यात होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


तसेच निवडणूक कार्यक्रमाबद्दल माहिती देताना, येत्या १७ एप्रिलला निवडणुकीसंबंधीची अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात येईल व २४ एप्रिल ही उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख असेल, असे आयोगाने स्पष्ट केले. यानंतर १२ मेला संपूर्ण राज्यामध्ये मतदान घेण्यात येणार असून त्यानंतर अवघ्या दोन दिवसांनीच म्हणजे १५ तारखेला मतमोजणी होणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

निवडणूक आयोगाची संपूर्ण पत्रकार परिषद :


 
याचबरोबर कर्नाटक निवडणुकांसाठी इव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीनचा वापर करण्यात येणार असल्याचे आयोगाने सांगितले. कर्नाटक राज्यात एकूण ४ कोटी ९६ लाख मतदार असून या सर्वांच्या सोयीसाठी आयोगाकडून यंदा विशेष व्यवस्था करण्यात आली असल्याचे आयोगाने सांगितले. तसेच मतदानादरम्यान कसलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून सुरक्षेच्या दृष्टीने देखील विशेष काळजी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

असा असेल निवडणुकीचा कार्यक्रम...

१. १७ एप्रिल - निवडणुकीची अधिसूचना होणार जारी

२. २४ एप्रिल - उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख

३. १२ मे - राज्यातील २२४ जागांसाठी होणार मतदान

४. १५ मे - मतमोजणी

@@AUTHORINFO_V1@@