जाणीवपूर्वक धनगर समाजाला आरक्षण नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2018
Total Views |

विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांचा सरकारवर आरोप

 
 
 
मुंबई : निवडणुकीदरम्यान भारतीय जनता पक्षाने धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. सरकारला आता सत्तेत येऊन साडेतीन वर्षांचा कालावधी उलटला आहे. मात्र, अद्यापही धनगर समाजाला आरक्षण देण्यात आले नसून सरकार जाणीवपूर्वक धनगर समाजाला आरक्षण देण्याचे टाळत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर केला.
 
धनगर समाजाच्या आरक्षणावर चर्चेच्या मागणीसाठी विधान परिषदेत स्थगन प्रस्ताव मांडण्यात आला. मात्र सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी स्थगन फेटाळला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धनगर समाजाच्या प्रत्येक कार्यक्रमाला जात असताना आरक्षण देण्याची ग्वाही देतात, मात्र प्रत्यक्षात आरक्षण देण्याबाबत कार्यवाही करत नसल्याचे ते म्हणाले. यावर आता टाळाटाळ होत असल्याचे जनतेच्या लक्षात आले असून जनता त्यांना घरचा रस्ता दाखवल्याशिवाय राहणार नसल्याचेही त्यांनी नमूद केले.
 
टाटाला काम देणे संवैधानिक आहे का?
 
धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वेक्षणाचे काम टाटा सोशल इन्स्टिट्यूटला देण्यात आले आहे. एखाद्या समाजाला आरक्षण द्यावे किंवा नाही याचे सर्वेक्षण करण्यासाठी टाटा सारख्या इन्टिट्यूटला काम देणे संवैधानिक आहे का? असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला. सर्वेक्षण करताना लग्न झाले आहे का? मुले किती? असे प्रश्न विचारण्यात आले आहे. आरक्षण देण्याबाबतच्या सर्वेक्षणात सदर प्रश्न विचारण्याची आवश्यकता काय असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.
 
लिंगायत समाजाची अल्पसंख्यांक दर्जाची मागणी
 
राज्यातील लिंगायत समाज इतर राज्याप्रमाणे अल्पसंख्यांक दर्जा मिळावा, अशी मागणी करत आहे. बहुसंख्य लिंगायत समाज अतिशय मागासलेला असून त्यांना अल्पसख्यांक दर्जा देणे आवश्यक आहे. लिंगायत समजाबाबत चर्चा करण्यासाठी देखील स्थगन प्रस्तावाची मागणी करण्यात आली. मात्र, सभापतींनी ती फेटाळत चर्चा नाकारली.
 
@@AUTHORINFO_V1@@