भिडे गुरुजींविरोधात एकही पुरावा नाही ! : मुख्यमंत्री

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2018
Total Views |



‘भीमा-कोरगाव’प्रकरणी विधानसभेत स्पष्टीकरण


मुंबई : भीमा-कोरेगाव येथे घडलेल्या हिंसाचार प्रकरणामध्ये शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजीराव भिडे गुरुजी यांचा सहभाग असल्याचा एकही पुरावा नाही, तसेच भिडे यांच्याविरोधात तक्रार करणारी महिला ही भिडेंना साधी ओळखतही नसल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली.

विधानसभा नियम २९३ अन्वये राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावर विरोधी पक्षांतर्फे प्रस्ताव मांडण्यात आला होता. या प्रस्तावावर उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या चर्चेदरम्यान विरोधी पक्षांतील नेत्यांनी भीमा-कोरेगाव प्रकरणी संभाजीराव भिडे यांना अटक करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, या प्रकरणात एका महिलेने मिलिंद एकबोटे व भिडे यांच्याविरोधात तक्रार केली होती. मिलिंद एकबोटे यांना केवळ उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार अटक झाली नाही, तर सरकारने त्यांच्या अटकेसाठी सर्व प्रयत्न केले. मिलिंद एकबोटे यांना पकडण्यासाठी पथक तयार होते. ते फार होते. उच्च न्यायालयात अॅटर्नी जनरल यांनी पोलीस कोठडी मागून घेण्याची विनंती केली व त्यानुसार एकबोटे यांना पोलीस कोठडीही मिळाली. मात्र, भिडे गुरुजी यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा एकही पुरावा नाही, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तसेच, तक्रारदार महिला ही भिडे यांना साधी ओळखतही नाही. तक्रारदार महिलेने कॅमेऱ्यासमोर सांगितले की आपण भिडेंना पाहिलेही नाही. प्रकरणातील साक्षीदारांनीही हीच साक्ष दिली असल्याचे ते म्हणाले. मात्र, तरीही या प्रकरणाची चौकशी बंद केली नसल्याचेही फडणवीस यांनी नमूद केले.

घडलेली घटना गंभीर असून महाराष्ट्राला कलंक आहे. त्यामुळे घटनेला कोणीही जबाबदार असो, त्याला सोडले जाणार नाही. यात अगदी माझ्या घरचे सामील असले तरी त्यांना सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणात संभाजीराव भिडे गुरुजींचा सहभाग असल्याचा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक संघटनांनी केला होता. तसेच, भिडे यांना अटक करण्याची मागणी करत सोमवारी भारिप-बहुजन महासंघातर्फे ‘एल्गार मोर्चा’ही आयोजित करण्यात आला होता व त्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी मुख्यमंत्र्यांची भेटही घेतली होती. मात्र, त्यानंतर लगेचच आज मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाच्या तपासातील ही महत्वपूर्ण बाजू स्पष्ट केली.
 
 
@@AUTHORINFO_V1@@