पदार्थाच्या सहा अंगांच्या अभ्यासाची सुरुवात कशी करायची ?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    27-Mar-2018
Total Views |


राजा विक्रमाची आणि वेताळाची भेट ही केवळ विक्रमासाठी किंवा प्रजाजनांसाठीच नव्हे तर जंगलातल्या सर्व स्थिर चरांसाठी औत्सुक्याचा विषय ठरू लागली होती. कारण त्या भेटींमध्ये आता पदार्थविज्ञानाच्या मुख्यत: वैशेषिक पदार्थविज्ञानाच्या आधारस्तंभांविषयी – म्हणजे द्रव्य (substance), गुण (properties), कर्म (actions), सामान्य (classification), विशेष (individuality) व समवाय (inherence) – या पदार्थाच्या सहाअंगांविषयी अधिक उत्सुकता निर्माण झाली होती. जणू लोकांच्या हातात कोणीतरी खजिन्याच्या चाव्याच दिल्या होत्या. पण या चाव्यांनी कुठलं कुलुप उघडतं हे कळत नव्हतं. शिवाय यातील पहिलं कुठलं अंग तपासायाचं, या सहा अंगांमध्ये काही साम्य आहे का? वगैरे अनेक प्रश्न आता वैशेषिकात रस घेऊ लागलेल्या जिज्ञासूंना पडू लागले होते.

“काय रे विक्रमा, पदार्थाची सहा अंगे सांगितलीस, उदाहरणेही सांगितलीस, पण या अभ्यासाची सुरुवात कशी करायची हे सांगितलंच नाहीस? अभ्यास करताना पहिलं द्रव्य पहायचं का गुण हे पण नाही सांगितलंस..”विक्रमाच्या शक्तिवान खांद्यावर आरूढ होत वेताळाने त्याच्या प्रश्नाची सरबत्ती सुरु केली.

“वेताळा एखाद्या वस्तूला मग ती जमीन, पाणी, ऊन यांसारखी इंद्रिय गोचर असो वा तरंग, स्थल, काल, मन इत्यादि बुद्धीला कळणारी असो, त्या वस्तूला जेव्हा माणसाने अभ्यासायला सुरुवात केली, तस तसे त्याला वेगवेगळे अर्थ प्राप्त व्हायला सुरुवात झाली. प्रशस्तपादांच्याच शब्दांत,

षण्णामपि पदार्थानामस्तित्त्वाभिधेयत्वज्ञेयत्वानि |11|

(To all the six categories belong the properties of being-ness, predicability and congnisability.)

पदार्थाच्या साही अंगांमधले साम्य म्हणजे त्यांना अस्तित्व असते, शब्दांत व्यक्त करता येते व ती जाणून घेता येऊ शकतात.

म्हणजेच पदार्थातील द्रव्ये, गुण, कर्मे इत्यादि सहा अंगांद्वारे त्या वस्तूला विविध अर्थ प्राप्त होतात व माणूसच त्याला पदार्थ म्हणजेच 'विविध अर्थ प्राप्त असलेली वस्तू' करून टाकतो. अजाणतेपणाकडून जाणतेपणाकडे जायचा हा प्रवास.”

“उदाहरण दे रे उदाहरण..”

“ समजा एक सैनिक लढता लढता शत्रुदेशाच्या सीमेलगत आलाय. गुप्तचरांनी सांगितल्यानुसार सर्वत्र भुसुरुंग तसेच तापलेले लोहगोळे पडलेले आहेत अशी त्याला खबर आहे. प्रत्येक पाऊल तो सावधपणे टाकतोय. समोर एखादी अज्ञात वस्तू पडलेली आहे..ती टणकशी वाटतेय, राखाडी मातीपासून वेगळी दिसतेय, लोखंड वगैरे एखादा धातूच असावा पण रंगावरून तर तसे वाटत नाहिये..मग लक्षात येते की तप्त लोखंड हे जरा लालसरपणाकडे झुकते..हे झालं तोफगोळे हुडकण्याविषयी..भुसुरंगासाठीही तो प्रत्येक ठिकाणी चाचपत पुढे जातो..जमीन सगळीकडे सारखीच टणक आहे, का काही ठिकाणी तो टणकपणा कमी जास्त होतोय, रंग बदलतोय हे तो पाहात जातो. म्हणजेच तो पहिल्यांदा द्रव्य ओळखतो, मग त्या द्रव्याचे गुण, मग हालचाली, मग ते द्रव्य कुठल्या गटात मोडते, शिवाय त्या द्रव्याचे विशेष काय आणि त्या मग ते द्रव्य पदार्थाचे अविभाज्य घटक आहे का कसे हे पाहतो..कारण या श्लोकातच म्हटल्याप्रमाणे या सहाही गुणांना काही विशिष्ट अस्तित्व असते, ती जाणून घेता येतात व ती शब्दांमध्ये व्यक्तही करता येतात..”



“अरे उदाहरणातच रममाण झालास.. पण हे सांग की ही द्रव्ये आहेत की नाहीत हे कसे कळायचे?”

“वेताळा प्रशस्तपाद ऋषींनी म्हटलंय, 
आश्रितत्वञ्चान्यत्र नित्यद्रव्येभ्य:||12||

The character of being dependant (upon something else) belongs to all things except the eternal substances.

स्थायू (solid), द्रव(liquid), तेज (energy), वायू(gas) ही भूतद्रव्ये इतरांवर अवलंबून असतात. आकाश(plasma), काल(time), स्थल(space), आत्मा(self/atma) व मन(mind) ही महाभूतद्रव्ये इतरांवर अवलबून नसतात.

आपल्या गोळ्याच्या उदाहरणात लोखंड हे पृथ्वीद्रव्य व उष्णता हे तेजद्रव्य ही भूतद्रव्ये आहेत. ही द्रव्ये इतर घटकांवर अवलंबून असतात. म्हणजे पृथ्वीरूप हे तेजावर अवलंबून आहे. हाच गोळा सूर्यावर असता तर तेथील तेजरूप उष्णतेमुळे तर ते आकाशरूपात(plasma) अवस्थेत असते. पण हे अवलंबित्व फक्त पृथ्वी, आप, तेज व वायू यांनाच लागू पडते. बाकीची द्रव्ये म्हणजे आकाश, काल, स्थल, मन व आत्मा ही इतरांवर अवलंबित किंवा आश्रित नसतात.”

“म्हणजे या ठिकाणी तू स्वतंत्र व परतंत्र द्रव्ये सांगितलीस. भूते ही एकमेकांवर अवलंबून असणारी द्रव्ये आहेत व महाभूते ही स्वतंत्र आहेत असे तू म्हणतोस. पण ही द्रव्ये तिथे आहेत हे मुळात कळतंच कसं?”

“अरे वेताळा, द्रव्य ओळखण्यासाठी त्याचा गुणच ओळखावा लागतो. हा गुणच ते द्रव्य तिथे आहे हे सांगतो. या अतूट संबंधालाच समवाय संबंध म्हणतात. या समवायामुळेच तर द्रव्य कळतं..माणसाला पदार्थाचं तापमान जाणवलं की तिथे उष्णता किंवा तेजद्रव्य आहेच हे कळतं. आवाज आला की आकाश द्रव्य कळतं. असे या पदार्थाच्या द्रव्य, गुण, कर्म, सामान्य व विशेष यांमध्ये कुठल्यानाकुठल्या प्रकारचे समावाय वा अतूट अन्योन्य संबंध अस्तित्त्वात असतातच. प्रशस्तपाद म्हणतात, 
 
द्रव्यादीनां पञ्चानां समवायित्वमनेकत्वञ्च ||13||

To the five, Substance and the rest, belong the characters of inherability and plurality.

द्रव्ये, गुण, कर्म, गट व विशेष हे संख्येने अनेक आहेत व ते अविभाज्य घटकांचे बनलेले असतात.

जसं आपण पाहिलं तसं द्रव्ये ९ आहेत. त्यांचे एकुण २४ गुण आहेत. त्यांच्या हालचाली या ५ मुख्य प्रकारच्या आहेत. शिवाय त्यांचे गट तर अनेक आहेत. शिवाय त्या पदार्थांचे विशेषगुण म्हणजे लहानात लहान कण हे त्यांमधील द्रव्यांनुसार अनेक आहेत. शिवाय आपण आधी म्हटलं तसे त्यांमध्ये समवाय संबंधही आहेत.”

“हे ठिक आहे रे विक्रमा, पण हा समवाय का काय त्याचा जरा आधुनिक संदर्भ दे रे.. स्पष्ट कर जरा.. अनेक समवाय संबंध कसे ते ही सांग”

“समजा आधुनिक युगातला भ्रमणध्वनी आहे तुमच्याकडे. तर त्यावर असलेली माहिती म्हणजे फोटो किंवा व्हिडिओ पाहायचे असतील तर त्यामध्ये काय अत्यावश्यक आहे? तर ती माहिती व ती बघण्याठी बॅटरी असणं. त्यातून सिमकार्ड काढलं तरी चालेल. हा एक समवाय संबंध. पण जर त्या फोनवरून बोलायचं असेल. संदेश पाठवायचे असतील तर त्याफोन मध्ये बॅटरीशिवाय सिमकार्ड अत्यावश्यक व ते चालू स्थितीतील असलं पाहिजे. शिवाय तो फोन नेटवर्क म्हणजेच तरंगांच्या सान्निध्यात असला पाहिजे. तरंग म्हणजेच आकाश. हा झाला दुसरा समवाय संबंध. त्यात अधिक माहिती साठवणारी मेमरी चिप असली काय नसली काय त्याने थोडी अडचण येईल अतिरिक्त माहिती झाल्यावर..पण फोन करणे, बोलणे बंद पडणार नाही म्हणून त्या मेमरी चिपशी समवाय संबंध नाही.”

“बरं पण विक्रमा हे सगळं तू सांगतोस खरं. पण या अभ्यासाला सुरुवात कुठून करायची?”

“वेताळा, पदार्थविज्ञान हा माणसांच्या जीवाभावाचा मित्र आहे. पण अतिपरिचयामुळे उपेक्षित आहे. माणूस पदार्थविज्ञान उठता बसता वापरतच असतो. वैशेषिकात ते सूत्रबद्ध केलंय इतकंच.

प्रशस्तपादऋषींनी म्हटलंय, 
गुणादीनां पञ्चानामपि निर्गुणत्वनिष्क्रियत्वे ||14||

To the five, Quality and the rest, also belong the character of being devoid of qualities, and that of being without action.

फक्त द्रव्यांनाच गुण(properties) असतात व त्यांच्याच बाबतीत कर्मे(actions) संभवतात. गुण, कर्म, सामान्य, विशेष व समवाय हे निष्क्रीय असतात व त्यांना स्वत:चे कोणतेही गुण नसतात.

म्हणजेच पदार्थाच्या अभ्यासाची सुरुवात ही त्यातील द्रव्यांना हुडकून काढल्यावर सुरु होते. सैनिकाच्या उदाहरणात आधी त्याने तो लोखंडाचा गोळा असावा, पण त्याआधी तो स्थायू किंवा पृथ्वीद्रव्य आहे हे टणकपणावरून ओळखले. प्रथम पृथ्वीद्रव्य ओळखले. या द्रव्यालाच आता बाकीची अंगे म्हणजे गुण, कर्म,सामान्य वगैरे येऊन चिकटणार. उजाडमाळरानावर जसा अग्नि पसरू शकत नाही तसेच द्रव्यांशिवाय बाकीची अंगे शिरु नाहीत. म्हणून द्रव्य ओळखणे ही पहिली पायरी. तर अशी अभ्यासाची सुरुवात झाली”

“अभ्यासाची सुरुवात? अभ्यास म्हणजे कसं शास्त्रज्ञांनी करायची गोष्ट आहे. रणांगणावरचा सैनिक जीव वाचवणार का तुझ्या पदार्थाचा अभ्यास करायला वह्या पुस्तक घेऊन बसणार?”

“अरे वेताळा, अभ्यास किंवा सतत मनन, चिंतन, आकलन करणं हा माणसाचा नैसर्गिक कल आहे. ते त्याच्याकडून सहजच होतं..श्वासोच्छवासासारखं..आता मी श्वास घेतो असं तो ठरवून घेत नाही. तसंच आता मी अभ्यास करतो असं तो ठरवत नाही. त्याचे डोळे, कान, नाक, त्वचा, जीभ ही त्याची इद्रिये कायम त्याच्या मेंदूला माहिती पुरवत असतात..ही पडद्यामागे सतत चालणारी प्रक्रीया आहे. तिला जेव्हा सजगपणे जाणतेपणाने माणूस करतो तेव्हा त्याला पदार्थाच्या धर्माचे आकलन किंवा ऋषी प्रशस्तपादांच्या भाषेत पदार्थधर्म..”

“अरे मानवांना ज्यात त्यात धर्म घुसवण्याची फार हौस..असो..मलाही कळतंय की धर्म म्हणजे त्या पदार्थाची असण्याची व वागण्याची विशिष्ट पद्धत..बर तर सैनिकाला पृथ्वीद्रव्य कळलं..आता पुढे सांग..”

“वेताळा इंद्रियांद्वारे जाणवणारी द्रव्ये.. म्हणजे या लोहगोळ्याच्या बाबतीत पृथ्वी व त्याचा गरमपणामुळे कळणारे तेज हे द्रव्य कळल्यावर त्याच्या गुण म्हणजे रंग, रूप इत्यादि गुणांचा अभ्यास, मग त्याचे कर्म म्हणजे हालचाल कशी होते हा अभ्यास करायचा. त्यानंतर सामान्य अंग म्हणजे ते द्रव्य कोणत्या गटात मोडते म्हणजे लोखंड हे धातूंच्या गटात मोडते हे कळते. आता गट पाहिल्यावर मग त्या गटातील म्हणजे इतर धातूंपेक्षा ते वेगळे कसे आहे याचा अभ्यास करायचा. त्यासाठी त्या लोखंडाचे लहानात लहान कण केल्यानंतरही काय शिल्लक उरते ते पाहायचे. लोखंडाच्या बाबतीत त्याचा अणू उरतो. तांब्याच्या अणूपेक्षा तो वेगळा असतो. हे झाले विशेष अंग. मग हे पाहिल्यानंतर ते विशेष असल्यानेच त्या पदार्थाला अर्थ येतो व नसल्यास तो पदार्थच नष्ट होतो का ते पाहायचे. लोखंडाचा प्रत्येक अणू दाटीवाटीने त्या गोळ्यात बसलेला आहे. ते अणू गेले तर तो गोळाच नष्ट होईल. म्हणून त्या लोखंडाच्या अणूचा व त्या गोळ्याचा अतूट किंवा समवाय संबंध आहे. शिवाय त्यातील तेजाचा म्हणजेच उष्णतेचा त्याच्या तापमानाशी अतूट संबंध आहे. तेज गेले की तापमान गेले. म्हणून तेजाचा व तापमानाचा अतूट संबंध आहे.”

“कळला रे अतूट संबंध. पण मला सांग की ही अनेक द्रव्ये एखाद्या पदार्थात असू शकतात. तू म्हटलास तसं तापलेल्या लोखंडाच्या गोळ्यात तेजातील बदलामुळे लोखंडाचे गुण बदलतात. मग मला सांग की यात पदार्थाची कोणकोणती अंगे बदलतात? या बदलाला काय म्हणतात?”

“वेताळा, या बदलाला भौतिक बदल म्हणतात. प्रशस्तपाद म्हणतात,
कारणत्वञ्चान्यत्र पारिमाण्डल्यादिभ्य: ||17 ||


The quality of being the cause belongs to all (substances, qualities and actions) except the atomic measure.

दुसऱ्या कशालातरी कारण होणे हे विशेषत्व सोडून बाकी सर्वांना लागू होते.

“कसं कोड्यात बोलल्यासारखं वाटतंय. कारण होणे म्हणजे रे काय?”

“म्हणजे असं बघ वेताळा, पाणी आहे आणि ते विशिष्ट कक्ष तापमानाला आहे. त्याचा स्पर्शगुण (temperature) आपण समजा ३८ अंशांपासून १०० अंशांपर्यंत वाढवत नेला तर त्यातलं पाणी वाफेत परिवर्तित होईल. म्हणजे आप द्रव्यापासून वायू द्रव्यापर्यंतचा बदल. तेच तापमान ० अंशापर्यंत खाली आणलं तर बर्फ म्हणजेच पृथ्वी द्रव्यात रुपांतर. पण तरीही पाण्याचा विशेष रेणू हा पाण्याचा विशेष रेणूच राहिला. जो पर्यंत पाण्याचा रेणू हा तिथे कायम आहे तो पर्यंत तो भौतिकबदल(physical change). जर काही कारणाने जर तो रेणू दुसऱ्या कशाततरी बदलला तर मात्र त्या द्रव्याचे व पर्यायाने पदार्थाचेच अस्तित्त्व संपते तो होतो रासायनिक बदल(chemical change).”

“काय रे विक्रमा एकाच विषयात किती विषय घुसवतोस.. किती फाटे फोडतोस.. पण आता या क्षणी मात्र मला गेलं पाहिजे. वैशेषिकात म्हटलंय तसं काल द्रव्य फार चंचल आहे व आताचा काळ सांगतोय की मला परत गेलंच पाहिजे. पुन्हा येईनच मी विक्रमा या भौतिकबदलांविषयी बोलायला.. तोपर्यंत विचार करुन ठेव. चांगली चांगली उदाहरणं शोधून ठेव. येतो मी विक्रमा हाऽहाऽऽहाऽऽऽ”

विक्रमा भोवतीचं जग त्या काळापुरतं तरी विखुरलं. प्रजाजन झोपी गेले. किर्र अंधार झाला. चंद्र पेंगुळला. सारथी मनातल्या मनात विचार करत राहिला की हे चंद्रकला दिसणं..वाढत जाणं..कमी होत जाणं हा कसला बसल असावा बरे..पदार्थविज्ञान गुरुंना विचारलं पाहिजे..

(क्रमश:)

- अनिकेत कवठेकर
@@AUTHORINFO_V1@@