रावणांपासून मुंबईला वाचवा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Mar-2018   
Total Views |
 
 
 
अतिक्रमण, गँगवॉर, बॉम्बस्फोट, दंगली, कसाबचा क्रूर, न विसरता येणारा हल्ला किती किती मुंबईने सहन केलंय. दुर्दैवी मुंबई.. तिची लालसा सगळ्यांना पण तिच्या उद्ध्वस्तेत हातही या सगळ्यांचाच.. मुंबईचा गुन्हा काय तर मुंबई महाराष्ट्राची सर्वार्थानेच राजधानी. मग राज्यात काय अगदी विदेशी दुश्मनांनाही महाराष्ट्रात देशात अगदी जगामध्येसुद्धा अराजक माजवायचे असेल तर मुंबईला वेठीस धरणे हा एकमेव सॉलिड पर्याय त्यांच्यापुढे असतो.
 
 
आता २०१८ साल तर मुंबईला ’थांब बाई’ म्हणतच उगवले की काय कोण जाणे? कोणीही यावे टपली मारून जावे, या खेळासारखे मुंबईत बंद, आंदोलन करत मुंबईचे जीवन विस्कळीत करण्याचे सध्या युगच आले आहे. (अर्थात याला अपवाद म्हणून शांतीपर्वूक आंदोलन, मोर्चे आणि बंदही आहेत) असो, कोणत्या ना कोणत्या महामानवाचे नाव घेऊन मुंबईच्या रस्त्यात बसकण मारायची. मुंबईच्या रेल्वे ट्रॅकवर चार दोन जणांनी आडवे पडायचे. मोजून दुसर्‍या मिनिटाला मुंबईच्या वाहतुकीचे बारा वाजतात. मग पोटापाण्यासाठी घड्याळ्याच्या काट्यावर जगणारे आणि मरणारे मुंबईकर मुंबईसकट आतून बाहेरून कोलमडून पडतात. हतबल होतात. त्याचवेळी बंद करणारे, आंदोलन करणारे न जाणो कोणत्या विघातक प्रवृत्तीने सरकारी आणि खाजगी वाहने तोडतात जाळतात. एकट्या दुकट्या प्रवाशांना धमकावतात, आमचा बंद/आंदोलन/मोर्चा असताना तुम्ही घराबाहेर पडताच कसे? आम्हाला काय *** समजता? त्यावेळी घाबरून नव्हे तर चिखलात दगड का टाकायचा म्हणून लोक गप्प बसतात. मनातल्या मनात संतापत घरची वाट धरतात.
 
इकडे प्रसारमाध्यमात बातमी प्रसारित होत राहते. बंदला/आंदोलनाला/मोर्चाला मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. ज्यांनी मुंबईला वेठीस धरलेले असते, अशा बंद/आंदोलन/ मोर्चे काढणार्‍या तथाकथित नेत्यांचेही विजयी आवेशात भाषण ठरलेले असते की, मुंबईकरांनी स्वतःहून बंद ठेवून आम्हाला समर्थन दिले. पठ्ठे बापूरावांची लावणी आहे, मुंबई नगरी बडी बाका, जशी रावणाची दुसरी लंका.. बंद/आंदोलन आणि मोर्च्याला वैतागलेले मुंबईकर मात्र मनात म्हणतात, मुंबईनगरी बडी बाका आहेच पण ती रावणाची लंका नाही तर तिला वेठीस धरणारे, तिला जबरदस्तीने बंद पाडणारे रावण आहेत. मुंबईकरांच्या मनात सध्या एकच विचार आहे, ’’या असल्या रावणांपासून मुंबईला वाचवा!’’
 
0000000000000000000000
 
महामानवाच्या मताचा आदर
 
 
आपल्याकडे कम्युनिस्ट माओइझमची दडपशाही नसल्यामुळे लोकांना आंदोलने, मोर्चे बंद वगैरे करण्यास बंदी नाही. पण तरीही स्वतंत्र भारतात लोकांना त्रासदायक होतील, अशी आंदोलन-बंद करणारे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते पाहिले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या थोर द्रष्टेपणाची आठवण आल्याशिवाय राहत नाही. एके ठिकाणी बाबासाहेब म्हणतात, ’’जेव्हा घटनात्मक मार्ग खुले असतात तेव्हा घटनाबाह्य मार्गाचे काहीही समर्थन असू शकत नाही. रक्तमय क्रांती, कायदेभंग, असहकार व सत्याग्रह या मार्गाचा पूर्णपणे त्याग केला पाहिजे हे मार्ग म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून अराजकाचे व्याकरण आहे. जितक्या लवकर त्यांचा त्याग केला जाईल तितके आपल्या देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने अधिक चांगले होईल. बाबासाहेबांचे हे मत आठवण्याचे कारण हेच की दर आठवड्याला मोर्चे, आंदोलन आणि बंद यांचे जणू महापीकच आले आहे. त्यामुळे देशाचे, समाजाचे किती आर्थिक नुकसान होते किंवा त्यातही हे आंदोलन जर विशिष्ट समाजाविरुद्ध, विशिष्ट विचारधारेविरुद्ध असतील तर समाजात किती दुभंगलेपण येत असेल याबद्दल विचारही करवत नाही.
 
अर्थात आंदोलन खरोखरच लोकांच्या कल्याणासाठी, प्रगतीसाठी होत असेल तर ठीक आहे, पण याउलट शोषित वंचितांच्या नावाखाली आपले अस्तित्वाचे वांझोटे निखारे फुलविण्याचे काम यामध्ये केले जाते आहे. बाबासाहेबांच्या नुसत्या नावाखातरही समाज जगायला आणि मरायलाही तयार आहे. समाजाच्या या भोळेपणाचा फायदा घेत समाजाचे काही स्वयंघोषित धूर्त नेते, तथाकथित विचारवंत बाबासाहेबांनी संपूर्णपणे नाकारलेल्या कम्युनिस्टांच्या संकल्पनेतला संवेदनाशून्य संघर्ष, रक्तरंजित क्रांती वगैरे संकल्पना बाबासाहेबांच्या नावानेच समाजासमोर मांडत आहेत. निळे डोळे लाल स्वप्न वगैरेंची भाषा बोलत आहेत. आपले उपद्रवमूल्य वाढवून जास्तीत जास्त नुकसान किंवा भय समाजात पसरवले तरच आपले सामाजिक राजकीय वजन वाढेल, असे त्यांना वाटते आहे. असो, तर मुद्दा असा आहे की, बाबासाहेबांचे मत होते की, लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी रक्तमय क्रांती, कायदेभंग, असहकार व सत्याग्रह या मार्गाचा पूर्णपणे त्याग करायला हवा. महामानवाच्या या विचाराचा, मताचा आपला राज्यघटनाप्रेमी समाज आदर करतो का?
 
 
 
-  योगिता साळवी  
@@AUTHORINFO_V1@@