भिडे विरोधामागचा खरा हेतू...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Mar-2018
Total Views |



श्रीमंत कोकाटेसारख्या जातीयवादी व्यक्तीला सोबत घेऊन प्रकाश आंबेडकर खुद्द बाबासाहेबांच्या विचारांनाच हरताळ फासण्याचे काम करीत आहेत. ‘एक विरुद्ध दुसरा’ उभे करण्याचे हे राजकारण महाराष्ट्रासाठी घातक आहे. 

 
प्रकाश आंबेडकरांनी आपल्या आंबेडकरी सहकार्‍यांसह मुंबईला वेठीस धरण्याचा उद्योग पुन्हा केला. यावेळी त्यांच्या मागे उभ्या राहिलेल्या अनुयायांची संख्या कमी असल्याने त्यांनी मागच्या वेळेसारखे धाडस केले नाही. मात्र, या निमित्ताने महाराष्ट्रातले वातावरण ढवळून निघाले. आज प्रकाश आंबेडकर जे करीत आहेत त्याला निश्चितच एक प्रकारचा वास आहे आणि हा वास एका विशिष्ट समाजाच्या द्वेषातूनच येत आहे. विद्वत्ता आणि अभ्यास या दोन्ही गोष्टी असूनही प्रकाश आंबेडकरांची राजकीय कारकीर्द कधीच बहरली नाही. आज त्यांनी जो काही खेळ मांडला आहे, तो महाराष्ट्राची बसलेली घडी बिघडविणारा आहेच; परंतु त्यामुळे दलित समाजाचेही मोठे नुकसान होणार आहे. जानेवारीत दलित समाज जे वागला, अशा प्रकारची अपेक्षा अन्य समाजाने त्यांच्याकडून कधीच ठेवली नव्हती. आज संभाजी भिडे यांना करावयाच्या अटकेवरून प्रकाश आंबेडकर समाजात दुही माजविण्याचा प्रयत्न करीत आहेत. माणसाचे कर्तृत्व संपले की, त्याला जात आठवायला लागते. प्रकाश आंबेडकरांनीही आज तेच करायला सुरुवात केली. प्रकाश आंबेडकरांची राजकीय कारकीर्द बहरली नाही, कारण त्यांनी बाबासाहेबांचे आडनाव लावले. मात्र, बाबासाहेबांच्या विचारांशी प्रतारणा केली. बाबासाहेबांची मार्क्सवादावरची विधाने आणि भाष्य जाहीर आहे. मात्र, प्रकाश आंबेडकरांनी माओवादी नक्षल्यांची कास धरली. विदर्भात माओवाद्यांनी मारलेल्या दलित बांधवांची संख्या मोठी आहे. मात्र, तरीही प्रकाश आंबेडकर त्याकडे सपशेल दुर्लक्ष करतात.
 
‘‘मुख्यमंत्री आणि पंतप्रधान आपल्याला फारसे मोठे वाटत नाही,’’ हे घटनेला साजेसे विधान आहे काय? संभाजी भिडे यांना अटक करण्यासाठी त्यांनी मोर्चा काढला. मोर्चाला परवानगी नाकारली म्हणून आझाद मैदानावर प्रकाश आंबेडकरांनी सभा घेतली. या सभेत त्यांच्या साथीला कोण आले होते? तर ते होते श्रीमंत कोकाटे. श्रीमंत कोकाटेंचे वैचारिक दारिद्र्य उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. ब्राह्मणद्वेष डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी केलेले लिखाण प्रकाश आंबेडकरांनी वाचले आहे का? ‘‘संभाजी भिडेंना अटक करता येत नसेल, तर मुख्यमंत्र्यांनाच अटक करा,’’ अशी बावळट विधाने हे महाशय तिथे करीत होते. असली जहाल जातीयवादी मंडळी प्रकाश आंबेडकरांना सोबत का हवी आहेत? ब्राह्मणवादाबाबत बाबासाहेबांची मते अत्यंत सुस्पष्ट होती. महाड सत्याग्रहाच्या वेळी बाबासाहेब जे म्हणाले होते ते आज प्रकाश आंबेडकरांना सोईचे नाही. प्रसिद्धीचा जो ‘प्रकाशझोत’ सध्या त्यांनी मिळविला आहे, तो स्वत:वर ठेवायचा असेल तर बाबासाहेबांचे विचार जरा मागे ठेवणेच सोईचे आहे. बाबासाहेब म्हणतात, ‘‘माझा लढा ब्राह्मण जातीविरुद्ध नसून तो ब्राह्मण्यग्रस्त मनोवृत्ती विरोधात आहे.’’ आता ही ब्राह्मण्यग्रस्त मनोवृत्ती म्हणजे काय तर जी मानसिकता जातीय उतरंड मानते, या उतरंडीच्या आधारावर विषमता पसरवू पाहाते, त्या आधारावर स्वत:चे वर्चस्व निर्माण करू इच्छिते, अशी ही मानसिकता आहे. एकेकाळी महाराष्ट्रात असे वातावरण होते. आज मात्र मुळीच तशी स्थिती नाही. समाजसुधारकांनी केलेले काम संपूर्ण समाजाने स्वीकारले म्हणून जातीयवादाच्या भिंती कोसळून पडल्या. नाशिकच्या काळाराम मंदिराच्या बाहेर मंदिर प्रवेशासाठी केलेल्या आंदोलनात बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून उभे राहिलेल्यांची यादी लावली आहे. प्रकाश आंबेडकरांनी ती कधी वाचली आहे काय? आपला हा विचार बाबासाहेबांनी आयुष्याच्या अंतापर्यंत सांगितला.
 
 
अनन्य अन्याय होऊनसुद्धा आपल्या घटना लेखनात त्यांनी कुठल्याही एका ठराविक जातीविरुद्ध मनात द्वेष ठेवला नाही. घटनात्मक कायद्याने समानता यावी असा त्यांचा आग्रह होता. राज्य, भाषा, लिंग, जात या पलीकडे जाऊन भेदाभेद टाळता यावा यासाठी बाबासाहेब आग्रही होते. जाती निर्मूलनाच्या प्रबंधाच्या अखेरीस बाबासाहेबांनी सामाजिक ऐक्याच्या दृष्टीने पोटतिडकीने जो विचार मांडला तो विचार करायला लावणारा आहे. ते म्हणतात,‘‘स्वराज्य तर तुम्हाला मिळणारच आहे. पण ते तुम्ही टिकवू शकाल का? तशी तुमची पात्रता आहे का?’’ जातीपातीत विभागलेला समाज स्वराज्य कसे टिकवू शकतो? सामाजिक सुधारणांचा रथ त्यांनी एका टप्प्यापर्यंत आणून ठेवला. तो पुढे नेण्यापेक्षा मागे ढकलण्याचे कामच आज प्रकाश आंबेडकर करीत आहेत. आपल्या अत्यंत हीन उद्देशासाठी त्यांनी हे चालविले आहे. ज्या राजकीय पक्षाने त्यांना आज पाठिंबा दिला, त्या पक्षाची जातीच्या आधारावर वर्चस्ववाद निर्माण करण्याची वृत्ती आणि सवय प्रकाश आंबेडकरांना माहीत नाही काय? ‘‘जानेवारीत झालेला बंद शांततामय होता,’’ असे प्रकाश आंबेडकर धडधडीत खोटे सांगत आहेत. ऐंशीच्या दशकात महाराष्ट्रात जे घडत होते, दलित-सवर्ण संघर्षामुळे ज्या दंगली महाराष्ट्रात घडत होत्या, तशी कुठलीही प्रतिक्रिया जानेवारीनंतर उमटली नाही. कारण, सर्व समाजाला आता त्या जातीय संघर्षाच्या विषात काहीच रस नाही.
 
 
अकोल्यापलीकडली आपली ओळख उजळविण्यासाठी प्रकाश आंबेडकर जे उद्योग करीत आहेत त्यातून उद्या महाराष्ट्रातले वातावरण बिघडले तर प्रकाश आंबेडकर त्याची जबाबदारी घेणार आहेत काय? जानेवारीतल्या बंदप्रमाणे यावेळीही प्रकाश आंबेडकर त्याची सर्व जबाबदारी सरकारवर ढकलून देतील. महाराष्ट्रात राजकारण करायचे असेल तर अस्तित्वात नसलेली भुते उभी करायची आणि त्यांचे ताबूत नाचवून भीतीचे वातावरण उभे करायचे, असा एक खाक्या आहे. ही भुते जातीय असली की ती लवकर उभी राहातात आणि त्यांचा राजकीय वापरही उत्तम करून घेता येतो. ‘एक विरुद्ध दुसरा’ असा हा लावालावीचा उद्योग आहे. भीमा-कोरेगाव दंगलीत दलितांवर अत्याचार झाल्याच्या जोरदार अफवा पसरविल्या गेल्या. वस्तुत: जे दोन तरुण मृत्युमुखी पडले ते कुठल्या समाजाचे होते? ज्या समाजाने नुकतेच महाकाय मोर्चे काढले त्यांनी यावर कुठलीही आक्रमक प्रतिक्रिया दिली नाही. ती दिली गेली असती तर महाराष्ट्र जातीय वणव्यात पेटला असता. मात्र, स्वत:च्या स्वार्थासाठी प्रकाश आंबेडकरांचे आगीत तेल ओतण्याचे उद्योग सुरूच आहेत. सरकारला ‘‘न्यायालय होऊ नका,’’ असे सांगायला निघालेले प्रकाश आंबेडकर स्वत:च वकील आणि न्यायाधीशाच्या भूमिकेत शिरले आहेत. समाज पोखरणारे हे राजकारण जितक्या लवकर बंद होईल तितके महाराष्ट्रासाठी चांगले!
@@AUTHORINFO_V1@@