दुःखाचा महाकवी ... ग्रेस !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Mar-2018
Total Views |

 
 
ती गेली तेव्हा रिमझिम, तुला पाहिले मी नदीच्या किनारी, घर थकलेले सन्यासी अशा अनेक अजरामर कविता-गाणी लिहून मराठी भावविश्वाला ज्यांनी समृद्ध केले अशा ज्येष्ठ कवी माणिक सीताराम गोडघाटे अर्थात ग्रेस यांचा आज स्मृतिदिन. बा. सी. मर्ढेकर यांच्यानंतर मराठीतील नवकवींच्या पिढीमध्ये ज्यांनी आपला ठसा उमटवला अशा कवी ग्रेस यांनी हे जग सोडून आता सहा वर्षे झाली मात्र अजूनही आपल्या कवितांच्या रुपाने ग्रेस रसिकांच्या हृदयात जिवंत आहेत.
 
 
१९५८ पासून त्यांनी आपल्या काव्यलेखनाला प्रारंभ केला. त्याच काळात इन्ग्रिड बर्गमन या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन त्यांनी ग्रेस हे नाव धारण केले. दी इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस या बोलपटात इन्ग्रिडसंबंधी शी इज इन ग्रेस असे वाक्य येते. हा बोलपट पाहत असताना तिने आपल्याला शीळ घातलेली आहे, असे त्यांना वाटले. त्या लहरीने आपल्या आत्म्यावरची धूळ उडाली आणि प्रतिभा-रूपाचा पहिला साक्षात्कार आपल्याला इन्ग्रिडमध्ये झाला, तिचे ऋण आठवत राहण्यासाठी आपण ग्रेस हे नाव धारण केले, असे त्यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे. संध्याकाळच्या कविता हा १९६७ साली प्रकाशित झालेला त्यांचा पहिला काव्यसंग्रह.
 
 
 
कवी ग्रेस यांनी नागपूर विद्यापीठातून १९६६ मध्ये मराठी विषयात एम.ए. पदवी संपादन तर केलीच पण त्यात सुवर्णपदकही मिळवले. त्यानंतर त्यांनी अनेक वर्षे विविध महाविद्यालयांत व विद्यापीठात प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. ग्रेस यांच्यावर कायमच दुर्बोधतेचा आरोप केला गेला. त्यांच्या कविता समजत नाहीत, भाषा खूप कठीण असते असे अनेक आरोप केले गेले. मात्र या कविता मी स्वतःसाठी लिहितो व स्वगतामध्ये भान नसते तर बेभान व्हायचे असते असे म्हणत त्यांनी अशा आरोपांची कधीच पर्वा केली नाही. वाऱ्याने हलते रान या ललित लेखसंग्रहासाठी त्यांना २०१२ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला. चंद्रमाधवीचे प्रदेश, संध्याकाळच्या कविता, सांध्यपर्वातील वैष्णवी, सांजभयाच्या साजणी यासारखे त्यांचे काव्यसंग्रह तर वाऱ्याने हलते रान, मृगजळाचे बांधकाम, कावळे उडाले स्वामी, ओल्या वाळूची बासरी यांसारखे ललित लेखसंग्रह खूप गाजले. कर्करोगाशी सुमारे तीन वर्षे लढा दिल्यानंतर अखेर वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी २६ मार्च २०१२ रोजी पुण्यात त्यांचे निधन झाले. कवी ग्रेस यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या आठवणींना त्यांच्याच काही गीतांच्या माध्यमातून दिलेला हा उजाळा ...
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@