पाटबंधारे विभागाच्या कोट्यवधींच्या मालमत्तेची दुर्गती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
शासनाने मालमत्ता हस्तांतरित करून पर्यटनाला चालना देण्याची आवश्यकता

पीएमओच्या निर्देशावर अंमलबजावणी होत नसल्याने पर्यटक नाराज
हिवरखेड,
येथून जवळच असलेले वारी हनुमान हे विदर्भातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले तीर्थक्षेत्र असून, येथे निसर्गाने सौंदर्याची देणगी दिल्याने पर्यटकांकरिता पसंतीचे पर्यटनस्थथळ म्हणून वारीची ओळख आहे.शिवाय समर्थ रामदास स्वामी यांनी आपल्या यात्रा काळात येथे श्रीमारूतीची स्थापना केली आहे. म्हणून वारी हे ऐतिहासिक असे ठिकाणही आहे.
अकोला, बुलढाणा, अमरावती या तिन्ही जिल्ह्याच्या सीमेवर शिवाजी महाराजांचे गुरू समर्थ रामदास स्वामींनी प्राणप्रतिष्ठा केलेली हनुमंताची विशाल मूर्ती आहे. बाजूलाच हनुमान सागर हे वान नदीवरील धरण असून, शुद्ध पाण्याने खळखणारी वाननदी आहे. याठिकाणी पर्यटनाला भरपूर वाव आहे. येथे सुविधांचा विकास करण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे आवश्यक आहे.
एकीकडे शासन पर्यटनाला चालना देण्यासाठी नवनवीन प्रयत्न करीत असताना मात्र येथे पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित येत असलेले विश्रामगृह व संबंधित इमारतींची दुर्गती होत असल्याचे भीषण वास्तव समोर येत आहे. येथे पाटबंधारे विभागाच्या चार खोल्या, दोन महाराजा सूट, कॉन्फरन्स हॉल, डायिंनग रूम, दोन ओट्यांचे स्वयंपाकघर, स्टोअर रूम, कर्मचारी क्वार्टर, वाहनतळाच्या खोल्या, समोर मोठी खुली जागा, एवढेच नव्हे तर बाजूला हजारो स्क्वेअर फूटचा कम्युनिटी हॉल, मैदान आहे. सध्या हा सर्व भाग एखाद्या ओसाड घरासारखा दिसत आहे. यातून कोट्यवधींची शासकीय मालमत्ता धूळखात पडली असल्याचे स्पष्ट होते.
उपरोक्त मालमत्तांचा विचार करून या मालमत्ता वन विभाग अथवा एमटीडीसी, पर्यटन विभागाला हस्तांतरित केल्यास येथे पर्यटकांकरिता निवास व्यवस्था, विविध कार्यक्रमांकरिता हॉल, सांस्कृतिक, धार्मिक आयोजनाकरिता उपलब्ध करून दिल्यास शासनाच्या महसुलात वाढ होण्यास व पर्यटनाला चालना मिळण्यास मैलाचा दगड ठरणार आहे.
काही वर्षाआधी अत्यंत चांगल्या अवस्थेत असलेल्या या इमारतींची माकडांनी व चोरांनी पुरती वाट लावली आहे. येथील सर्व दरवाजे, फर्निचर, किमती साहित्यांवर अज्ञात व्यक्तींनी चोरले असून, शासनाने या बाबत पावले न उचलल्यास मालमत्तेच्या जागी मैदान होण्यास वेळ लागणार नाही.
वारी हनुमान येथील पर्यटनाला व विकासाला चालना मिळण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते धिरज बजाज यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे साकडे घालून येथे विविध सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच वाहन पार्किंग ते मंदिर, मंदिर ते हनुमानसागर प्रकल्प, हनुमान सागर ते वाहन पार्किंगपर्यंत रोपवे ट्रॉली सुविधा सुरू करण्याची विनंती केली होती. त्यावर पीएमओने महाराष्ट्र शासनाला निर्देश दिल्यावरही नियोजन समितीने पंचवार्षिक विकास आराखड्यात या कामाचा समावेश केला नाही हे माहिती अधिकारात निदर्शनास आले आहे. त्यामुळे पीएमओच्या निर्देशांचे पालन होत नसल्याबद्दल व पर्यटनाच्या विकासाबाबत शासन फारसे उत्सुक नसल्याने निसर्गप्रेमी पर्यटकांमध्ये निराशा दिसून येत आहे.
चौकट
वारी येथील दोन्ही विश्रामगृह, मनोरंजन सभागृह आदी सर्व बंद अस्थेत आहेत. त्यांच्या विकासाच्या बाबतीत सध्या कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही.
 
- गुल्हाने
उपकार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग, अकोला
@@AUTHORINFO_V1@@