रामनामाचे सामर्थ्य

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Mar-2018   
Total Views |

वीसेक वर्षांपूर्वी संघकामाच्या निमित्ताने मी एका आदिवासी पाड्यावर गेलो होतो. संध्याकाळ झाली होती. काही लोकांच्या भेटी घेऊन परत येण्याचा विचार होता. अंधार झाला तसं काही लोकांनी आग्रह केला की, आता रामकथा ऐकून आणि जेवूनच जा, आम्हाला बरे वाटेल. ठीक आहे म्हणून आम्ही जिथे रामकथेचे वाचन होणार होते तिथे गेलो. स्वाध्याय परिवाराने सुरू केलेला हा उपक्रम होता. एका घराच्या बाहेर थोड्या उंच जागी त्याच गावातील दोन जण बसून रामकथा वाचन करणार होते. दर गुरुवारी रात्री हे वाचन चालायचे. आदल्या गुरुवारी जिथे वाचन संपेल त्यापुढे पुढील गुरुवारी सुरू होत असे. साधारण तासभर हे वाचन चालायचे.

प्रार्थना होऊन कथा सुरू झाली. आश्चर्य म्हणजे वाचन करणारा तरुण संस्कृत श्लोक वाचत होता व रामायणातील त्या प्रसंगाचे वर्णन मराठीत सांगत होता. आदिवासी भागातील लोक संस्कृत वाचून त्याचे मराठी निरूपण करत आहेत हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्का होता. थोड्या वेळात राम वनवासाला निघण्याचा प्रसंग सुरू झाला. आणि वाचन करणाऱ्या तरुण मुलाचा आवाज कापरा होऊ लागला. वाचन करणारा आणि ऐकणारे सगळेच भावुक झाले. कथेतील वर्णन आणि वाचन - श्रवण करणाऱ्यांच्या भावना यांचा अतिशय हृद्य परिणाम मला अनुभवायला मिळत होता. अखेर वाचणाऱ्याला अतिशय गदगदून आले आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. वाचन अशक्य झाल्याने त्यादिवशी रामकथा लवकरच संपवण्यात आली. राम या व्यक्तिमत्वाशी सर्वजण अक्षरशः एकरूप झाल्याचा तो प्रसंग माझ्या मनावर कायमचा कोरला गेला.


माझ्या मनात विचारचक्र सुरू झाले होते. तो एक आदिवासी भाग. आधीच शिक्षणाची सोय नसलेला भाग. त्यात एखाद्या विषयाची गोडी लाऊन तो विधायक उपक्रम नियमितपणे वर्षानुवर्षे चालू ठेवायचा ही प्रेरणा त्यांना कुठून मिळाली ? बहुसंख्य आदिवासी लोक हे शिक्षणापासून दूर राहून व्यसनांच्या आधीन झालेली असताना हे लोक व्यसनापासून दूर राहून एक चांगला उपक्रम करायला का प्रवृत्त झाले असतील ?

मग समर्थांचे वाक्य आठवले - 

सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील तयाचे|
परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहीजे||


कुठलेही कार्य सुरू करा, पण त्यात भगवंत पहा. पाहिजे याचा अर्थ दोन प्रकारे घेऊ शकतो. भगवंत पहा किंवा भगवंत हवा. प्रामाणिक ध्येय आणि विधायक विचार असतील तर ते कार्य यशस्वी होते हा अनुभव आहे.

श्रीरामाचा कालखंड कोणता हे नक्की सांगता येत नाही. वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये रामजन्माच्या वेळची जी ग्रहस्थिती सांगितली आहे, त्याप्रमाणे तो काळ सात हजार वर्षे ते सात लाख वर्षे असा वेगवेगळा सांगितला जातो.

पण रामजन्माचा दिवस चैत्र शुद्ध नवमी यावर मात्र एकमत आहे. रामाचा उल्लेख हा वेदांमध्ये पण आहे हे महा एमटीबीवर दीपाली पाटवदकर यांच्या एका अतिशय माहितीपूर्ण लेखात वाचले.

मनुष्य असूनही सामान्य मनुष्यांमध्ये दुर्मिळ असलेल्या सद्गुणांचा अधिपती असलेल्या व्यक्तींना आपल्याकडे म्हणजे भारतीय संस्कृतीत अत्युच्च असे देवत्व प्राप्त होते. म्हणजे लोक त्या व्यक्तीला देवाच्या रुपात बघतात.

राम ही अशी व्यक्ती आहे की जिच्याविषयी रामायण काळापासून अगदी प्रत्येक पिढीत लिहिले गेले, वाचले गेले. प्रत्येक पिढीने रामाविषयी अभ्यास केला. रामाच्या गुणांविषयी, वैशिष्ट्यांविषयी चर्चा केली.

भारताच्या प्रत्येक भागात जेवढा रामनामाचा प्रसार झाला तेवढा इतर व्यक्तिमत्त्वांचा खचितच झाला असेल. राम हे नाव भारताच्या प्रत्येक राज्यात सापडते. पूर्वेला मिझोराम या राज्याच्या नावातच राम आहे. बिहार मध्ये रामविलास, बंगालमध्ये सीताराम (येचुरी मार्क्सवादी असले तरी त्यांनी नाव बदललेले नाही). रामभाऊ तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात सापडतात. अयोध्येपासून अडीच हजार किमी दूर केरळ आणि तामिळनाडूमध्ये तर घराघरात सितारामैय्या आणि रामन, सीतारमण सापडतात. भारताबाहेर इंडोनेशियामध्ये आजही राम हे नाव ठेवले जाते, रामलीला सादर केली जाते.

म्हणजेच राम ह्या व्यक्तीने रामायण काळापासून हजारो वर्षांपासून जनमानसात घर केले आहे. ज्या काळात वाहतुकीची साधने नव्हती, संदेशवहन व्यवस्था आजच्या प्रमाणे नव्हती, त्या काळात रामकथा आसेतु हिमाचल पसरवण्याचे कार्य करून भारताला सांस्कृतिकदृष्ट्या एक करण्याचे कार्य संतांनी केले.

समर्थ रामदासांनी भारतभर भ्रमण केले होते. तेव्हा त्यांनी लोकांचे रामावरचे प्रेम, रामाविषयी असलेली भक्ती याचे निरीक्षण केले असावे. त्यामुळेच त्यांनी अनेक ठिकाणी राम मंदिरांची, हनुमान मंदिरांची स्थापना करून लोकांना एकत्र करण्याचे कार्य केले. लोकांची देशभक्ती जागृत होऊन स्वराज्याच्या कामाला हातभार लावण्याचे कार्य ह्या मंदिरांच्या माध्यमातून झाले.

आजही केवळ राम ह्या कॉमन गोष्टीमुळे भारतातील प्रत्येक व्यक्ती एकत्र येऊ शकते, कारण रामाविषयी प्रत्येकाला वाटणारे आपलेपणा, प्रेम. राज्य, भाषा, जात हे सर्व भेद विसरून सर्वांना एकत्र करण्याचे सामर्थ्य ह्या रामनामात आहे.

त्यामुळे मला असे वाटते की, अयोध्येत श्रीरामाचे एक भव्य मंदिर हे संपूर्ण भारताला एकत्र बांधून ठेवणारे आणि चिरकालासाठी प्रेरणा देणारे ठरेल.

- भूषण मेंडकी
@@AUTHORINFO_V1@@