पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी २५ कोटींचा निधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-Mar-2018
Total Views |

पालकमंत्री संजय राठोड यांची माहिती





वाशीम : पोहरादेवी तीर्थक्षेत्र येथे विकास आराखड्यातून पहिल्या टप्प्यात २५ कोटी रुपयांच्या विकास कामांना राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. या करिता आवश्यक असलेली शासकीय जमीन देखील विकास आराखड्याच्या कामांसाठी हस्तांतरित करण्यात आली असून ही कामे तातडीने सुरु करून पोहरादेवी तीर्थक्षेत्राच्या विकासाला गती देणार असल्याचे माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. दरम्यान पोहरादेवी तीर्थक्षेत्राचा विकास जलदगतीने व्हावा तसेच भाविकांना योग्य सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी शासन सदैव प्रयत्न करेल, असे आश्वासन देखील त्यांनी दिले आहे.

याविषयी सविस्तर माहिती देताना ते म्हणाले, पोहरादेवी तीर्थक्षेत्र विकासासाठी २५ कोटी रुपयांच्या कामांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीने पहिल्या टप्प्यात मंजुरी दिली आहे. तसेच वन विभागाच्या माध्यमातूनही पोहरादेवी येथे ५ कोटी रुपयांची विकास कामे करण्यात आली आहे. पोहारादेवीचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लक्ष घातले आहे. पोहरादेवी विकास आराखड्यातून पहिल्या टप्प्यात बंजारा संस्कृतीचे दर्शन घडविणारे संग्रहालय व प्रदर्शनी, सभामंडप, भक्त निवास, सार्वजनिक शौचालये, यासह इतर पायाभूत सुविधांची निर्मिती, बगीचा निर्मितीसह इतर पायाभूत सुविधांची निर्मिती केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी हे देखील यावेळी या कार्यक्रमला उपस्थित होते. मंदिरासाठी आवश्यक विकास कामे करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला ना हरकत प्रमाणपत्र प्रदान देऊन सदर जमीन हस्तांतरित करण्यात आली असल्याचे द्विवेदी यांनी सांगितले. तसेच आराखड्यासाठी वास्तुविशारद नियुक्त करण्यात आला असून उर्वरित आवश्यक कार्यवाही तातडीने करून लवकरात लवरक विकास आराखड्यातील कामांना सुरुवात होईल. पुढील वर्षी राम नवमीपर्यंत यापैकी अनेक कामे पूर्ण होऊन त्यामुळे भाविकांना सोयी-सुविधा मिळतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
@@AUTHORINFO_V1@@