श्रीनगरच्या लाल चौकातही घुमला 'जय श्रीराम'चा घोष

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-Mar-2018
Total Views |



श्रीनगर : श्रीराम नवमीनिमित्त देशभरात सध्या मोठ्या उत्साहात रामजन्मोत्सव साजरा केला जात आहे. देशभरात राम जन्मोत्सवानिमित्त ठिकठिकाणी शोभायात्रा निघत असून भारताच्या इतर राज्यांप्रमाणेच जम्मू-काश्मीरमध्ये देखील रामनवमीनिमित्त शोभा यात्रेचे आज आयोजन करण्यात आले होते. श्रीनगरमधील प्रसिद्ध आणि बहुचर्चित लाल चौकामधून वाजत-गाजत ही शोभा यात्रा काढण्यात आली होती.

आंतरराष्ट्रीय श्रीकृष्ण भावनामृत संघ अर्थात इस्कॉन या अध्यात्मिक संघटनेकडून या शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. इस्कॉनकडून एका गाडीचा रथ बनवण्यात आला होता. हा रथाला चारी बाजूने फुलांनी सजवण्यात आले होते व त्यामध्ये प्रभू श्रीरामचंद्र, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांची वेशभूषा करून काही लहान मुले बसवण्यात आली होती. शोभा यात्रेमध्ये श्रीनगरमधील स्थानिक नागरिक, इस्कॉनचे साधक तसे काही विदेशी पर्यटक देखील सामील झाले होते. तसेच यात्रेदरम्यान कसलाही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून शोध यात्रेला पोलीस संरक्षण देखील पुरवण्यात आले होते. लाल चौकातील सेन्ट्रल मार्केटच्या समोर ही शोभा यात्रा काढण्यात आली.


शोभा यात्रेचा व्हिडीओ :

श्रीनगरमधील हा लाल चौक अत्यंत वादग्रस्त आणि अशांत असा मानला जातो. जम्मू-काश्मीरमधील काही फुटीरतावादी लोकांकडून अनेक वेळा याठिकाणी पाकिस्तानचा ध्वज फडकवण्याचा प्रयत्न झाला आहे, तसेच येथे भारतीय ध्वजाची विटंबना देखील केली जाते. त्यामुळे अनेक वेळा या चौकात कायम दंगली तसेच हिंसक घटना घडत असतात. काही दिवसांपूर्वी पोलिसांवर दगडफेक होण्याचेही प्रकार या परिसरात घडले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत या चौकातून ही शोभायात्रा काढणे हे अत्यंत धाडसी कृत्य मानले जात आहे. मात्र लाल चौकातील या यात्रेबद्दल सर्वत्र आनंद व्यक्त केला जात आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@