अण्णा! केजरीवाल आठवतायत का?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Mar-2018
Total Views |
 

 
लोकशाही मार्गाने न जाता अण्णांच्या मार्गाने जाऊन मागण्या मान्य करून घेण्याचा मार्ग लोकप्रिय वाटत असला तरी त्याच्या फायद्यापेक्षा तोटेच जास्त आहेत. माहितीच्या अधिकाराखाली ब्लॅकमेलिंग करण्याचेच काम करणारी मोठी टोळीच सध्या देशभरात तयार झाली आहे. याला जबाबदार अण्णा नाही तर कोण?
 
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पुन्हा उपोषणाची हाक दिली आहे. अण्णा लावून धरीत असलेले मुद्दे कधीच अयोग्य नसतात, मात्र पुढे जाऊन जे काही घडते त्यातून अण्णा तर्‍हेवाईकपणे आपले अंग काढून घेतात. राळेगणसिद्धीत अण्णांनी ग्रामविकासाचे जे मॉडेल उभे केले, त्यामुळे अण्णांच्या मागे सुरुवातीला महाराष्ट्र आणि नंतर सगळा देश उभा राहिला. कुठल्याही राजकीय पक्षांच्या तुलनेत अण्णांनी उभे केलेले काम लोकांना अधिक सकारात्मक व समावेशक वाटले यातच अण्णांचे यश. पण, फक्त एवढ्याच भांडवलावर अण्णांनी जे काही प्रयोग केले ते खरोखरच चकित करायला लावणारे आहेत. अण्णांनी यापूर्वी अनेक आंदोलने केली. त्यातून त्यांनी समाजासाठी बरेच काही मिळविलेही. अण्णांच्या कार्यपद्धतीवर टीकाही बरीच झाली. मुख्यत: अण्णांचे आंदोलन राजकारण्यांच्याच विरोधात होते, पण राजकारण्यांपैकी कुणीही अण्णांच्या विरोधात चुकूनही अवाक्षर काढले नाही. कारण, त्यांना जनक्षोभाला बळी पडावे लागले असते. मात्र, ज्यांनी अण्णांबरोबर कामकेले त्यांनीच अण्णांच्या नावाने अतोनात खडे फोडले. अण्णांवर टीका करण्यात त्यांच्याबरोबरच काम करणार्‍या मंडळींनीच पुढाकार घेतला. शिवसेना-भाजपच्या काळात अण्णांनी उपोषण केले तेव्हा अण्णांची प्रशस्तिपत्रके खूप गाजली होती. अमका राजकारणी प्रामाणिक, अमका राजकारणी उत्तमअशी प्रशस्तिपत्रे अण्णा जाहीरपणे द्यायचे. नंतर कॉंग्रेसच्या काळात विलासराव देशमुख तर अण्णांनी उगारलेले शस्त्र शमविण्यातले वाक्‌बगार म्हणून ओळखले जायचे. ज्यांच्या विरोधात अण्णा आंदोलन करतात त्या राजकारण्यांनी अण्णांना शांत करण्याचे मार्ग आधीच विचार करून ठेवलेले असतात.
 
आता अण्णाही या सगळ्याला सरावले आहेत. कार्यक्रम जाहीर करण्याची तारीख, त्यातून मिळणारी प्रसिद्धी यातून निर्माण होणारे वातावरण या सगळ्याचा विचार त्यांनी बर्‍यापैकी केलेला असतो. २०११ ला त्यांनी केलेले आंदोलन ‘वर्ल्ड कप मॅच’नंतर सुरू केले होते. नंतर स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त शोधला. आताही ‘शहीद दिना’निमित्ताने त्यांनी आपल्या आंदोलनाची सुरुवात केली आहे. अण्णांच्या मागण्या रास्त आहेत. त्यात काही वावगे नाही. मात्र, त्याचे पुढे काय होईल याची जबाबदारीही अण्णांनी घेतली पाहिजे. आता शेतीमालाला हमीभाव, शेतकर्‍याला पाच हजार रुपये पेन्शन, राईट टू रिजेक्ट किंवा राईट टू रिकॉल अशा मागण्या आहेत. पहिल्या मागण्या ठिकठाक असल्या तरी दुसर्‍या मागण्या घटनेच्या चौकटीत बसणार्‍या नाहीत. त्यावर व्यापक चर्चा घडवून आणण्याचीही त्यांची तयारी नाही. राजकारण्यांविरोधात सर्वसामान्य लोकांच्या मनात राग असतो. माध्यमे, साहित्य यांच्या माध्यमातून निर्माण केलेली ही प्रतिमा राजकीय क्षेत्रातील मंडळींच्या वर्तनाने पोसली गेली आहे. लोकप्रतिनिधींना मिळणारे भत्ते, पगार याची चर्चा होत राहाते व त्यावर खरेखोटे व्हॉट्‌सअॅप संदेश फिरत राहतात. आपल्या लोकप्रतिनिधींच्या कामाचा अहवाल मागण्यापेक्षा त्याने न केलेल्या कामांचा पाढा वाचण्यापेक्षा त्याला मिळणार्‍या भत्ते व वेतनाचीच चर्चा जास्त होत राहते. हे निकोप लोकशाहीचे लक्षण नाही. लोकप्रतिनिधीला तो काम करीत नाही म्हणून परत बोलाविण्याचे निकष काय असणार? ते कोण ठरविणार? कुठल्याही सदनाचे सदस्य नसलेले अण्णा ते कसे निश्चित करणार, असा हा प्रश्न आहे.
 
अण्णांनी यापूर्वी ज्या मागण्या उपोषणाला बसून मान्य करून घेतल्या त्यांचे काय झाले याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. खरं तर असे निर्णय समित्या निर्माण करून घेतले जातात. त्याच्या सर्व प्रकारच्या बाजूंची पडताळणी करूनच निर्णय घेतले जातात. मात्र, अण्णांच्या हडेलहप्पीपणामुळे जलद गतीने माहितीचा अधिकार कायदा आला. यामुळे पारदर्शकता आली, असे वाटत असले तरी माहितीच्या अधिकाराखाली माहिती गोळा करून त्याचा किस पाडून ब्लॅकमेल करणार्‍यांच्या टोळ्याच तयार झाल्या आहेत. परवा ठाण्यात एका बांधकाम व्यावसायिकाला ब्लॅकमेल करून पैशाचा दुसरा हप्ता मागायला आलेल्या महिला पत्रकाराला खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. विधिमंडळाच्या या अधिवेशनातील विधानसभेत शिवसेनेचा नगरसेवक धनंजय गावडे व त्याने माहितीच्या अधिकाराखाली गोळा केलेल्या माहितीचा दुरुपयोग करून केल्या गेलेल्या उपद्व्यापांची माहिती चांगली गाजली. अण्णांचे नेहमीप्रमाणे आता या विषयावर काहीच म्हणणे नाही. जंतरमंतरला लोकपालसाठी अण्णांनी जे काही आंदोलन केले त्याला सुरुवातीला मिळालेला प्रतिसाद जबरदस्त होता. त्याचा पुरेपूर फायदा केजरीवाल, भूषण पिता-पुत्रांनी घेतला. केजरीवालांनी तर नंतर दिल्ली विधानसभेची निवडणूकही लढविली आणि विजयीही झाले. अण्णांच्या आंदोलनात सहभागी झाल्यापासून ते आजपर्यंत केजरीवालांनी जे जे काही दिवे उजळले आहेत, ते जगासमोर आहे. देशभरात आपले मुद्दे हडेलहप्पीपणे मांडणार्‍यांची एक फौजच अण्णांनी उभी केली. केजरीवालांचा सध्याचा एकमेव उद्योग माफी मागण्याचा झाला आहे. आपण केलेले आरोप बिनबुडाचे होते, याचा बोध त्यांना अलीकडे झाला आहे. हाताबरोबर त्यांनी अण्णांची माफीही मागून टाकावी. कारण, नंतर केजरीवाल आणि अण्णा यांच्यात काय झाले हे गुलदस्त्यातच आहे. आता अण्णा त्याच्या आंदोलनात सहभागी होणार्‍यांकडून बॉंडपेपरवर लिहून घेत असल्याची चर्चा होती. काय तर म्हणे त्यांनी राजकारणात जायचे नाही. हा देश बदलायचा असेल तर इथली राजसत्ताच ताब्यात घेतली पाहिजे. त्यासाठी लोकशाही व निवडणुकांचा राजमार्ग निश्चितच तयार आहे. मात्र, अण्णांना तो मान्य नाही. त्यांना ‘हम करे सो कायदा’ हवा आहे. अण्णांच्या आंदोलनाला प्रतिसाद मिळेल, यात शंका नाही, कारण देशभरात कुठे ना कुठे दुखावलेला एक वर्ग असतोच. मात्र, अण्णा आज जे काही मागत आहेत त्याचे पुढे काय परिणाम होतील, याचा जाब अण्णांनाच विचारला पाहिजे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@