सरसंघचालक शिवपुण्यतिथीला अभिवादनासाठी रायगडावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Mar-2018
Total Views |




पुणे : येत्या ३० आणि ३१ मार्चला रायगडावर शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३३८ व्या पुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी या अभिवादन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत उपस्थित राहणार आहेत. या कार्क्रमाच्या अध्यक्षस्थानी रवींद्र चव्हाण (पालकमंत्री रायगड जिल्हा) उपस्थित असतील अशी माहिती श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष जगदीश कदम यांनी पत्रकार परिषदेत आज दिली.

यावेळी बोलताना कदम म्हणाले की, १८९५ साली लोकमान्य टिळकांनी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ ही संस्था स्थापन केली आणि रायगडावर शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम सुरु केला. मंडळाचे हे १२३ वे वर्ष आहे. दरवर्षी मंडळातर्फे दिला जाणारा ‘श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार’ शिवभक्त प्रतिष्ठान, पंढरपूर यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच दुर्गमहर्षी कै. प्रमोदजी मांडे यांना मरणोत्तर विशेष पुरस्कार दिला जाणार आहे. हिंदवी स्वराज्याचे शूर सरदार कान्होजी जेधे यांचे वंशज आणि त्याचबरोबर मेजर जनरल मनोज ओक (निवृत्त) यांचा देखील सन्मान यावेळी करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती देताना पांडुरंग बलकवडे म्हणाले की, या दोन दिवसीय कार्यक्रमात ३० मार्च रोजी पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या मुलाखती, शिवतीर्थ रायगड हा संगीतमय शिवचरित्राचा कार्यक्रम, शाहिरी कार्यक्रम, आणि कीर्तन होणार आहे. तर ३१ मार्च रोजी सकाळी ९ ते ११ यावेळात राजसभेमध्ये मुख्य कार्यक्रम होणार आहे. यानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे पूजन, पालखीची मिरवणूक, मराठा रेजिमेंट बँडचे वादन व रायगड जिल्हा पोलीसांतर्फे बंदुकीच्या २१ फैरी झाडून मानवंदना दिली जाणार आहे.


दरवर्षी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवभक्त या कार्यक्रमासाठी रायगडावर येत असतात. यावर्षीही सुमारे २५,००० शिवभक्त उपस्थित राहतील. येणाऱ्या सर्व शिवभक्तांच्या रात्रीचे भोजन, न्याहरी आणि महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवपुण्यतिथीच्या निमित्ताने प्रथमच गडावरील होळीच्या माळावर सुमारे १०,००० चौ. फू. भोजनमंडप आणि १५० स्वच्छतागृहांची व्यवस्था केली जाणार आहे अशी माहिती सुधीर थोरात यांनी दिली.
@@AUTHORINFO_V1@@