देशहित, उद्योगहित, कामगारहित...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Mar-2018   
Total Views |
 
 
 
 
कर्मचारी ते शासनाच्या कामगार सल्लागार मंडळावर नियुक्ती होतानाचा विजय मोगलांचा जीवनप्रवास म्हणजे भारतीय मजदूर संघाच्या कार्यकर्त्याची मानवी मूल्यांवरची ध्येयशील वाटचाल आहे.
 
 
संघटित कामगार असोत किंवा असंघटित कामगार असोत, त्यांचा कोणताही प्रश्‍न किंवा समस्या त्यांच्या एकट्याच्या कधीच नसतात. त्यांचे समाजावरही दूरगामी परिणाम होतात. कामगारांची समस्या म्हणजे माझ्या समाजबांधवांची समस्या ही भावना माझ्या मनात सर्वात आधी येते. याच भूमिकेने कामगारांचे प्रश्‍न मला सोडवावेसे वाटतात,’’ असे भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तसेच, नाशिक जिल्हा सचिव विजय मोगल आपले मन मोकळे करताना म्हणाले.
 
निफाडच्या शेतकरी कुटुंबातले विजय. त्यांचे वडील माधवराव शेतकरी, तर आई भागीरथी गृहिणी. वयाच्या १० व्या वर्षीच विजयला एक अनपेक्षित धक्का बसला, त्यांचे मातृछत्र हरपले. विजयचे पिता हे लौकिकार्थाने निरक्षरच! पण, त्यांचे समाजज्ञान, संघटन कौशल्य जबरदस्त होते. या कुटुंबाचे किराणामालाचे दुकानही होते. लहान विजय या दुकानावर येणार्‍या लोकांना पाहत असे. शेतमजूर किंवा चतुर्थ श्रेणी कामगार वर्गाचे समाजबांधव. त्यांची हलाखीची स्थिती, आर्थिक कमकुवतपणा त्यामुळे वागण्यात आलेले एक लाचार दारिद्य. त्यांच्या गप्पा, त्यांचे समाजविश्‍व, त्या वयातही विजय यांच्या मनात अनेक प्रश्‍न निर्माण करत असे. त्यातल्या त्यात एक मात्र होते की, विजय यांचे काका मालोजी हे समाजसेवक होते. (पुढे काही दशकांनंतर हे मालोजी निफाडचे आमदारही झाले.) तर मालोजींचा आग्रह असे की, घरातल्या नव्या पिढीने चांगले शिकावे. त्यामुळे निफाडच्या मोगल कुटुंबातले विजय वयाच्या १२ व्या वर्षी निफाडहून पुण्याला शिकायला गेले.
 
 
पुण्याला शिकायला गेल्यानंतरचे जग विजयसाठी नवीन होते. तिथे विजय यांचा परिचय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांशी झाला. संघ विचारांतून त्यांना जाणवले की, कामगारांचे प्रश्‍न फक्त आर्थिक नसतात तर त्यांना सांस्कृतिक सामाजिक आणि मुख्यतः मानवी भावभावनांसमवेत राष्ट्रीयतेचे आयामही परिणाम करत असतात. विजय वाणिज्य शाखेचे पदवीधर झाले. पण, पुढचे शिक्षण आर्थिकदृष्ट्या परवडत नाही, म्हणून विजय यांना पुन्हा निफाडला यावे लागले. नोकरीनिमित्त ८० च्या दशकात ते नाशिकला आले. ’भारतीय मजदूर संघा’चे ए. पी. देशपांडे विजय यांना भेटले आणि विजय यांच्या आयुष्याचे कामगार विकासक पर्व सुरू झाले. भारतीय मजदूर संघाचे विविध कार्यक्रम, आंदोलन, मोर्चे, समन्वय बैठका यामध्ये विजय सातत्याने ए. पी. देशपांडेंसोबत सहभागी होत असत. हे सगळे करत असताना विजय यांच्या मनात, लहानपणापासून घर करून राहिलेले गरीब असंघटित मजुरांचे जगणे पिंगा घालत राही. ते ज्या बॅँकेत काम करत तिथेही फारशी वेगळी परिस्थिती नव्हती. १५०० ते २००० कर्मचारी. पण त्यांनाही पुरेसे वेतन मिळत नव्हते. सन्मान तर सोडाच, पण आवश्यक सुविधाही मिळत नव्हत्या. बँकेची संचालक मंडळी सत्तेने आणि आर्थिक पार्श्‍वभूमीने गब्बर. त्यांच्याशी संघर्ष कोण करणार? पण, विजय कामगारांची बाजू मांडू लागले. कामगारांना न्याय मिळू लागला आणि कामगारांनी त्यांना आपले प्रतिनिधित्व बहाल केले.
 
बँकेच्या संचालक मंडळावर कामगारांचे प्रतिनिधित्व करताना दिवसेंदिवस विजय यांच्या कामाचा आवाका वाढत होता. त्यात २००६ साली कामगार हक्कांसाठी विजय मोगलांच्या नेतृत्वाखाली बँकेतील कर्मचार्‍यांनी संप केला. संप सहा दिवस चालला आणि यशस्वीरीत्या संप पूर्ण झाला. कामगारांना न्याय मिळाला होता. निवृत्तीनंतर ते ’भारतीय मजदूर संघा’चे पूर्ण वेळ काम करू लागले. स्वयंसेवक वृत्तीचे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदर्श मानणारे विजय, राष्ट्रीय भावनेने कर्तव्यकठोरतेचे पालन करत आले. नाशिकच्या पाच हजार घरेलू कामगार महिलांना त्यांनी संघटनेच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला. हे सगळे करत असताना ‘देशहित, उद्योगहित आणि कामगारहित’ हे वचन ते ब्रीदवाक्य म्हणून त्यांनी पाळले. कुठे कामगारांच्या आडमुठ्या धोरणांनी उद्योगच बंद व्हायची वेळ आली, तर विजय तिथे समन्वय साधत. नुकतीच शासनाने विजय यांची नियुक्ती कंत्राटी कामगार सल्लागार मंडळावर केली आहे. योग्य व्यक्तीची योग्य ठिकाणी निवड झाली आहे.
 
विजय मोगल म्हणतात की, ‘‘नाशिकमध्ये ८० टक्के कंत्राटी कामगार आहेत. जिल्ह्यातील सर्व कामगार संघटनांबरोबर चर्चा करून कंत्राटी कामगारांसाठी न्याय हक्क समिती स्थापन करणार आहे. कामगारांकडे इच्छाशक्ती, कष्ट जिद्द सारे काही आहे त्यांना योग्य आधुनिक ज्ञान, कौशल्य, हक्क आणि सोयीसुविधा मिळणे यासाठी प्रयत्न करायचे आहेत.’’
 
 
 
- योगिता साळवी  
 
@@AUTHORINFO_V1@@