|| वेदातील रामकथा ||

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Mar-2018   
Total Views |



|| प्रस्तावना ||


वेदांमध्ये चार भाग आहेत – संहिता, ब्राह्मण, अरण्यक व उपनिषद. या सर्व साहित्यात अनेक कथा येतात. यज्ञांमध्ये मंत्र पठण, आहुती व सामगान होत असे. तसेच यज्ञाला अनुसरून, संहितेतील अथवा ब्राह्मण ग्रंथातील काही कथांचे वाचन किंवा सादरीकरण सुद्धा होत असे. आज सत्यानारायणाच्या पूजेत जशी कथा वाचली जाते, तसे काहीसे. नाटकांमध्ये जसे गद्य व पद्य मिश्र असते, तसे या प्राचीन कथा सुद्धा गद्य व पद्य मिश्र असाव्यात. त्या कथांमधील जो भाग पद्य होता, तो पाठ केला गेला. पण त्यातील गद्य भाग, जो दोन अंक किंवा दोन प्रसंग जोडत असे, तो मात्र काळाच्या ओघात विस्मृतीत गेला. वैदिक संहितेत जो कथाभाग शेष आहे, तो ब्राह्मण ग्रंथाचा किंवा पौराणिक ग्रंथांचा आधार घेतल्याशिवाय कळत नाही.


याचे एक उदाहरण आहे, ऋग्वेदातील पुरुरवा – उर्वशी संवाद. या संवादात पुरुरवा उर्वशीला माझ्याबरोबर चल, असे विनवतो. आणि उर्वशी तसे काही होणे नाही, असे सांगते. पण यातून काही उलगडा होत नाही. ही कथा नंतरचे ब्राह्मण ग्रंथ, पुराण किंवा कालिदासाचे विक्रमोर्वशीय नाटक वाचले की कळते.


|| कर्पूरग्राम, इस. १६५० ||


गोदावरी नदीच्या काठावरील कर्पूरग्राम, म्हणजे आजचे नगर जिल्ह्यातील कोपरगाव. येथे गोविंदसुरी चतुर्धर नावाचे मोठे पंडित राहत होते. ते व्याकरण, मीमांसा व न्याय शास्त्राचे विद्वान होते. गोविंदसुरींचा मुलगा - नीलकंठ चतुर्धर हा देखील अतिशय विद्वान पंडित होता. याने लिहिलेली ‘भारतभावप्रदीप’ ही महाभारताची टिका प्रसिद्ध आहे. ही ‘नीलकंठी टीका’ म्हणूनही ओळखली जाते. महाभारताची ही टीका एक सत्यनिष्ठ संदर्भ मनाली जाते. नीलकंठाने या शिवाय गणेश-गीता व शिवतांडव वर टीका लिहिली आहे.


|| मंत्ररामायण ||


मंत्ररामायण हे नीलकंठचे अमर साहित्य आहे. या ग्रंथातून त्याने दाखवले की, रामकथेचे मूळ वेदांमध्ये आहे. ऋग्वेदातील १०,४००+ मंत्रामधून नीलकंठाने १५५ मंत्र काढले आहेत ज्या मधून रामाची कथा सांगितली आहे. मंत्रारामायण हा नीलकंठ संकलित वैदिक मंत्रांचा संग्रह आहे. या ग्रंथाची पुरवणी आहे ‘मंत्ररहस्यप्रकाशिका’ ज्यामध्ये रामायणातील प्रसंगाला अनुसरून नीलकंठाने प्रत्येक मंत्राचे अर्थ दिला आहे.

मंत्ररामायणाच्या मंगलचरणात नीलकंठ म्हणतो की रामायण हे गायत्री स्वरूप आहे. गायत्री मंत्राच्या प्रत्येक अक्षराने वाल्मिकी रामायणाचे एक एक हजार श्लोक रचले आहेत. अर्थात वाल्मिकी रामायणातील प्रत्येक हजाराव्या श्लोकाचे आद्याक्षर घेतले असता, गायत्री मंत्र तयार होतो. नीलकंठ म्हणतो - 

रामायणद्रूमं नौमि रामरक्षानवांकुरम् |
गायत्रीबीजमाम्नायमूलं मोक्षमहाफलम् ||

गायत्रीमंत्र हे ज्याचे बीज आहे तो रामकथा कल्पवृक्ष मोक्षफल देतो! 

मंत्ररामायणाची सुरुवात रामरक्षा कवच स्तोत्राने होते – 
शिरोमे राघवः पातु भालं दशरथात्मजः ।
कौसल्येयो दृशौ पातु विश्वामित्रप्रियश्रुती ।। १ ।।
घ्राणं पातु मखत्राता मुखं सौमित्रिवत्सलः ।
जिव्हां विद्यानिधिः पातु कंठं भरतवंदितः ।। २ ।।
स्कन्धौ दिव्यायुध: पातु भुजौ भग्नेशकार्मक: |
करौ सीतापतिः पातु हृदयं जामदग्न्यजित् ।। ३ ।।
मध्यं पातु खरध्वंसी नाभिं जाम्बवदाश्रयः ।
सुग्रीवेशः कटी पातु सक्थिनी हनुमत्प्रभुः ।। ४ ।।
जानुनी सेतुकृत्पातु जंघे दशमुखान्तकः ।
पादौ बिभीषणश्रीदः पातु रामोखिलं वपुः ।। ५ ।।


या पाच श्लोकांतील रामाची नावे ओळीने वाचली की रामकथा कळते – जो रघुकुलात जन्माला, जो दशरथ पुत्र आहे, जो कौसल्येचा सुत आहे, जो विश्वामित्राचा प्रिय शिष्य आहे, जो लक्ष्मणावर प्रेम करतो, भरत ज्याला वंदन करतो, ज्याच्याकडे दिव्य अस्त्र आहेत, ज्याने शिवाचे धनुष्य तोडले, जो सीतेचा पती आहे, ज्याने परशुरामाला जिंकले, ज्याने खराचा नाश केला, जम्बुवानाला आश्रय दिला, ज्याने सुग्रीवाचे रक्षण केले, जो हनुमानाचा प्रभू आहे, ज्याने सेतू बांधला, रावणाचा अंत केला व बिभीषणाला राज्यावर बसवले ... तो राम माझे रक्षण करो!

मंत्ररामायणात ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील ९९ वे सूक्त उद्घृत केले आहे. हे इंद्र-सूक्त रामाची कथा मानली जाते. हे सूक्ताचा द्रष्टा आहे विखनस् पुत्र वम्र ऋषी. लक्षात घेण्याची गोष्ट अशी की - वम्रचा अर्थ आहे मुंगी, तर वाल्मिकीचा अर्थ आहे वारुळात राहणारा. अर्थात वम्र म्हणजेच वाल्मिकी! ऋग्वेदातील या सूक्ताचा व रामायणाचा कर्ता एकच आहे, असे नीलकंठ म्हणतो.

या सूक्तात १२ मंत्र आहेत, ज्यामधून इंद्राची स्तुती केली आहे. यातील पहिल्या ५ मंत्रांमध्ये संक्षिप्त रामकथा आहे असे नीलकंठ सांगतो. इंद्र म्हणजे राम, मरुत् गण म्हणजे मारुती व वानर, आदि विस्तार त्याने केला आहे. पहिला मंत्र प्रश्नात्मक आहे – ज्यामध्ये रामाविषयी जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. वाल्मिकी रामायण जसे नारदांना प्रश्न विचारून सुरु होते, तसेच यामधील पहिल्या मंत्रात प्रश्न केला आहे – “अनेक गुणांनी युक्त, पराक्रमी, आम्हाला प्रेरणा देणारा, स्तुती करण्यास योग्य, असा कोण आहे?”

पुढच्या मंत्रांमधून ऋषी सांगतो – तो (राम) आपली कांती व शक्ती (सीता) सह, प्रतिकूल परिस्थितीत, प्रसन्नतेने वनात गेला. तिथे पृथ्वी कन्येला असुराने पळवले. तेंव्हा रामाने मारुती आदींची मदत घेतली. रावणाच्या मायेला तो बधला नाही. त्याने सेतू बांधला व सैन्यासह समुद्रावरून चालत गेला. रावणाचा वध करून त्याने बिभीषणाला राज्यावर बसवले. आणि सीतेसह पुन्हा आपल्या घरी आला.


या शिवाय ऋग्वेदात इतरही ठिकाणी रामकथेचे संदर्भ आले आहेत, त्याचा परामर्श नीलकंठने घेतला आहे.


अनेक देशी, विदेशी अभ्यासकांना रामकथेचे मूळ वेदात आहे हे मान्य नाही. पारंपारिक मतानुसार रामकथा अतिशय प्राचीन आहे. नीलकंठाच्या मंत्ररामायणाने रामकथेचे बीज ऋग्वेदात आहे हे दाखवेलच आहे. त्या शिवाय शतपथ ब्राह्मण, तैत्तरीय संहिता, प्रश्नोपनिषद असे अनेक ठिकाणी रामायणातील पात्रांचा उल्लेख मिळतो, जे नीलकंठाच्या मताला पुष्टी देतात.


|| फलश्रुती ||


ऋग्वेदाच्या इंद्र सूक्तात विचारले आहे – “मी त्याची (रामाची) स्तुती केल्याने, मला काय फळ मिळेल?” याच मंत्रात उत्तर दिले आहे- अज्ञानाचा विनाश करणारा (राम), तुझ्या स्तुतीने प्रसन्न होऊन तुला विवेक हे फळ देईल!”

मंत्ररामायणात सांगितले आहे, रामकथा ऐकणाऱ्याला – मोक्ष फल मिळेल.


वाल्मिकी रामायणाच्या युद्ध कांड मध्ये दिलेली फलश्रुती आहे – जो रामायण ऐकेल, सांगेल, वाचेल किंवा लिहील, तो – धर्माने वागेल, त्याची कीर्ती वाढेल, आणि तो यशस्वी होईल!


संदर्भ –

१. मंत्ररामायण – हिंदी अनुवाद डॉ. प्रभुनाथ द्विवेदी
 
- दिपाली पाटवदकर 
@@AUTHORINFO_V1@@