अशी झाली अधोगती

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    24-Mar-2018   
Total Views |
 
 
 
 
  
देशा-विदेशामध्ये ’विकासाची गंगा’ सर्व स्तरापर्यंत पोहोचविण्याची आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती काही वेगळं चित्र दर्शवते. ज्या गोष्टींमध्ये आपण प्रगती, विकास केला आहे, निव्वळ त्याच्याकडे लक्ष ठेवण्यापेक्षा आपण कुठं कमी पडत आहोत, कोणत्या समस्यांचा निपटारा करण्यामध्ये अपयशी ठरलो आहोत याचा विचार करण्याची गरज आहे. भारताबरोबरच देश-विदेशामध्ये आज अन्नाचा तुटवडा भासत आहे. याचं ताजं उदाहरण द्यायचं झालं तर दक्षिण अमेरिका खंडाच्या उत्तर भागात असलेल्या व्हेनेझ्युएलाचं देता येईल. नुकताच तीन विद्यापीठांनी अन्नटंचाई, उपासमारीसंदर्भात संशोधन करून एक अहवाल सादर केला. या अहवालानुसार देशातील गरिबी आणि भूकबळींच्या संख्येत यावर्षी वाढ झाली आहे.
 
व्हेनेझ्युएलाच्या ६० टक्के नागरिकांमधून करण्यात आलेल्या संशोधनानुसार या लोकांकडे पुरेसा पैसा नसल्याने ते अन्नधान्याची खरेदी करू शकत नाहीत. ज्यामुळे या लोकांना अन्न न मिळाल्याने गेल्या तीन महिन्यांपासून ते दिवसातील एक वेळ उपाशी राहत आहेत. ज्याचा येथील नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम झाला आहे. विद्यापीठांनी देशातील २० ते ६५ वयोगटांतील नागरिकांच्या वजनाची तपासणी केली. त्यात पुरेशा जेवणाच्या अभावामुळे त्याचे आठ किलो वजन कमी झाले आहे. व्हेनेझ्युएलामध्ये सध्या लोकांच्या जीवनमरणाचा संघर्ष सुरू आहे. देशावर आलेल्या मोठ्या आर्थिक संकटामुळे तसेच अन्नधान्याच्या कमतरतेमुळे येथील नागरिकांना उपासमारीचा सामना करावा लागत आहे. व्हेनेझ्युएलामध्ये अन्नाच्या कमतरतेतून बळी पडणार्‍यांच्या संख्येत दिवसेंदिवस भर पडत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी तिथल्या नागरिकांनी शेजारच्या देशांमध्ये स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. या मानवनिर्मित अन्नाच्या दुष्काळाचा फटका प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना बसला आहे. ज्यामुळे येथील प्राण्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. परंतु, राष्ट्रीय प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना इथल्या स्थानिकांसारखे स्थलांतर करता येत नसल्याने प्राण्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे. झुलिया प्राणी संग्रहालयातील काही दुर्मीळ प्राण्यांचे फोटो प्रकाशित झाले असून त्याचे कुपोषण स्पष्टपणे दिसून येत आहे. यामध्ये बंगाल टायगर, चित्ता यासोबतच दक्षिण अमेरिकेतील पक्ष्यांचाही समावेश आहे. देशातील प्राण्यांच्या हक्कासाठी काम करणार्‍या संस्थांच्या माहितीनुसार मोठ्या प्राण्यांच्या अन्नाची गरज भागविण्यासाठी संग्रहालयातीलच बदक, डुक्कर, शेळी यांसारख्या प्राण्यांचा बळी दिला जात आहे. खरंतर व्हेनेझ्युएलामध्ये पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. आधीचं चित्र काही वेगळं होतं.
 
१९९९ मध्ये अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर डाव्या विचारांचे ह्युगो चावेझ यांनी देशात अनेक कल्याणकारी योजना राबविल्या होत्या. तेल-इंधनाचे उत्पन्न हा देशाचा मुख्य मिळकत स्रोत होता. कल्याणकारी धोरणांमुळे व्हेनेझ्युएलाच्या सामाजिक निर्देशांकात सुधारणा झाली होती. इतर क्षेत्रांमध्ये प्रगती केल्याने लोकांचे जीवनमान बर्‍यापैकी उंचावले होते. आपल्या समाजवादी विचारसरणीमुळे ’गरीबांचे हिरो’ म्हणून ओळखले जाणारे व्हेनेझ्युएलाचे राष्ट्राध्यक्ष ह्युगो चावेझ यांचे कर्करोगामुळे २०१३ मध्ये निधन झाले. तब्बल १४ वर्षं त्यांनी राष्ट्राध्यक्ष म्हणून धुरा सांभाळली होती. तेलाच्या बळावर व्हेनेझ्युएलाला ताठ मानेने चालण्यास मदत करणार्‍या ह्युगो चावेझ यांच्या निधनानंतर तिकडची राजकीय, सामाजिक स्थिती खालावली. तेलाच्या घटत्या किमती आणि सध्याचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मडुरो यांच्याविरोधात असणार्‍या तीव्र असंतोषामुळे सगळी घडी विस्कटली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये कच्च्या तेलाच्या किमती कोसळल्यामुळे व्हेनेझ्युएलाच्या अर्थव्यवस्थेचा कणाच मोडला आहे. व्हेनेझ्युएलाचे अंतर्गत राजकारण, वाढती महागाई, बेसुमार वाढलेली बेकारी आणि असंतोषामुळे त्याचा थेट परिणामी देशाच्या प्रगतीवर झाला आणि ते अधोगतीकडे प्रवास करू लागले.
 
 
 
- सोनाली रासकर
 
@@AUTHORINFO_V1@@