ऐरणीवर आलेले प्रश्न...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Mar-2018
Total Views |




समाज माध्यमांनी माध्यम विश्वात स्वत: ची जागा तयार केल्या नंतर त्याचे चांगले-वाईट परिणाम दृश्य स्वरूपात दिसायला लागणे सहाजिकच आहे. ‘कुणी तरी आहे तिथे’ असा भित्रा पवित्रा घेऊन समाज माध्यमांवर मुक्तपणे अभिव्यक्त होताच येणार नाही. ऑर्कूटचा अस्त होऊ शकतो हे अनेकांना पचलेच नसते. हीच बाब फेसबुकलाही लागू होते. निर्बंध लादणे ही मूळातच मुक्त माध्यामांच्या अस्त्विासमोर प्रश्न निर्माण करणारी गोष्ट आहे.

गाय म्हटली की शिंग उगारणार आणि घोडा म्हटला की लाथ मारणार, ही गृहितके मान्य करूनच या प्राण्यांची उपयुक्तता मानव जातीने अमलात आणली आहे. हे उदाहरण इथे द्यायचे निमित्त म्हणजे ‘केंब्रिज ऍनालिटिका’ प्रकरणाने ढवळून निघालेले वातावरण. ‘केंब्रिज ऍनालिटिका’ नावाच्या कंपनीने जे उद्योग केले ते उघडकीला आल्यावर सगळीकडेच खळबळ माजली आहे. सत्ताधारी, विरोधक आणि सोशल मीडियाची क्रांती घडवून आणणारा मार्क झुकेरबर्ग असे सगळेच याबाबतीत ऐरणीवर आले आहेत. सरकारने त्याच कायद्याच्या आधारावर आपली नखे काढून गर्जना करून दाखविली आहे. भारतातला विरोधी पक्ष अशा वेळी जे करतो ते यावेळी कॉंग्रेसने करून दाखविले आहे. या ठिकाणी सत्ताधारी भाजप असता तर त्यालाही यापेक्षा वेगळे काही करता आले नसते. यातील सगळ्यात प्रांजळ प्रतिक्रिया फेसबुकचा सातबारा ज्याच्या नावावर आहे त्या मार्क झुकेरबर्गच्या आहेत. आपण सपशेल चुकले असल्याची कबुली त्याने दिली आहे आणि पुढे आपण काय करू शकतो, याची चाचपणी त्याने सुरू केली आहे. मार्कच्या या प्रांजळपणाचे आपण कितीही कौतुक केले तरीही त्यातून तो आज निर्माण झालेले आणि यातून पुढे निर्माण होणारे प्रश्न सोडवू शकतो, यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. त्याचे मूळ कारण म्हणजे ज्या प्रकारे मुक्तमाध्यमे उत्क्रांत झाली त्यात दडले आहे. ऑर्कूटचा अस्त आणि फेसबुकचा उदय या प्रवासात आजच्या या गोंधळाची कारणे दडलेली आहेत.

मुक्त किंवा समाज माध्यमांचा उदय का झाला या प्रश्नांच्या मुळाशी जावे लागेल. पारंपरिक माध्यमांनी निर्माण केलेल्या भिंतीबंद वातावरणाचा हा परिणाम होता. जी मंडळी पारंपरिक माध्यमांच्या कक्षांमध्ये पोहोचू शकतात, तीच मंडळी या माध्यमांमधून अभिव्यक्त होऊ शकतात, अशी मुक्त माध्यमे आकारास येण्यापूर्वीची स्थिती होती. यात जाहिरात, खप व संपादकांच्या विचारसरणीच्या मर्यादा हा देखील आयाम होताच. पारंपरिक माध्यमांनी सेक्स, सेन्सेशनलीझम व गुन्हेगारी जगताच्या बातम्या हा आपल्या मजकुराचा गाभा ठरविल्याने यात अजून काही मर्यादांची भर पडली. भारतीय संदर्भातले एक उदाहरण खूपच बोलके आहे. ते आहे अमिताभ बच्चन यांचे. एका टप्प्यानंतर अमिताभ बच्चन यांनी पारंपरिक माध्यमांशी संवाद पूर्णपणे बंद केला होता. आपल्या चाहत्यांशी त्यांनी स्वत: च्या संकेतस्थळावरून संवाद साधायला सुरुवात केली. नंतर त्यांनी ब्लॉग लिहायला सुरुवात केली. अत्यंत लोकप्रिय असा हा ब्लॉग होता. त्यानंतर फेसबुक व आता ट्विटरवर अधिराज्य गाजविणारा हा महानायक आहे. आता अमिताभ बच्चन यांच्याविषयी काहीही मजकूर प्रकाशित करायचा असेल तर त्यांच्या ट्विटर अकाऊंटचा संदर्भ घेतल्याशिवाय काहीच करता येत नाही.

समाज माध्यमांनी माध्यम विश्वात स्वत:च्या जागा तयार केल्या. नंतर त्याचे चांगले-वाईट परिणाम दृश्य स्वरूपात दिसायला लागणे साहजिकच आहे. ‘कुणी तरी आहे तिथे’ असा भित्रा पवित्रा घेऊन समाज माध्यमांवर मुक्तपणे अभिव्यक्त होताच येणार नाही. अभिव्यक्ती ही मानवी जीवनाची महत्त्वाची गरज होऊन बसली आहे. जसजशी मानवी संस्कृती औद्योगिक कार्यसंस्कृतीतून माहिती-तंत्रज्ञानाच्या कार्यसंस्कृतीकडे येऊन पोहोचेल, तसतशी या अभिव्यक्तीची व्याप्ती वाढतच जाणार आहे. दररोज किमान ४५ मिनिटे ते दोन तास इतका वेळ मुक्त माध्यमांवर खर्च केला जात असल्याचे विविध सर्व्हे सांगतात. यात वय वर्षे चौदा ते साठ वयोगटातले लोक आहेत. जशजशी माध्यमे जुनी होतील तसतसा हा वयोगटही वाढतच जाईल. डेटा चोरीचा जो काही आरोप आता केला जात आहे, त्यात वयोगट, लिंग, आर्थिक स्तर, सामाजिकता अशा सर्व प्रकारच्या माहितीचे विस्तृत वर्गीकरण उपलब्ध होते. मुक्त माध्यमांवर व्यतीत केलेला वेळ ही सगळी माहिती निर्माण करतो. अशी माहिती उपलब्ध असताना त्याचा कुणी उपयोग करून घेतला नाही तर ते नवलच मानावे लागेल. विपणन शास्त्राचा संपूर्ण विकास ग्राहकांच्या गरजा तपशीलवारपणे जाणून उत्पादने निर्माण करण्याच्या केंद्रीय संकल्पनेतून झाला आहे. मुक्त माध्यमेही त्यापासून सुटलेली राहू शकत नाही. झुकेरबर्ग आजही डेटा चोरीच्या बाबतीत ठोस उत्तर द्यायला तयार नाही. त्याचे कारण तो ते करू शकत नाही, याची त्याला पूर्ण कल्पना आहे. फेसबुक त्याचे असले तरी त्यावर निर्माण केलेली अन्य ऍप्लिकेशन त्याची नाहीत. गेल्या जन्मी तुम्ही कोण होतात? तुमचे लग्न कधी होईल? तुम्ही कुठल्या जागतिक नेत्यासारखे आहात? यासारखे प्रश्न विचारून युजर्सना आपल्यात गुंतविणारी ऍप्लिकेशन्स माहिती मिळविण्याचे उपकरण म्हणूनच कामकरीत असतात. जोपर्यंत युजर्स समाजमाध्यमे वापरत राहतील तोपर्यंत असा डेटा निर्माण होतच राहणार आणि त्याचा उपयोगही केला जात राहील. समाज माध्यमे मोफत हवी असतील तर त्यामागचा आर्थिक डोलारा कुणीतरी पेलावाच लागेल. जगात काहीच फुकट नसते, हे त्रिकालाबाधित सत्य सोशल मीडियालाही लागू आहे. झुकेरबर्गने त्याच्या निवेदनात सांगितले की, त्यांनी जी ऍप्लिकेशन्स फेसबुकवर जाऊ दिली त्यापूर्वी ती तपासायला हवी होती. मग ती त्याने आधीच तपासून का पाहिली नाहीत? त्याचे कारण अशा मर्यादा लादणे मुक्तमाध्यमात शक्य नाही. अशा ऍप्लिकेशन्समुळेच युजर्सना लागणारे नवीन काहीतरी फेसबुकवर येत राहाते. इतका मोठा वापरकर्ता केवळ फेसबुकच्या माध्यमातून धरून ठेवता येत नाही. बदलत्या परिस्थितीतले हे नवे प्रवाह अनेक प्रश्नांना जन्मदेणारे आहेत. ऑरकुटचा अस्त होऊ शकतो, हे अनेकांना पचलेच नसते. हीच बाब फेसबुकलाही लागू होते. निर्बंध लादणे ही मुळातच मुक्तमाध्यमांच्या अस्तित्वासमोर प्रश्न निर्माण करणारी गोष्ट आहे. त्यामुळे हे सारे हवे असेल तर त्याची किंमतही मोजावी लागेल.

@@AUTHORINFO_V1@@