या मालक ! व्हा संरक्षक !!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |
व्यंकटेश माडगूळकरांची एक कथा आहे. एक घरमालक जुनं घर पाडून नवं घर बांधत असतो. पाया खणत असताना एका कामगाराला मारुतीची एक मूर्ती मिळते. हां-हां म्हणता बातमी गावभर पसरते. सगळा गाव मूर्ती पाहायला लोटतो. आता त्या मूर्तीचं पुढे काय करायचं, याबद्दल चर्चा सुरू होते. घरमालकाच्या पोटात गोळा उभा राहतो की, आता गावकी इथेच देऊळ उभं करण्याचा निर्णय घेते की काय? तसं झालं तर आपली जमीन गेली.

अखेर अन्यत्र कुठेतरी देऊळ बांधून ती मूर्ती बसवण्याचा निर्णय होतो नि गर्दी पांगते. सुटकेचा नि: श्वास टाकत घरमालक कामगारांना दम भरतो, ‘‘एकतर माझे कामाचे तास फुकट घालवलेत आणि वर जमीनही घालवायला निघाला होता. याद राखा, आणखी पुढे खणताना काहीही सापडलं तरी बोंबाबोंब करून गाव गोळा करायचा नाही.’’

सामान्य माणसाचं असंच असतं. त्याला इतिहास, पुरातत्त्व, प्राचीन वास्तू, मूर्ती इत्यादींमध्ये माफक रस असतो. समजा, तुमच्या मालकीची काही जमीन आहे. उद्या त्या जमिनीत काही शतकांपूर्वीचे वगैरे अवशेष सापडले, तर तुमची प्रतिक्रिया काय होईल? सरकारी पुरातत्त्व खातं आता आपली जमीन ताब्यात घेणार आणि मोबदला म्हणून काहीतरी रक्कम आपल्या हातावर टेकवणार; तीसुद्धा भरपूर विलंब लावून, हा सगळा घटनाक्रम तुमच्या डोळ्यांसमोर उभा राहणार. त्यामुळे तुमची प्रतिक्रिया अशीच राहणार की, ’काही शतकांपूर्वीचे अवशेष सापडल्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासावर नवीन प्रकाश पडला आहे, ही आनंदाची गोष्ट आहे, पण च्या मारी, हे अवशेष बोंबलायला माझ्याच जमिनीत कशाला आले? सरकारी जमिनीत किंवा गेला बाजार, शेजारच्या जमिनीत आले असते, तर किती बरं झालं असतं. हां, एखादा मोहरा भरलेला हंडा वगैरे सापडला असता, तर भाग वेगळा!

महाराष्ट्रात साधारपणे १९८० सालानंतर जुनी घरं, वाडे पाडून बहुमजली अपार्टमेंट्‌स बांधायची जोरदार लाट आली. अजूनही ती चालूच आहे. गावोगावचे अनेक इतिहास प्रसिद्ध वाडे मोडून तिथे टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. अलीकडेच काही वर्षांपूर्वी, पुण्याला मुठा नदीच्या काठावरचा एका सरदार घराण्याचा इतिहास प्रसिद्ध वाडा पाडण्यात आला. त्यात वाड्याखालून थेट नदीपर्यंत गेलेला एक उत्तम चिरेबंदी भुयारी मार्ग सापडला. आणखीही काही चकित करणार्‍या वास्तुरचना आढळल्या. मुंबईत बोरिवली या उपनगरात, अगदी गेल्या ४०-५० वर्षांपर्यंत असंख्य प्राचीन वास्तुविशेष सर्वत्र विखुरलेले होते. कारण, कृष्णगिरी उर्फ कान्हेरी हे सुमारे एक हजार वर्षांपूर्वी फार प्रख्यात असं विद्यापीठ होतं. तीच गोष्ट ठाणे, कल्याण, सोपारा या ठिकाणांची. सोपारा हे तर दोन-अडीच हजार वर्षांपूर्वी फारच प्रसिद्ध असं बंदर होतं. बायबलमध्ये ’ओफीर’ किंवा ’सोफीर’ या नावाने ‘सोपारा’ किंवा ‘शूर्पारक’ यांचा उल्लेख आहे. सोपार्‍यात मौर्य सम्राट अशोकाचा स्तूप आणि शिलालेखही सापडला आहे. त्या स्तूपाचं ठिकाण हे ‘संरक्षित स्थळ’ आहे, पण इतर कित्येक ठिकाणांवर इमारती उभ्या राहिल्या आहेत. सर्वत्र हीच स्थिती आहे. खुद्द मुंबईत शिवडी नावाचा भाग आहे. अतिशय दाट लोकवस्ती आणि मोठमोठे कारखाने, गोदामं, रेल्वे यार्ड इत्यादींनी हा भाग भरून गेला आहे. पुरातत्त्व तज्ज्ञांच्या मते, काही हजार वर्षांपूर्वी जेव्हा मुंबईसह उत्तर कोकण भागात शैव पंथाच्या पाशुपत या संप्रदायाचा प्रभाव होता, तेव्हा शिवडी किंवा शिववाडी हे ठिकाण, त्यांचं एक महत्त्वाचं केंद्र होतं. आज हा सगळा इतिहास इमारतींच्या पायांमध्ये गाडला गेला आहे. नाशिक आणि कर्‍हाड ही महाराष्ट्रातली फार प्राचीन अशी शहरं आहेत. नाशिकला गोदावरीच्या काठावर एक टेकाड होतं. सुमारे ५० वर्षांपूर्वी संत गाडगे महाराजांनी तिथे धर्मशाळा बांधायचं ठरवलं. पूज्य बाबा स्वतः त्या टेकाडावरचं रान साफ करायला भिडले आणि काय आश्चर्य! त्या टेकाडातून सातवाहनकालीन म्हणजे सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीचे अवशेष बाहेर पडू लागले.

पण अशी काही ठिकाणं वगळता सर्व छोट्यामोठ्या गावांमध्ये, शहरांमध्ये धडाधड नव्या इमारती, नव्या वसाहती उभ्या राहत आहेत. यात बिल्डर लॉबी, त्यांनी आणि राजकारण्यांनी मुद्दाम वाढवलेल्या जमिनीच्या किंमती वगैरे भाग आहेतच, पण मुळात मुद्दा हा आहे की, वाढत्या लोकसंख्येला घरं, वसाहती, अन्य नागरी सुखसोयी हव्याच आहेत. त्यासाठी नवीन घरबांधणी होणं आवश्यकच आहे. फक्त नियोजन शून्यतेमुळे सगळी गडबड होते आहे.

जिथे नियोजन आहे, इतिहास जपण्याची दृष्टी आहे आणि नवीन उभारणीची आवश्यकताही माहिती आहे, तिथे काय घडतं? त्यासाठी आपल्याला युरोपकडे बघावं लागतं. भारताप्रमाणेच युरोपलाही प्राचीन इतिहास आहे. लंडन, व्हिएन्ना, पॅरिस, मॉस्को अशा शहरांना कित्येक शतकांचा इतिहास आहे. विशेष म्हणजे या शहरांमधल्या कित्येक वास्तू आज दोनशे-तीनशे वर्षांनंतरही खणखणीतपणे उभ्या आहेत.

पण, गंमत म्हणजे त्या वास्तूच्या परिसरातच नव्या बांधणीच्या टोलेजंग इमारतीही उभ्या करण्यात आलेल्या आहेत. हे करताना जुन्या वास्तुरचनेचा दिमाख आणि नव्या रचनेची आधुनिकता हे दोन्ही सारख्याच काळजीने जतन करण्यात आलं आहे. ’१०, डाऊनिंग स्ट्रीट’ ही वास्तू गेली काही शतकं ब्रिटनच्या पंतप्रधानांचे निवासस्थान आहे. तो इतिहास प्रसिद्ध बंगला पाडून तिथे टोलेजंग इमारत उभारायची, असला आचरटपणाही त्यांनी केला नाही अथवा ती वास्तू विल्यम पिटच्या काळात होती तशीच्या तशी जतन करायची, असा कर्मठपणाही त्यांनी केला नाही. त्यांनी त्या वास्तूचं बाह्यरूप फारसं न बदलता तिच्यात काळानुरूप अंतर्गत बदल केले. मार्गारेट थॅचर यांच्या काळात सुरक्षाव्यवस्थेच्या दृष्टीने खूपच अंतर्गत बदल करण्यात आले. ते अपरिहार्यच होते. कारण, त्यांच्या कालखंडात जगभर अतिरेकी कारवाया वाढत चालल्या होत्या.

युरोपमधल्या काही शहरांमध्ये तर तिथल्या नगरपालिकांनी खास ठराव करून आपापली शहरं १५ व्या- १६ व्या शतकात जशी होती, तशीच्या तशी राखली आहेत. मोठमोठ्या हवेल्या, प्रशस्त लाकडी घरं, नागाप्रमाणे पन्नास ठिकाणी वळत, मुरकत जाणारे दगडी फरसबंदीचे अरुंद बोळ, अशी जी दृश्यं आपण ऐतिहासिक इंग्रजी चित्रपटांमध्ये पाहतो, तशी अख्खी शहरं त्यांनी राखली आहेत. वाढत्या लोकसंख्येसाठी त्या जुन्या शहरालगत नव्या वसाहती उभारल्या आहेत. जुन्या शहरातल्या घरात, समजा, चालू पिढीत चार भाऊ आहेत, तर जुन्या घरात कुणी राहायचं नि नव्या वसाहतीत कुणी जायचं, हे त्यांनी आपसात ठरवावं. वाडा पाडायचा आणि टोलेजंग अपार्टमेंट उभारून चार भावांनी चार मजले स्वत:कडे ठेवून उरलेल्या जागा विकून पैसा कमवायचा; हा लोकप्रिय भारतीय फॉर्म्युला वापरायला तिकडे अजिबात परवानगीच नाही मुळी!

अमेरिकेला, फारसा प्राचीन इतिहासच नाही. म्हणजे अमेरिका आज ज्या गोर्‍या युरोपीय लोकांनी व्यापली आहे, ते तिथे उपरेच असल्यामुळे, त्यांना अमेरिकेला इतिहासच नाही असं वाटतं. गोरे लोक अमेरिकेत जाण्यापूर्वी तिथे स्थानिक लोक सुखासमाधानाने नांदत होते. दक्षिण अमेरिकेत तर इंका, माया, ऍझटेक इत्यादी जमातींची अत्यंत समृद्ध अशी राज्यं होती. गोर्‍या लोकांनी या अमेरिकन जमातींना ’रेड इंडियन’ असं नाव ठेवलं. त्यांची बेसुमार कत्तल केली, बाटवाबाटवी केली आणि त्यांची राज्यं हडप केली.

’कोकणचा कॅलिफोर्निया करणार’ या राजकारणी घोषणेमुळे म्हणा किंवा अलीकडे पुष्कळ भारतीय लोक स्थायिक झाल्यामुळे म्हणा, आपल्याला ‘कॅलिफोर्निया’ हे नाव माहिती असतं. हा प्रांत अमेरिकेच्या पश्चिम किनार्‍यावर असून सॅन फ्रॅन्सिस्को ही त्याची राजधानी आहे. त्याच्या पलीकडे पूर्वेला उटाह नावाचा प्रांत आहे. या प्रांतात ख्रिश्चन उपासना पंथातलाच ’मॉरमॉन’ या संप्रदायाला मानणार्‍या लोकांची बहुसंख्या आहे. ’मॉरमॉन’ लोकांना कुटुंब नियोजन वगैरे गोष्टी मान्य नाहीत. त्यामुळे त्यांची लोकसंख्या सतत वाढत असते. त्याचप्रमाणे उटाह प्रांत निसर्गसुंदर असल्यामुळे निवृत्तीनंतर उटाहमध्ये येऊन बंगला बांधून राहणारे पेन्शनदार अमेरिकनही खूप असतात. साहजिकच उटाहमधली गावं, नगर, शहर सतत विस्तार पावत असतात.

अलीकडेच उटाहमधल्या सेंट जॉर्ज आणि कानाब या निसर्गसुंदर गावांमध्ये नवीन घरबांधणी चालू असताना अचानक प्राचीन अवशेष सापडू लागते. हाकबोंब झाली. तज्ज्ञ मंडळी तिथे पोहोचली. अधिक संशोधनांती त्यांना तिथे ’अनासाझी’ या ‘रेड इंडियन’ जमातीची अख्खी वस्तीच सापडली. उटाह प्रांताच्या कायद्यानुसार अशी प्राचीन वस्ती जतन करण्याची गरज नाही. म्हणजे बिल्डर मंडळी अगदी कायदेशीरपणे त्या प्राचीन अवशेषांवरून बुलडोझर फिरवू शकली असती, पण त्यांना इतिहासाची दृष्टी आणि नवीन मार्केटिंग तंत्र हे दोन्ही अवगत असल्यामुळे त्यांनी वेगळीच युक्ती लढवली आहे.

त्यांनी नव्या बंगला वसाहतीची रचना अशी बनवली आहे की, प्रत्येक बंगल्याच्या आवारात एखादा तरी प्राचीन अवशेष येईल. शिवाय त्यांनी आपल्या वसाहतीची जाहिरात केलीय, ’तुमच्या परसदारी इतिहास! बंगला विकत घ्या आणि तुमच्या आवारातल्या अनासाझी रेड इंडियन जमातीच्या प्राचीन अवशेषांचं तुम्हीच जतन करा! इतिहासाचे संरक्षक व्हा आणि मालकही!’



- मल्हार कृष्ण गोखले
@@AUTHORINFO_V1@@