मानवी उत्सुकता आणि तंत्रज्ञान

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    23-Mar-2018   
Total Views |



फेसबुकवरील माहितीचा उपयोग करून आयकर विभाग कार्यवाही करणार असेल, तर तशाच माहितीचा उपयोग करून एखाद्या राजकीय पक्षाने आपली निवडणूक मोहीम राबविली तर त्यात एवढे आकांडतांडव करण्यासारखे काय आहे, हे समजण्याच्या पलीकडचे आहे.

नवीन उत्सुकतेला अनेक पदर आहेत. त्यातील एक महत्त्वाचा पदर म्हणजे दुसर्‍याच्या मनात काय आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता. या ‘मनकवडेपणाची’ कला आपल्यापाशी असावी, असे न वाटणारा माणूस विरळा. एखाद्या माणसाच्या बोलण्यातून, वागण्यातून, शारीरिक आविर्भावातून त्याच्याबद्दल ऐकलेल्या हकीकतीतून त्याच्या मनात काय असावे, हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करीत असतो. परंतु, अनेकदा या माध्यमातून माणसाचे मन जाणून घेण्याची प्रक्रिया मयसभेइतकीच फसवी असते. कारण, बहुतेक वेळा माणूस आपल्या शब्दांचा उपयोग भावना व्यक्त करण्यापेक्षा त्या लपविण्यासाठी करीत असतो. आपल्या मनाचा थांग दुसर्‍याला लागू न देणे, हे व्यवस्थापन शास्त्रातील मोठे कौशल्य मानले जाते. महाराष्ट्रातील एका मातब्बर राजकीय नेत्याबद्दल असे म्हटले जाते की, त्याने पाठीवर शाबासकीची थाप मारली की त्याच्यापुरते आपले महत्त्व संपले आहे, याचा तो संकेत आहे, असे माहितगार समजून घेत.

त्याचबरोबर माणसाला आपल्या भविष्याबद्दल खूप उत्सुकता असते. राशी भविष्यावर विश्वास असो वा नसो, पण आपले भविष्य समजून घेण्यास उत्सुक नसलेला माणूस जगात शोधूनही मिळणार नाही. माणसाला भविष्यातील अनिश्चितता नकोशी वाटत असते. वर्तमान तेवढा खरा आणि भविष्यकाळातील निश्चितता तितकीच फसवी, असा अनुभव अनेकवेळा येत असतो. संध्याकाळी कार्यालय संपताना एका व्यापार्‍याला त्याचा चेक तयार असल्याचा फोन आला. त्याने तो चेक घेण्यासाठी दुसर्‍या दिवसापर्यंत न थांबता, तो चेक गेटवरच्या वॉचमनकडे ठेवायला सांगितला आणि रात्रीच तो घेण्याची व्यवस्था केली. ‘‘आता रात्री तर तू चेक बँकेत टाकणार नाहीस. मग एवढ्या घाईने चेक घेण्याची गरज काय? तो उद्याही घेता आला असता?’’ असा प्रश्न त्याच्या मित्राने विचारला असता तो म्हणाला, ’’उद्या सकाळपर्यंत काहीही होऊ शकते, अगदी त्या कंपनीच्या दृष्टीने वेगळी प्राथमिकता येऊन माझ्याऐवजी तो चेक ते दुसर्‍यालाही देऊ शकतात. मला कोणताही धोका पत्करायचा नाही.’’ त्यामुळे भविष्यातील आपला धोका कमी करण्यासाठी अनेक पद्धतींनी माणसे माहितीची शोधाशोध करीत असतात. ज्यांना अशी शोधाशोध करायचा खटाटोप करायचा नसतो, ते मात्र ज्योतिषांचे पहिले ग्राहक बनतात.

माणसाच्या स्वभावाचा अंदाज घेणे आणि आपले भवितव्य सुनिश्चित करणे, या दोन्ही गोष्टी परस्परांशी संलग्न आहेत. लग्न करीत असताना मुलाचे आणि मुलीचे नातेवाईक एकमेकांविषयी जेवढी माहिती गोळा करता येईल, तेवढी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करीत असतात. नोकरीच्या किंवा अन्य कोणत्याही मुलाखतीला जात असताना मुलाखत घेणारा कोण आहे, तो कशाप्रकारे विचार करतो, याची माहिती घेण्याचा प्रयत्न उमेदवार करत असतात. याचे कारण अनिश्चित घटकांचे निश्चित घटकांमध्ये रूपांतर करून आपले भवितव्य सुरक्षित करण्याचा हा स्वाभाविक मानवी प्रयत्न असतो. आपण ज्यांच्यासोबत काम करणार आहोत त्यांचे विचार, त्यांची मानसिकता समजावून घेणे व त्यानुसार आपली प्रतिक्रिया देणे हे जीवनात यशस्वी होण्याचे महत्त्वाचे लक्षण मानले जाते.

माणसांच्या मनाचा अंदाज ओळखून आपले भविष्य सुनिश्चित करण्याची परंपरा प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. राज्यव्यवहारात त्याकरिता गुप्तहेरांचा उपयोगही केला जात असे व आजही होतो. परंतु, संपर्क तंत्रज्ञानाने गेल्या २५ वर्षांत जी प्रचंड प्रगती केली आहे, त्यामुळे ही माहिती संकलित करण्याच्या व मिळविण्याच्या क्षमतेत प्रचंड वाढ झाली आहे. सध्या सर्वोच्च न्यायालयात आधारपत्राच्या उपयोगाबाबत आणि नागरिकांच्या ’राईट ऑफ प्रायव्हसी’ संदर्भात चर्चा सुरू आहे. परंतु, आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाने अशी स्थिती निर्माण केली आहे की, माणसाने केलेली प्रत्येक हालचाल ही कोणत्या ना कोणत्या यंत्राच्या संपर्कक्षेत्रात येत असते. माणसाच्या नित्य जीवनाचा अविभाज्य भाग असलेला भ्रमणध्वनी आपण कुठे आहोत, याचा ठसा उमटवून जात असतो. त्यातच सुरक्षिततेच्या व अन्य कारणांसाठी लावलेल्या सीसीटीव्हीत आपल्या कोणत्या गोष्टी दिसत आहेत, हे कळणेही अवघड आहे. त्यामुळे जोवर एखादी व्यक्ती आपल्याला लक्ष्य करीत नाही, तोपर्यंतच आपला ’राईट ऑफ प्रायव्हसी’ शिल्लक राहतो.

गुगल, फेसबुक, व्हॉटस्‌ऍप, ट्विटर आदी साधने आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झाली आहेत. या चारही गोष्टी मोफत उपलब्ध आहेत. जगातील कोणतीही गोष्ट फुकट नसते. त्याची किंमत आणखी कोणीतरी कशासाठी तरी मोजलेली असते, हा अर्थशास्त्राचा सर्वसामान्य सिद्धांत आहे. ज्यावेळी आपण या गोष्टी ‘फुकट’ म्हणून वापरत असतो, त्यावेळी त्याची किंमत आपण दुसरीकडे कोठेतरी मोजत असतो, असा त्याचा साधा अर्थ आहे. या सर्व व्यासपीठांचा वापर करीत असताना आपल्या विचारांचे, वागण्याचे आपल्या संबंधांचे पुरावे आपणच तयार करीत असतो. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने या पुराव्यांची छाननी करून त्याचा उपयोग केला गेला, तर तक्रार करण्यात अर्थ नसतो. कारण, ही मोफतची सुविधा वापरण्यासाठी दिलेली ती किंमत असते.

यामुळे आपल्या भोवतालच्या आणि संबंधितांच्या व्यक्तीचे मन ओळखण्याचे अनेक मार्ग उपलब्ध झाले आहेत. ’व्हॉटस्‌ऍप’ वर कोणत्या मूडचा डिपी टाकला आहे, कोणते स्टेटस टाकले आहे याचे महत्त्व व्हॉटस्‌ऍपवर येणार्‍या असंख्य निरोपांपेक्षा अधिक असते.त्यावरून अनेकजण त्या व्यक्ती विषयीचा अंदाज बांधत असतात. आता तर कोणत्याही अपरिचित व्यक्तीला भेटण्याआधी फेसबुक व गुगलवरून त्याचा परिचय आधीच करून घेणे, हा आवश्यक भाग बनला आहे.

या पार्श्वभूमीवर निवडणुकीमध्ये फेसबुक आणि गुगल यांची माहिती निवडणूक जिंकण्यासाठी वापरली जाते, यासंबंधी चाललेल्या चर्चेचा विचार करावा लागेल. जसजशी निवडणुकीची संस्कृती समाजामध्ये रुजू लागली, तसतसा लोकांच्या मनाचा कल कोणता आहे, हे निवडणूक जिंकण्यासाठी समजून घेणे आवश्यक बनले. पूर्वी नेतृत्वाची व्याख्या, ’जो समाजाला दिशा देतो,’ अशी होती, ती आता बदलून गेली आहे. ’जो समाजमनाचा उत्तमप्रकारे अनुनय करू शकतो व त्यावर प्रभाव टाकू शकतो, तो नेता’ अशी नवी व्याख्या बनली आहे. प्रियेने प्रियकराला होकार द्यावयाचा असेल तर प्रथमप्रियेच्या मनाचा थांग लागून त्याप्रमाणे तिचा अनुनय करणे प्रियकरास भाग असते. त्याप्रमाणे लोकमनाचा अंदाज घेण्यासाठी राजकीय नेत्यांचा आणि पक्षांचा प्रयत्न सुरू असतो. जसजसे तंत्रज्ञान बदलत गेले तसतशी या प्रयत्नांची दिशाही बदलून गेली. प्रारंभीच्या काळात लोकमानस जाणून घेण्यासाठी राजकीय पक्ष कार्यकर्त्यांवर अवलंबून असत. कार्यकर्ताकेंद्री राजकीय पक्षांची संघटना हे समाजमन जाणून घेण्याचे प्रभावी साधन होते. कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता हा राजकीय पक्षाचे डोळे, कान, हात, पाय होता. परंतु, जशी राजकीय पक्षात ‘हायकमांड’ संस्कृती सुरू झाली तसे कार्यकर्त्यांचे महत्त्व कमी झाले. मग राजकीय पक्षांना विविध जाहिरात कंपन्यांच्या आधारे मतदारांची सर्वेक्षणे करून लोकमानसाचा अंदाज घेणे भाग पडले. निवडणुकीतील सर्वेक्षणाच्या आधारे उमेदवार आणि पक्षाची धोरणे ठरविली जावू लागली. पक्षपंगतीत कार्यकर्त्यांचे महत्त्व संपून पक्षाची ‘कॉर्पोरेट’ संस्कृती तयार झाली.

अमेरिकन निवडणुकीत या ‘कॉर्पोरेट’ संस्कृतीने एक पुढचे पाऊल टाकले आणि लोकमानसाचा अंदाज घेण्यासाठी फेसबुकच्या माध्यमातून माहिती गोळा केली. यावर आता आकाश-पाताळ एक केले जात आहे. वास्तविक पाहता दुसर्‍याच्या मताचा अंदाज घेऊन त्याला आपल्यासाठी अनुकूल करून घेणे, याचे प्रयत्न सनातन काळापासून सुरू आहेत. मताचा अंदाज घेण्याची साधने काळानुसार बदलत आहेत. फेसबुकवरील माहितीचा उपयोग करून आयकर विभाग कार्यवाही करणार असेल, तर तशाच माहितीचा उपयोग करून एखाद्या राजकीय पक्षाने आपली निवडणूक मोहीम राबविली तर त्यात एवढे आकांडतांडव करण्यासारखे काय आहे, हे समजण्याच्या पलीकडचे आहे. जसजसे तंत्रज्ञान अधिकाधिक विकसित होत जाईल, तशी अशा प्रकारची नवनवी साधने येत राहणार आणि त्यांचा उपयोग होत राहणार. पूर्वी ’स्टोव्ह’ ऐवजी ’गॅस’ आल्यानंतर नाके मुरडणार्‍यांची पिढी आणि आता फेसबुक, गुगलवर आक्षेप घेणार्‍यांची पिढी यात मूलतः काहीच फरक नाही. फक्त दुसरी पिढी आपण बुद्धिवादी नाही व विचारवंत असल्याचा दावा करते, तशी पहिली पिढी करीत नव्हती एवढेच. आज गुप्तहेर खात्यात कितीही अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले गेले तरी ते तंत्रज्ञान मानवी हेरांना पर्याय ठरू शकत नाही, हे सर्वमान्य झाले आहे. तसेच लोकमानस समजून घेण्यासाठी कितीही तंत्रज्ञाने आली तरी ती कार्यकर्त्यांना पर्याय ठरू शकत नाहीत. आज नेत्यांना संवेदनाशील कार्यकर्ते नको आहेत, त्यांना पक्ष चालविण्यासाठी कंत्राटी कामगार हवे आहेत. जो पक्ष अशाप्रकारे कंत्राटी कामगारांद्वारे चालविला जातो, त्यांना लोकमानसाची माहिती अशाच माध्यमातून मिळविणे भाग आहे. याला उत्तर तंत्रज्ञानाचा उपयोगच बंद करणे, हे नाही. कारण तसे करणे अशक्य आहे. कितीही जुनाट वाटली तरी कार्यकर्ताकेंद्रित पक्षपद्धती हेच याला खरोखरीचे उत्तर आहे.


- दिलीप करंबेळकर
@@AUTHORINFO_V1@@