फेसबुक डाटा लिक : मार्क झकरबर्गचा माफीनामा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2018
Total Views |

 
कॅलिफोर्निया : फेसबुक डाटा चोरीला गेल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर फेसबुकचा संस्थापक मार्क झकरबर्गने आपली चूक मान्य केली आहे. फेसबुकचा डाटा लिक झाला असून यासाठी जबाबदार असलेल्या गोष्टींचा शोध घेण्याचे काम सुरु आहे, असे झकरबर्गने म्हणले आहे. तसेच यापुढे अशी घटना घडू नये, यासाठी आवश्यक उपाय देखील केले जात असल्याचे त्याने म्हणले आहे.


झकरबर्गने आपल्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली असून यामध्ये त्याने डाटा लिक झाल्याचे मान्य केले आहे. 'कॅम्ब्रिजच्या संस्थेने केलेल्या सर्वेक्षणानुसार झालेल्या डाटा चोरीचा शोध घेतला जात आहे. यासाठी आवश्यक सर्व उपाय केले जात असून या घटनेसाठी आम्ही सर्वांची माफी मागत आहोत,' असे झकरबर्गने म्हणले आहे. तसेच आवश्यक ते उपाय करून देखील काही चुका राहिल्यामुळे ही घटना घडली. त्यामुळे यापुढे अशी चूक पुन्हा होणार नाही, अशी कबुलीही झकरबर्गने  दिली आहे.


 
 
गेल्या दोन दिवसांपूर्वी कॅम्ब्रिजमधील एका संस्थेने फेसबुकचा डाटा लिक झाल्याचा अहवाल सादर केला होता. त्यानंतर जगभरात एकच खळबळ उडाली होती. अनेकांनी त्यावेळी फोनमधून फेसबुक डिलीट करण्याचा देखील सल्ला दिला होता. जगभरात त्यानंतर 'डिलीट फेसबुक' असा ट्रेंडही सुरु झाला होता व त्यानुसार अनेकांनी आपल्या फोनमधून फेसबुक डिलीट केले होते. यानंतर जगभरात यावर चर्चा सुरु झाल्यानंतर झकरबर्गने यावर आपली प्रतिक्रिया दिली.
 
 
दरम्यान या सर्व प्रकरणामुळे फेसबुकच्या समभाग विक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. गेल्या २ ते ३ दिवसांत फेसबुकच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून त्यामुळे फेसबुकला लक्षावधी डॉलर्सचा फटका बसला आहे. तसेच या वादग्रस्त प्रकरणासाठी केंब्रिज अनालिटिका या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचीही हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एकंदरच या सर्व प्रकारामुळे फेसबुकच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@