पाणी नासाडी करणार्‍यांवर ‘वॉच’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2018
Total Views |

 

चोपडा न.पा.कडून विशेष पथक स्थापन; आतापर्यंत १२५ जणांना नोटिसा

 
 
चोपडा :
एकिकडे शहरात पाणीटंचाई भासत असताना काही नागरिकांकडून पाण्याची नासाडी केली जात आहे. हा प्रकार थांबावा म्हणून चोपडा नगरपालिकेने विशेष पथक स्थापन करून पाण्याची नासाडी करणार्‍यांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. हे विशेष पथक पाण्याची नासाडी करणार्‍यांवर वॉच ठेवत असून, आतापर्यंत १२५ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.
 
 
नगरपालिकेच्या विशेष पथकात पाणीपुरवठा अभियंता विपूल साळुंखे, लिपिक यु.बी. खेवलकर, शिवाजी चौधरी व शशिकांत शेगडे यांचा समावेश आहे. चोपडा शहराला कठोरा येथील तापी नदीपात्रातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सद्यस्थितीत तापी नदीपात्रात पाणी नसल्याने नगरपालिकेने गुळ धरणातून आवर्तन घेतले आहे. शहराला बजरंगनगर, यावल रोड, थाळनेर दरवाजा आणि हुडको कॉलनी अशा ४ जलकुंभांद्वारे दररोज ८० लाख लीटर पाण्याचा पुरवठा होतो. आजच्या घडीला शहरात पाणीटंचाई भासत असल्याने अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी स्वेच्छेने पाण्याचे टँकर उपलब्ध करून दिले आहेत. त्याचप्रमाणे ४५ कुपनलिकांच्या माध्यमातूनही पाणीपुरवठा होत आहे. अशी स्थिती असताना शहरातील काही नागरिक पाण्याची बचत न करता नासाडी करत आहेत. अशा नागरिकांवर कारवाई करण्यासाठी नगरपालिकेने पथक तयार केले आहे. हे पथक नळांना तोट्या बसवणे, पाण्याची नासाडी न करणे असे आवाहन नागरिकांना करत आहे. तरीही पाण्याची नासाडी करणार्‍या नागरिकांचे चित्रीकरण करून त्यांना नोटिसा बजावल्या जात आहेत. काही नागरिकांनी एकाच मालमत्तेवर २ ते ३ नळ कनेक्शन घेतलेले आहेत. असे नळ कनेक्शनही हे पथक शोधत आहे. अवैध नळ कनेक्शन वापरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
 
@@AUTHORINFO_V1@@