विरोधकांच्या अस्वस्थतेला निवडणुकीचा मुहूर्त!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
 
निमित्त गवसले रे गवसले, की सरकारवर तुटून पडायची रणनीती, लोकसभा निवडणुकीचा मुहूर्त साधून कशी जोमात बाळसे धरते आहे बघा! कालपर्यंत नियमितपणे विरोधकांच्या पंक्तीत जाऊन बसणार्‍या शिवसेनेच्या जोडीला आता मनसेही विराजमान झाली आहे. गर्दीत बसलेल्या लोकांच्या टाळ्या मिळवण्यासाठी बेताल विधाने करताना जरासा पायपोस राखण्याचे भान राजकारणात राखायचे नसतेच, असा गैरसमज झालाय जणू इथे सर्वांचाच अलीकडे. त्यामुळे, नोकर्‍यांसाठी परवा रस्त्यावर उतरलेली प्रशिक्षणार्थी पोरं अचानक कुणाच्यातरी सहानुभूतीचा विषय ठरली. त्यांनी केलेलं आंदोलन डोक्यावर घेण्याची इच्छा सहजपणे कुणाच्यातरी मनात निर्माण झाली. साहेब तर आधीच कनवाळू. फार वाईट वाटलं त्यांना या पोरांना आंदोलन करताना बघून. राज ठाकरेंना तर रामजन्मभूमीच्या मुद्यावरून येत्या काळात या देशात दंगली पेटणार असल्याचा जावईशोध लागला. आपण कसले असंबद्ध बरळतोय्‌, आपल्या बडबडीचा समाजावर काय परिणाम होईल, याचा थोडाही विचार करण्याची गरज वाटली नाही त्यांना. अर्थात, विचार करायचा तरी कशाला म्हणा त्यांनी? हा देश जोडून ठेवण्याची जबाबदारी राजकारण्यांची थोडीच आहे. त्यांची जबाबदारी फक्त निवडणुकी स्वत: जिंकण्याची किंवा आपल्या पक्षाला विजय मिळवून देण्याची. बाकी सामाजाचं, देशाचं काय वाटोळं व्हायचं ते होवो, यांना काय घेणे देणे त्याच्याशी. शिवसेनेच्या नेत्यांच्या अजब, अफलातून वागण्याचे तर आश्चर्यही वाटेनासे झाले आहे अलीकडे लोकांना. सरकारमध्ये राहून विरोधी पक्षनेत्याच्या थाटातली त्या पक्षाच्या प्रमुखांची वर्तणूकही सरावाची झालीय्‌ आताशा लोकांच्या. त्यात मनसेप्रमुखांची भर पडणे तसे नवलाईचे नाहीच! गेल्या निवडणुकीत इंजिनाची चाकं जमिनीत पुरती रुतली होती. कसाबसा एक सदस्य निवडून आला तर तोही हाती राहिला नाही राजसाहेबांच्या. अशात, पुढ्यातली निवडणूक तर राजकीय अस्तित्वाची लढाई ठरणार आहे त्यांच्यासाठी.
 
मग छातीला माती लावून मैदानात उतरण्याला पर्याय तरी कुठला उरतो दुसरा. तीच तयारी चालली आहे साहेबांची. उद्धव आणि राजच कशाला, सत्तेतून हद्दपार झालेल्या झाडून सार्‍या राजकीय पक्षाच्या नेत्यांना सध्या तेवढाच एक धंदा उरला आहे. सर्वांना निवडणुकीचे घुमारे फुटले आहेत. नजरेसमोर सत्तासुंदरी नाचते आहे प्रत्येकाच्या. त्यामुळे शेतकरी-कामगारांचे मोर्चे काय नि बेरोजगारांचे प्रश्न काय, सारेच ऐरणीवर आले आहे आता यांच्या लेखी. मोर्चात सहभागी झालेल्या बळीराजाला पायपीट करून मुंबईत आणणार्‍यांनीच त्या पायपिटीमुळे त्याच्या तळपायाची सालं निघाल्याचे राजकारण करावे, यासारखा दुर्दैवी प्रकार शोधून सापडणार नाही कदाचित. पण, राजकारणाच्या नादात कुणाच्याच ध्यानात येत नाही असले मुद्दे, ते षडयंत्र अन्‌ ती षंढ वृत्तीही. राबराब राबून गालवर सुरकुत्या पडलेल्या आजीची फरफट, आधीच भेगा पडलेल्या तिच्या पायांच्या वेदना खरंतर काळीज चिरून काढणार्‍या... पण त्या वेदनांवर फुंकर घालायचीय्‌ कुणाला इथे? इथे तर प्रत्येकालाच त्यावरून राजकारण करण्यातच अधिक रस. ज्या सरकारच्या दरबारात येऊन मागण्या करण्यासाठी म्हणून मोर्चा काढावा लागला, त्याच्या नावाने शिव्यांची लाखोली वाहण्यात, कडाकडा बोटे मोडण्यातच धन्यता मानली सर्वांनी. ज्या ज्या म्हणून मुद्यांचा गवगवा करीत शेतकरी, कष्टकर्‍यांचा हा भला मोठा मोर्चा काढण्यात आला, त्यातला कुठला मुद्दा नवीन होता, त्यातली कुठली मागणी अशी होती की जी यापूर्वी कधीच झाली नव्हती? ज्यांनी कालपर्यंत या समस्यांचे पुरते खोबरे केले, तेच दीडशहाणे आता ती समस्या सोडवण्याची मागणी करण्यासाठी हिरीरीने समोर येताहेत.
 
बेंबीच्या देठापासून ओरडताहेत. त्यांना आता शेतकरी पूर्णपणे कर्जमुक्त झालेला हवाय्‌ अन्‌ समस्यामुक्तही. रेल्वे विभागात प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू झालेल्या तरुणांना प्रशिक्षणानंतर लागलीच नोकर्‍या देण्याची तरतूद, प्रथा आहे की नाही, प्रशिक्षणार्थी म्हणून रुजू करून घेताना त्यांना नंतर नोकर्‍याही देण्यात येतील, याची हमी देण्यात आली होती का, कॉंग्रेसच्याही काळात अॅप्रेंटिसला कायम नोकरी देण्याचा प्रघात अंमलात आला होता का कधी, की फक्त आता आपण सत्तेत नसल्याचे बघून कणव दाटून आलीय्‌ त्यांना या बेरोजगारांबद्दल, आदी प्रश्नांच्या वाट्यालाही जायचं नाही कुणी. हो! भावना दुखावतात मग लोकांच्या. शिवाय निवडणुकी व्हायच्या आहेत येत्या वर्ष-दीड वर्षात. अशात, जनमानस दुखावण्याचे धाडस कोण, कशाला करणार? उलट, या प्रशिक्षणार्थींवर मुंबईत रेल रोको आंदोलन करण्याची वेळ आली तर डोळ्यांतून घळाघळा अश्रू गळालेत साहेबांच्या. प्रचंड संतापले. म्हणाले, नोकर्‍या द्यायच्या नव्हत्या तर मग अॅप्रेंटिसशिप कशाला दिली? प्रशिक्षण दिल्यावर हाकलून द्यायला का? गत निवडणुकीतील पराभवाचे गणित न उलगडल्याने भल्या मोठ्या कालावधीच्या अज्ञातवासात गेल्यानंतर आगामी निवडणुकीत भाग्य आजमावण्याच्या ईर्ष्येने पुन्हा एकदा दंड थोपटून सरसावलेल्या दुसर्‍या साहेबांची महिमा काय वर्णावी? त्यांना तर ना राज्य करायचे ना विरोधी पक्षाची भूमिका बजावायचीय्‌. त्यासाठी लागणारे संख्याबळ जनता कधीच त्यांच्या पारड्यात टाकणार नाही, याची खात्री तर खुद्द राजसाहेबांनाही देता येईल एखाद् वेळी! पण, तरीही जमेल तेवढ्या ताकदीने राजकारणाचा वारू उधळत राहायचा.
 
जो कोण सत्तेत असेल, त्याला झोडपत राहायचे. जनतेच्या मनात असलेली कथित क्रेझ... त्याचा ‘वापर’ करत राहायचं. जमेल तेवढं. जमेल तसं. मग कधी शरद पवारांच्या मुलाखतीच्या नाट्यप्रयोगातली भूमिका साकारायची, तर कधी एखाद्या जाहीर सभेत सरकारची पाठ सोलून काढत असल्याच्या आव आणत मोठ्याने गर्जना करायची... नौटंकीबाजांच्या या स्पर्धेत कॉंग्रेस, राष्ट्रवादी, कम्युनिस्ट कोणीच मागे नाहीत. सर्वांनाच येती निवडणूक जिंकायची आहे. काहीही करून जिंकायची आहे. स्वत: जिंकू शकत नसेल, तर निदान भाजपाला सत्तेतून घालवायचे तरी आहेच यातील प्रत्येकाला. त्याचसाठी धडपड चाललीय्‌ त्यांची. काहीही करून भाजपाकडून सत्ता हिसकावयाची. त्याकरता आरोपांच्या फैरी झाडाव्या लागल्या तरी चालेल. समस्यांचा खोटाखोटा डोंगर उभारावा लागला तरी चालेल. चांगल्या असल्याचे मनापासून पटत असले, तरी सरकारच्या सार्‍याच योजनांवर तुटून पडावे लागले तरी चालेल. पण, सरकारविरुद्ध कांगावा करण्यात जराही कसूर बाकी ठेवायचा नाही. जमेल तेवढे त्याला बदनाम करायचे, यासाठी हवसे, नवसे, गवसे, सारेच सिद्ध झालेत बघा. केलेल्या कर्माची फळं भोगण्यासाठी कारागृहात दाखल झालेल्या लालूंपासून तर पंतप्रधानपदाची स्वप्नं बघणार्‍या महाराष्ट्रातील जाणत्या राजापर्यंत, कुणी म्हणून कुणीच मागे नाही. सारेच पराक्रम गाजवायला सिद्ध झालेत. राज आणि पवारांच्या कोट्या, कम्युनिस्टांचा थयथयाट, कॉंग्रेसचा विरोधातला सूर, या पार्श्वभूमीवर सरकारचा एक भाग असलेल्या शिवसेनेची नौटंकी नाही म्हणायला अनाकलनीय आहे, पण... करता काय, निवडणुकीचा मुहूर्त समीप येतोय्‌ तसतशी ती अधिक वेगवान होत जाणार आहे- तेवढ्याच अनाकलनीय रीत्या...
@@AUTHORINFO_V1@@