फुलांनी फुलविली भविष्याची वाट...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
- एलएलबी तरुणाचा पारंपरिक शेतीला फाटा
- दरदिवशी 10 हजाराचे उत्पन्न
हेमंत निखाडे
 
तिवसा, 
 
फुलांनी इतके फुलावे, इतके फुलावे की देठाचेही फुल व्हावे...
अशी लोककवी मनमोहन नातू यांच्या कवितेची ओळ आहे. एका कास्तकार पुत्राने एलएलबीचे शिक्षण घेत असताना बाकायदा शेतीत लक्ष घातले अन्‌ फुलांची शेती करत रोजचे 10 हजार या प्रमाणे महिन्याला किमान 3 लाख रुपयांची कमाई सुरू केली. त्याचे आयुष्य आता देठासह फुलून आले आहे.
 
एकतर उच्चशिक्षण घेणारी शेतकर्‍यांची मुलं शेती-मातीत लक्ष घालतच नाहीत. उलट शेती विकून नोकरी विकत घेण्याकडेच त्यांचा कल असतो. फुलांची शेती फुलवून भविष्याची वाट फुलांफुलांची सुगंधी करून टाकणार्‍या या युवकाचे नाव आहे प्रसन्न विनोद उमप.
तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथील एलएलबीचे शिक्षण घेणार्‍या या तरुणाने आपल्या वडिलांच्या 7 एकर शेतापैकी केवळ अर्ध्या एकरात ‘जलबेरा’ फुलांची शेती करून घर लक्ष्मीने दरवळून टाकले आहे.
 
वडिलांच्या पारंपरिक शेतीला जिद्द, चिकाटी, परिश्रम व अभ्यास करून यशाची फुले निर्माण करणार्‍या प्रसन्नने एलएलबी केले. मात्र, पुढे नोकरीच्या मागे न लागता त्याने आपल्या वडिलांचीच शेती करण्याचा निर्णय घेतला. हा नुसता निर्णय नव्हता तर तो अभ्यासपूर्ण असा होता. पारंपरिक शेतीत सध्या गहू, सोयाबीन, कापूस, हरभरा, संत्रा आदी पिके शेतकरी घेतात. मात्र नैसर्गिक आपत्ती, पिकाची लागवड ते काढणी पर्यंतचा खर्च, मजुरी या सर्वातून शेवटी पदरात पडणारे उत्पन्न याचा सर्व हिशेब काढतो म्हटलं की शेतकरी तोट्यात असतो. या चक्रव्युहात न अडकता प्रसन्न याने आपल्या शेतात प्रचंड मागणी असलेल्या ‘जलबेरा’ या फुलाची शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याला तालुका कृषी विभागाचे मार्गदर्शन मिळाले. तळेगाव दाभाडे येथे जाऊन त्याने प्रशिक्षण घेतले. बँकेमार्फत कर्जाचे प्रकरण मंजुर झाले. कर्ज मिळाले. पुणे येथून कलमा आणल्या. लालमाती आणली. शेतात शेडनेट उभारले. जुलैमध्ये जलबेरा लागवड केली. सिंचनाची सुविधा केली. आक्टोबरच्या दसर्‍यापासून प्रसन्नच्या शेतातून रंगिबेरंगी जलबेराची फुले निघायला सुरुवात झाली. या फुलशेतीच्या संगोपनाची पूर्णपणे काळजी प्रसन्न व त्याचे कुटुंब सध्या घेत आहे. त्यामुळे प्रसन्न सध्या दररोज सुमारे 4 ते 5 हजार फुले काढून ते शहरातील बाजारात विकतो.
अतिशय नियोजनबद्धरित्या व अभ्यासपूर्ण अशी जलबेरा फुलशेती या तरुण शेतकर्‍याने यशस्वी केली आहे. उर्वरित शेतजमीनीवर नवनवीन प्रयोग त्याला करायचे आहे. तसे प्रयत्न तो करीत असून वडील डॉ. विनोद उमप व आईची साथ त्याला लाभली आहे.
कोटस्‌-
टोमॅटो, स्ट्रॉबेरी पीकविणार
केवळ अर्ध्या एकर जागेत जलबेरा फुलशेतीचे पीक घेतले आहे. आता उर्वरित जागेवर शेडनेट उभारत असून त्यात टोमॅटो, शिमला मिरची व स्ट्रॉबेरीचे पीक घेण्याचे नियोजन केले आहे. तसेच एका बाजूला गावराणी कोंबडीचे कुक्कुटपालन हा व्यवसाय याच शेतजमिनीवर उभारणार आहे. यामध्ये मी पूर्णपणे समाधानी आहे. मला तालुका कृषी अधिकारी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
-प्रसन्न वि.उमप
------
युवकांनी शेतीकडे वळावे
कृषी विभागाकडून शेतकर्‍यांसाठी अनेक योजना राबविण्यात येतात. शेडनेट शेती असो किंवा इतर कोणतीही त्यासाठी कृषी विभागाकडून सतत मार्गदर्शन दिल्या जाते. प्रसन्न त्यापैकीच एक आहे. ज्याने कृषी विभागाचे वेळोवेळी मार्गदर्शन घेतले व तो या फुलशेतीत यशस्वी झाला. त्याचा आदर्श आजच्या तरुण शेतकर्‍यांनी घेतला पाहिजे.
- अनंत मस्करे
ता. कृ.अधि.तिवसा.
---
@@AUTHORINFO_V1@@