उद्योजकांना भारतात विकासाची सर्वाधिक संधी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2018
Total Views |

अतुल राजोळी यांचे प्रतिपादन

 

 
 
 
नाशिक : “भारतात उद्योजकांना विकासाची सर्वाधिक संधी आहे. लोकसंख्या ही भारताची शक्ती आहे, कारण आपल्याकडे अद्याप विकास व्हायचा असून त्यासाठी पैसे लागणार आहेत. ही कामे करण्याची संधी इंग्लंड, अमेरिका यासारख्या विकसित देशांना नाही कारण हे देश विकसित आहेत तेथे करण्यासारखे काही नाही हीच त्यांची समस्या आहे,” असे प्रतिपादन लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप ॲण्ड एक्सलन्सचे व्यवस्थापकीय संचालक अतुल राजोळी यांनी केले.
 
लघु उद्योग भारतीच्या नाशिक शाखेतर्फे ‘मुंबई तरुण भारत’च्या सहकार्याने दि. २१ मार्च रोजी राजोळी यांचे ‘सिक्रेट्स ऑफ व्हिजनरी बिझिनेस’ या विषयावरील कार्यशाळा व नूतन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ गंगापूर रोडवरील डॉ. मुंजे इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट ऑडीटोरीयाम येथे आयोजित करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी लघु उद्योग भारती विभागीय अध्यक्ष मारुती कुलकर्णी, नाशिक शाखेचे अध्यक्ष संजय महाजन, मुख्य सचिव मिलिंद देशपांडे, दै. ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार उपस्थित होते.
 
नाशिकच्या उद्योजकांसाठी एक सुवर्णसंधी ठरलेल्या या व्याख्यानात लांब पल्ल्याच्या उद्योगासाठीचा निर्धार, उद्योग वाढीच्या पाच अवस्था, उद्योग संघटन, उद्योजक नेतृत्वाचे पाच स्तर, संघटना विस्तार प्रक्रिया या व आणखी अनेक विषयावर राजोळी यांनी व्यापक मार्गदर्शन केले. जे कौशल्य उद्योग सुरु करण्यासाठी उपयोगी पडले तेच कौशल्य उद्योग वाढीसाठी उपयुक्त ठरेल असे नाही, असा इशारा देऊन त्यांनी उद्योगाचे रुपांतर व्हिजनरी उद्योगात होण्यासाठी संघटन असणे आवश्यक असल्याचे सांगितले. व्हिजनरी उद्योगात टाटा, जनरल इलेक्ट्रिक, अमूल अशा अनेक उद्योगांचे उदाहरण देत स्वामी विवेकानंद, एडिसन, सरदार वल्लभभाई पटेल आदी अनेक मान्यवरांच्या माहितीसह स्लाईडस त्यांनी दाखवीत उद्योजकांना विविध प्रश्न विचारीत बोलते करीत आपले विचार मांडले. “कस्तुरी मृगाप्रमाणे स्वतःत वेगळी ताकद, क्षमता असते. मात्र ती ओळखावी लागते. यशासाठी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे मात्र ती एकच गोष्ट कोणती ते समजणे अवघड आहे,” असे त्यांनी सांगितले.
 
उद्योजकांशी संवाद साधून उत्तरे मिळविण्याची अनोखी शैली त्यांनी विकसित केली, त्याचे दर्शन यावेळी घडले. “आपल्याला थोडे यश मिळाले की समस्या निर्माण होते. आपले चित्र चांगले दिसत असले तरी खरे काय ते आपल्यालाच माहिती असते,” असे सांगताच उपस्थितांनी त्यास दाद दिली. “उद्योगांबाबत अनेक गैरसमज आहेत. उद्योगाचे काही खरे नाही, उद्योजकाला मूल्यांशी तडजोड करावी लागते, असे गैरसमज आहेत. मोठे उद्योजक आपल्याला मदत करू शकतात. मात्र आपण त्यांना भेटले पाहिजे,” असे ते म्हणाले. आपल्याला आवडणारे काम न थकता करू शकल्यास आणि त्यात कायम प्रगती साधल्यास अद्वितीय गुणवत्ता मिळून आपण आनंदी बनू शकतो, असे त्यांनी विविध उदाहरणे देऊन स्पष्ट केले.
 
आपले मनोगत व्यक्त करताना दैनिक ‘मुंबई तरुण भारत’चे संपादक किरण शेलार यांनी सांगितले की, “अतुल राजोळी व आपण गुरुबंधू आहोत. उद्योजकतेची आज गरज असून नोकऱ्यांची स्थिती आज काय आहे हे सर्वांना माहिती आहे. उद्योजक रोजगार निर्माण करणारे असल्याने खरे राष्ट्र उभारणीस हातभार लावत असतात,” असे त्यांनी स्पष्ट केले. “उद्योजकांनी लिहिते, बोलते व्हावे,” असे सुचवून त्यामुळे आपण समाजाच्या जवळ जावू शकू, आपल्याबद्दलचे गैरसमज दूर होण्यास मदत होईल, असे सांगून उद्योजकांचा संघर्ष, त्यांची वाटचाल मांडण्यासाठी ‘मुंबई तरुण भारत’चे व्यासपीठ उपलब्ध आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शेलार यांनी केले.
 
मारुती कुलकर्णी यांनी प्रास्तविक केले. सूत्रसंचालन शुभदा देसाई यांनी केले. मिलिंद कुलकर्णी यांनी आभार मानले. कार्यक्रमास भाजप उद्योग आघाडीचे प्रदेश अध्यक्ष प्रदीप पेशकार, परिसरातील उद्योजक, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह रविराज बावडेकर, संपादकीय विभागाच्या योगिता साळवी, नाशिक ब्युरो चीफ पद्माकर देशपांडे, जाहिरात जनसंपर्क अधिकारी हेमंत चंद्रात्रे, वितरण प्रमुख शिरीष सोनवणे आदी उपस्थित होते.
 
 
लघु उद्योग भारती नाशिक शाखेची नूतन कार्यकारिणी
संजय महाजन - अध्यक्ष
मिलिंद देशपांडे – मुख्य सचिव
संजय कापडिया – उपाध्यक्ष
नरेंद्र नांदे – उपाध्यक्ष
अजय लगड – सहकार्यवाह
श्रेयस कुलकर्णी – सहकार्यवाह
कार्यकारिणी सदस्य – मिलिंद कुलकर्णी, प्रकाश भिडे, राजेंद्र कुलकर्णी (त्रिमूर्ती उद्योग), राजेंद्र कुलकर्णी (मृणाल प्रिंटर्स), प्रदीप देशपांडे, विनोद पाटील, सिद्धार्थ पाटील, योगेश बहाळकर, मेघराज पवार, अतुल देशमुख, बाळासाहेब गुंजाळ, चैतन्य महाजन, ऋता पंडित, धनलक्ष्मी पटवर्धन.
@@AUTHORINFO_V1@@