'आयुष्मान भारत'ला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2018
Total Views |

१० कोटी कुटुंबांना मिळणार अल्पदरातील आरोग्यसेवा

 
नवी दिल्ली : देशातील ५० कोटींहून अधिक लोकांना आरोग्यसेवा पुरवणाऱ्या महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत – राष्ट्रीय आरोग्य रक्षण अभियानाला केंद्रीय मंत्रिमंडळाने काल मंजूरी दिली. ही एक महत्त्वाकांक्षी योजना असून आरोग्य क्षेत्रातील हे एक महत्त्वपूर्ण व क्रांतीकारक पाऊल असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्री जगतप्रकाश नड्डा म्हणाले. या योजनेमुळे देशातील गरीबातील गरीब कुटुंबांपर्यंत कमी खर्चात आरोग्य सुविधा पोहोचणार असल्याबद्दल ऩड्डा यांनी समाधान व्यक्त केले. देशातील ४० टक्के कुटुंबांचा या योजनेअंतर्गत समावेश होणार आहे.
 
 
या योजनेनुसार प्रत्येक सहभागी कुटुंबाला ५ लाखांपर्यंतचे कव्हरेज मिळणार आहे. सर्व सरकारी रुग्णालये तसेच काही खासगी रुग्णालयांचा यात समावेश करण्यात आला आहे. गरीब कुटुंबातील व्यक्तींना अत्यल्प दरात आरोग्य सुविधा मिळण्यास यामुळे मदत होणार आहे. सध्या अस्तित्वात असलेली राष्ट्रीय स्वास्थ्य विमा योजना व ज्येष्ठ नागरिक आरोग्य विमा योजना या नव्या योजनेत समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
 
 
आयुष्मान भारत राष्ट्रीय आरोग्य रक्षण अभियान ही जगातील सर्वात मोठी आरोग्य रक्षण योजना आहे. यापूर्वी अमेरिकेत बराक ओबामा सरकारच्या काळात लागू केलेली ओबामा केअर ही आरोग्य योजना सर्वांत मोठी होती ज्यात २० कोटी लोकांना आरोग्य सुविधा मिळणार होती. मात्र आयुष्मान भारत योजनेमध्ये ५० कोटी लोकांच्या आरोग्य सुविधा व आरोग्य विम्याचा अंतर्भाव करण्यात आला आहे.
 
 
आरोग्य विभागाअंतर्गत सध्या सुरु असलेल्या सर्व योजनांना सोबत घेऊन ही योजना पुढे जाणार असल्याचे नड्डा यांनी सांगितले. त्यामुळे राष्ट्रीय आरोग्य मिशनशी ही योजना संलग्न राहणार आहे. तसेच या योजनेअंतर्गत देशभरातील कोणत्याही सरकारी रुग्णालयात उपचारांसाठी कॅशलेस उपचार मिळण्याची व्यवस्था यात करण्यात आली आहे.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@