उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचे नाव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    22-Mar-2018
Total Views |
 

 

 
मुंबई :
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी विधानसभेत केली. गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी करण्यात येत होती.
 
 
१५ ऑगस्ट १९९० रोजी जळगाव येथे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. त्यात जळगावसह धुळे आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश आहे. या विद्यापीठाला खान्देशकन्या बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी अनेक आंदोलने करण्यात आली. १९९४ मध्ये विष्णू भंगाळे आणि महेश ढाके यांनी विद्यार्थ्यांचे नेतृत्त्व करताना प्रथम अशी मागणी केली होती.
 
 
त्यानंतर यासंदर्भात पहिला प्रस्ताव १९ फेब्रुवारी, १९९७ रोजी शिवजयंतीच्या मिरवणुकीनंतर झालेल्या सभेत मराठा सेवा संघ व जिजाऊ ब्रिगेड यांनी ठरावाच्या रूपात पारित केला होता. त्यावेळी मराठा सेवा संघाचे सुरेश पाटील, सुरेंद्र पाटील, राम पवार, सुमित पाटील हे पदाधिकारी होते. जिजाऊ ब्रिगेडच्या अध्यक्षा वैशाली देशमुख यांनी त्यांच्या भाषणात हा ठराव मांडला होता आणि उपस्थितांनी त्याला अनुमोदन दिले होते. आज रितसर मुख्यमंत्र्यांनी अशी घोषणा केल्यानंतर बहिणाबाई ऊद्यानात फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.
 
 
नुकल्याच पाडळसे येथे झालेल्या लेवा पाटीदार समाजाच्या राष्ट्रीय महाअधिवेशनात या आशयाचा ठराव संमत करण्यात आला होता. या सर्व मागण्या आणि आंदोलनांचा विचार करून उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरींचे नाव देण्यात येत असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात केली. अर्थसंकल्पाच्या विभागवार चर्चेतही खान्देशातील काही आमदारांनी यासंदर्भात पुन्हा मागणी केली होती.
 
 
त्या अनुषंगाने शिक्षण विभागाच्या चर्चेला उत्तर देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यास शासन सकारात्मक असल्याचे सांगितले. यावर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी विद्यापीठाला नाव देण्याची मागणी बर्‍याच काळापासून केली जात आहे. याला कुणाचा विरोधदेखील नाही. मग याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी अशी मागणी केली.
 
 
यावर मुख्यमंत्र्यांनी खान्देशातील अनेक सदस्यांची मागणी तसेच आ .नाथाभाऊ यांच्याही सूचना आल्याचे सांगत उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला खान्देशकन्या कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्यात येईल, असे घोषित केले.
 
चौधरी परिवारात आनंद
‘उमवि’ला बहिणाबाईंचे नाव दिल्यामुळे किती सांगू मी सांगू कुणाला..., आज आनंदी आनंद झाला..., अशी आमची अवस्था झाली आहे. ही मागणी सुरुवातीपासूनच केली जात होती. खान्देशातील नागरिक, लोकप्रतिनिधी आणि शासन यांच्याप्रती आमचा परिवार माझ्या सासू पद्माबाई (बहिणाबाईंच्या नातसून) आणि माझी मुलं प्रियंका, देवेश ऋणी आहोत.
-स्मिता चौधरी
(बहिणाबाईंच्या पणतसून) बहिणाबाईंचा वाडा,
जुने जळगाव.
@@AUTHORINFO_V1@@