त्यातल्या त्यात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

काही काही प्रश्नांची उत्तरे सोपी असतात. म्हणजे उत्तरासाठी फार विचार नाही करावा लागत. उदाहरण द्यायचेच झाले तर, घरचे अन्न की हॉटेलचे अन्न ? असा प्रश्न असेल तर सहाजिकच ‘घरचे अन्न’ हे उत्तर देणे सोपे आहे. प्रवास असेल आणि जेवणाच्या वेळेला मुक्कामी पोहोचणार नसू, तर उत्तम पर्याय म्हणजे प्रवासात नेण्याजोगे पदार्थ घरून करून घेणे आणि वाटेत ते खाणे. पण प्रत्येक वेळी हे शक्य होईलच असे नाही मग बाहेर हॉटेल किंवा ढाब्यावर जेवायचे टाळता येत नाही. मग निकष लावला जातो तो हॉटेल किंवा ढाब्याबाहेर थांबलेल्या चार चाकींचा. खरं म्हणजे हा निकष फसवा असतो. ( संदर्भ इडली ऑर्किड आणि मी - ले. विठ्ठल कामत ) पण तरी हा निकष काम करतो. अशा एखाद्या ठिकाणी थांबल्यावर मेनू कार्ड मधील पदार्थांमधून निवडीचा प्रश्न उभा राहतो. मैद्यापेक्षा गहू किंवा ज्वारी बरी, असा विचार करून चपाती किंवा भाकरी आणि ती उपलब्ध नसेल तर मग तंदुरी रोटी नाईलाजाने घ्यावी लागते. मसाला पापड घ्यायचा असेल तर मग तळलेल्यापेक्षा भाजलेले पापड चांगला!
आरोग्याच्या दृष्टीने ब्रेड चांगला नाही पण तो टाळताही येत नाही. मग व्हाईट ब्रेडपेक्षा ब्राऊन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड बरा! असा विचार केला जातो. पावभाजी किंवा वडापाव या पदार्थांमध्ये लादी पाव अत्यावश्यक असतो. मग तो टाळण्यासाठी पावभाजीच्या भाजी सोबत चपाती किंवा वडा आणि लादी पाव ऐवजी साधा स्लाईस ब्रेड अशी जोडी जमवली जाते.


मध्यंतरी ‘दोन मिनिट नूडल्स’ बद्दल उठलेला धुरळा आता बऱ्याच प्रमाणात खाली बसला आहे. “नाष्ट्याला नूडल्स काय खातेस? काहीतरी हेल्दी खा” असं बजावणारी आई, लेकीने “आटा नूडल्स हैं मां” असे सांगितल्यावर समाधान पावलेली, जाहिरातीत दिसते. मग 'नूडल्स' खायची वेळ आपल्यावर आली की हात आपणहून ‘आटा नूडल्स’ कडे जातो. तीच गत ‘पास्ता’ निवडताना होते. ‘सुजी’ पास्ता वाचून गिल्ट थोडी कमी होतं!


‘पिझ्झा’ हा सुद्धा असाच एक मोहवणारा पदार्थ. त्याची भारतीय आवृत्ती म्हणजे घरची चपाती बेस म्हणून वापरणे आणि बाकी सर्व माल मसाला नेहमीच्या पिझ्याप्रमाणे! हा पदार्थ भरपूर भाज्या वापरून करता येतो ही मात्र समाधानाची गोष्ट असते! बाहेरचा पिझ्झा खायची वेळ आली तर मग ‘थीन-क्रस्ट’ त्यातल्यात्यात बरा. चीज नको सांगता येतं आणि भरपूर भाज्यांचं टॉपिंग. आपण त्यातल्या त्यात हेल्दी खाल्ल्याचं समाधान!

आपल्या ‘त्यातल्या त्यात’ चांगलं निवडण्याच्या मनोवृत्तीचा अभ्यास, विक्रेते उत्तम रीतीने करतात. पाणीपुरीच्या स्टॉलवर पाटी लागते - इथे पाणीपुरीचे पाणी बिसलेरी वापरून बनवले जाते. परवा एका वडापावच्या गाडीवर पाटी वाचली - वड्यासाठी लागणारे सर्व पदार्थ ‘ऑर्गेनिक’ आहेत आणि पाव गव्हापासून बनवलेला आहे. तळणीसाठी तेल लाकडी घाण्यावरचे आहे. 'बिसलेरी' वापरून बनवलेल्या पाण्यात, हॅण्ड ग्लोव्हज न वापरताच तो हात घालत असतो ही गोष्ट अलाहिदा!
खाद्यपदार्थ ही रोजची गोष्ट असल्याने अशी निवड पटकन लक्षात येते पण इतर अनेक उदाहरणांमध्येही आपल्याला अशी निवड करावी लागते. कोणत्याही ऍलोपॅथीच्या औषधांना साईड इफेक्टस् असतातच. त्यामुळे त्यातल्या त्यात कमी साइड इफेक्ट्स किंवा कमी तीव्रतेचे साइड इफेक्ट्स असलेली औषधे निवडली जातात.
मोबाईल विकत घ्यायला गेल्यावर खूप इच्छा असते की संपूर्ण भारतीय बनावटीचा घ्यावा. पण टिकाऊपणा, किंमत आणि आपलं बजेट यांचा विचार करून ते शक्य नाही हे लक्षात येतं. तेंव्हा ' त्यातल्या त्यात निवड करावी लागते.
आपलं मराठमोळं मन मुलांसाठी शाळा निवडतांना मराठी माध्यमाच्या शाळेला कौल देत असतं. पण कधी घरापासूनचं अंतर कधी इतरांची मतं तर कधी अन्य व्यावहारिक अडचणींमुळे ते शक्य नसेल तर किमान सेमी इंग्लिश तरी, तेही शक्य नसेल तर इंग्लिश मिडीयम अशी ' त्यातल्या त्यात ' निवड करावी लागते.

 
चित्रपट बघायला जायचं ठरतं. चांगला म्हणला गेलेला चित्रपट लागलेला नसतो. मग लागलेल्या पैकी निदान बरा अभिनेता, बरी अभिनेत्री किंवा निदान बरे संगीत लक्षात घेऊन ' त्यातल्या त्यात ' भरल्या चित्रपटाची निवड केली जाते.
‘नोटा’ चा पर्याय जेव्हा नव्हता तेव्हा दोन भ्रष्ट उमेदवार उभे असतील तर त्यापैकी एकाला निवडतांना, “पैसे खातो पण कामही करतो” हा निकष सामान्य मतदार लावत असे.
खरे सांगायचे तर ‘चांगले आणि वाईट’ असे दोन ठसठशीत पर्याय कोणत्याही बाबतीत आपल्याला फारच कमी वेळा उपलब्ध असतात. दोन वाईटांमध्ये ‘अधिक वाईट’ आणि ‘कमी वाईट’ असेच पर्याय जेव्हा समोर असतात तेव्हा ‘उडदामाजी - गोरे उडीद’ निवडण्याशिवाय गत्यंतर नसते!


- शुभांगी पुरोहित 
@@AUTHORINFO_V1@@