वीरशैव लिंगायत हा हिंदू धर्माचा अविभाज्य घटक !

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018
Total Views |


 
अ. भा. वीरशैव लिंगायत महासंघाची ठाम भूमिका, लिंगायत धर्माच्या मागणीवर केली जोरदार टीका


मुंबई : वीरशैव लिंगायत हा शैव पंथ असून मूळ हिंदू धर्माचाच एक अविभाज्य घटक आहे. मात्र, काही धर्मद्रोही लोक हिंदू धर्माची शकले करायला निघाले असून त्यातूनच वीरशैव लिंगायत समाजाचा बुद्धीभेद करण्याचा मोठा राजकीय डाव खेळला जात असल्याची टीका करत अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघाने स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मागणीला आपला ठाम विरोध असल्याचे स्पष्ट केले.

अ. भा. वीरशैव लिंगायत महासंघाचे कार्याध्यक्ष-प्रवक्ते डॉ. विजय जंगम यांनी आज मुंबई प्रेस क्लब येथे पत्रकार परिषद घेऊन महासंघाची भूमिका स्पष्ट केली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष विष्णू जंगम यांच्यासह अन्य पदाधिकारीही उपस्थित होते. स्वतंत्र लिंगायत धर्म मान्यतेचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सरकारने फेटाळल्याबद्दल महासंघाने राज्य सरकारचे अभिनंदन केले. तसेच, हा प्रस्ताव मंजूर करून तशी शिफारस केंद्र सरकारकडे करणाऱ्या कर्नाटक राज्य सरकारचा निषेधही यावेळी करण्यात आला. कर्नाटक सरकारने वीरशैव लिंगायत समाजाच्या 'व्होट बँके'साठीच हे राजकारण केले आहे. कर्नाटक विधानसभेची आगामी निवडणूक डोळ्यापुढे ठेवून 'तोडा, फोडा आणि राज्य करा' ही ब्रिटीशांची कूटनीती कर्नाटक सरकार वापरत आहे. याउलट महाराष्ट्र सरकारने हिंदू धर्मात फूट पाडण्याचे षडयंत्र हाणून पाडले असल्याचे डॉ. विजय जंगम यांनी यावेळी सांगितले.

कर्नाटक राज्य सरकारने एकतर्फी निर्णय घेतला असून कर्नाटकने याबाबत नेमलेल्या समितीत एकही वीरशैव लिंगायत समाजाचा प्रतिनिधी नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. तसेच, राज्य सरकारला धर्ममान्यतेचा अधिकार नसून त्यांनी केवळ केंद्राकडे तसा प्रस्ताव पाठवला आहे. यामुळे काहींना जणू धर्म मान्यता मिळाल्याचाच आनंद झाला आहे. मात्र, स्वतंत्र धर्माला मान्यता मिळवणे बाजारातून भाजी विकत घेण्याएवढे सोपे नसल्याचा टोला जंगम यांनी लगावला. वीरशैव हा मूळ संप्रदाय असून लिंगायत हे त्याचे पर्यायी नाव आहे. वीरशैव, जंगम, लिंगायत हे सर्व एकाच परंपरेचा भाग आहेत. ती परंपरा भगवान शिवाला मानणारी, एकेश्वरवादी असून हा हिंदू धर्माचाच एक पंथ असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.

महात्मा बसवेश्वर यांना लिंगायत धर्माचा संस्थापक म्हणणे हा काही जणांचा खोडसाळपणा असल्याचे जंगम म्हणाले. बसवेश्वर बाराव्या शतकात झाले तर वीरशैव परंपरा त्याही पूर्वीची आहे, असे त्यांनी सांगितले. वीरशैव लिंगायत समाजातील मतही स्वतंत्र लिंगायत धर्माला प्रतिकूल असल्याचा दावा करत केवळ सोशल मीडियाद्वारे लोकांची माथी भडकावण्याचा प्रयत्न स्वतंत्र धर्माची मागणी करून काही लोक करत आहेत. अशी धर्ममान्यता मिळू नये, हीच आमची ठाम मागणी असून त्यासाठी वीरशैव लिंगायत समाजात सर्वत्र जनजागृती करणार असल्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. तसेच, धर्माच्या मागणीमध्ये समाजाची वेळ, श्रम व बुद्धी खर्च करण्यापेक्षा संपूर्ण समाजाला एकत्र करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न होण्याची गरजही डॉ. जंगम यांनी यावेळी व्यक्त केली.

यामागे परकीय शक्तींचा हात !
स्वतंत्र लिंगायत समाजाच्या मागणीला बळ देण्यामागे परकीय शक्तींचा हात आहे असा आमचा जाहीर आरोप आहे. हिंदू धर्मात, जातीजातींत तेढ पसरवण्यासाठी सक्रीय असलेल्या परकीय शक्ती यामध्येही सक्रीय आहेत. अन्यथा लाखालाखांचे मोर्चे काढण्यासाठी पैसा आला तरी कुठून ?
- डॉ. विजय जंगम

कार्याध्यक्ष - प्रवक्ता
अ. भा. वीरशैव लिंगायत महासंघ
@@AUTHORINFO_V1@@