Tech भारत : रेडिओ ध्वनी लहरी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018   
Total Views |


रेडिओ ध्वनी लहरी या शब्दांनी मानवी जीवनाचे एकूणच संभाषण आणि संदेश वहनाची पद्धतीच बदलून टाकली आहे. पत्र व्यवहारापासून सुरु झालेले संदेश वहन आज एका वेगळ्या स्वरुपात बदलले आहे. अधिक गतिशील आणि जलद जबाबी बनू शकले आहे. यात सर्वात मोठा वाटा आहे तो रेडिओ ध्वनी लहरींच्या संशोधनाचा.
 
 
अधिक तांत्रिक भाषेत सांगायचे म्हटल्यास जेव्हा वायरचा शोध हा देखील अपूर्ण वाटू लागला त्यावेळी वायरलेस तंत्रज्ञानाची सुरुवात झाली ती रेडिओ ध्वनी लहरींपासून. रेडिओ ध्वनी लहरींच्या शोधामुळे नंतर आलेल्या ब्लू-टूथ, वाय-फाय, यांसारख्या संशोधनात त्यांची खूप मोठी मदत मिळाली आहे. आणि त्यामुळे जग जलद तसेच गतिशील होण्यास मदत मिळाली आहे.
 
 
रेडिओ ध्वनी लहरी म्हणजे काय ?

रेडिओ ध्वनी लहरी या विद्युत चुंबकीय लहरींचा एक प्रकार आहे. जसे वायरच्या माध्यमातून इलेक्ट्रॉन (अणु मधील एक घटक) प्रवाहित होतो तेव्हा इलेक्ट्रिक उर्जा निर्माण होते, त्याच प्रमाणे विद्युत चुंबकीय लहरींच्या प्रवाहित होण्याने रेडिओ ध्वनी लहरी तयार होत असतात.
 
 
मायक्रोवेव्ह, क्ष-किरणे, गॅमा किरणे हे देखील रेडिओ ध्वनी लहरीप्रमाणे विद्युत चुंबकीय लहरींचा उपप्रकार आहेत. मात्र या सर्वांचा उपयोग वेगवेगळ्या कारणांसाठी केला जातो. रेडिओ ध्वनी लहरींचा मुख्य उपयोग संभाषणासाठी केला जातो. यात आकाशवाणी, दूरचित्रवाणी, तसेच मोबाईल फोन यांसारख्या उपकरणांचा समावेश होतो.
 
 
विद्युत चुंबकीय लहरींना एका विशिष्ट उपकरणाद्वारे उत्सर्जित केले जाते. त्यापासून रेडिओ ध्वनी लहरी तयार होऊन त्याचे तरंग (wavelengths ), असेच वारंवारिता (frequency) ठरवून त्यांचे प्रक्षेपण केले जात असते, त्याला विद्युत चुंबकीय स्पेक्ट्रम असे म्हणतात. रेडिओ ध्वनी लहरी या विद्युत चुंबकीय स्पेक्ट्रममधील सर्वात मोठे तरंग असतात. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने स्पष्ट केले आहे की, रेडिओ ध्वनी लहरी या किमान १ मिलीमीटर ते १०० किलोमीटर एवढ्या लांब पल्ल्याच्या असू शकतात.
 
 
कुणी लावला याचा शोध.. ?

जेम्स क्लार्क मॅक्सवेल नावाच्या स्कॉटलंडच्या वैज्ञानिकाने १८७० साली विद्युत चुंबकाचा सिद्धांत मांडला होता. त्यात रेडिओ ध्वनी लहरी असू शकतात असे त्यांनी भाकीत केले होते. त्यानंतर हेन्रीच हर्डज् या जर्मन वैज्ञानिकाने मॅक्सवेलच्या सिद्धांतावर अभ्यास करून त्याचे भाकीत खरे ठरविले. त्यामुळेच रेडिओ ध्वनी लहरींचे मापन ‘हर्डज्’ या एककात केले जाते. एका सेकंदात निर्माण होणाऱ्या विद्युत चुंबकीय लहरी म्हणजे एक हर्डज् एवढे असते.
 
 
रेडिओ ध्वनी लहरींचा वापर सर्वाधिक माहिती प्रसारणासाठी केला जातो. माहिती लहरींच्या स्वरुपात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहिली जाते. सेंडर आणि रिसीव्हर ही दोन उपकरणे यात महत्वाची भूमिका बजावतात. रिसीव्हरमध्ये असलेल्या स्पिकरमध्ये जेव्हा ही लहर प्रवेश करते त्यावेळेला चुंबकीय उर्जा ही यांत्रिक उर्जेत रुपांतरित होऊन ती माहिती ऑडिओच्या स्वरुपात ऐकू येते.
 
 
रेडिओ ध्वनी लहरींमुळे संदेश वहनाची पद्धतच बदलून गेली. यामुळे संदेश वहनात जी गती प्राप्त झाली आहे त्यामुळे मानवी जीवनाला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
 
- हर्षल कंसारा
@@AUTHORINFO_V1@@