गाळेधारक आक्रमक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018
Total Views |

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे, मुंडण


 
जळगाव :
महापालिकेच्या २० मार्केटमधील गाळेधारकांनी प्रशासनाच्या धोरणांविरोधात आरंभलेल्या आंदोलनाच्या दुसर्‍या दिवशी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे देण्यात आले. काहींनी मुंडण करून निषेध नोंदविला, तर आंदोलनस्थळी भेट देऊन राजकुमार अडवाणी यांनी खाविआच्या सचिवपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.
 
 
गाळेधारकांना अवाजवी भाडे व दंडाची आकारणी, लिलावाची अन्यायकारक प्रक्रिया, प्रीमियमचे चुकीचे धोरण अंमलात आणले जात असल्याचा आरोप प्रशासनावर असून, या विरोधात बेमुदत बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. बुधवारी २० मार्केटमधील गाळेधारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे दिले. याप्रसंगी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
आंदोलनकर्त्यांसाठी लांबलचक मंडप टाकण्यात आला होता. ‘व्यापारी एकता जिंदाबाद’, ‘कोण म्हणतं देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’ अशी घोषणाबाजी चालली होती. विविध मागण्यांचे फलक आंदोलनकर्त्यांच्या हातात दिसत होते. दिवसभर विविध सामाजिक, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन गाळेधारकांना आपला पाठिंबा जाहीर केला. गाळेधारकांच्या हितासंबंधी जोपर्यंत राजकीय पदाधिकारी व प्रशासन योग्य निर्णय घेत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा इशारा गाळेधारकांच्या कोअर कमिटीचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी दिला. व्यापार्‍यांच्या हितात निर्णय घेणार्‍यांचीच सत्ता महापालिकेत आणू, असेही यावेळी सांगण्यात आले.
 
खाविआचे सचिव अडवाणींचा राजीनामा
माजी नगरसेवक राजकुमार अडवाणी यांनी सकाळी ११.३० वाजेच्या सुमारास आंदोलनस्थळी भेट देऊन गाळेधारकांच्या हितासाठी खान्देश विकास आघाडीच्या सचिवपदाचा राजीनामा देत जाहीर केले. महापालिकेत आघाडी सत्ताधारी आहे. गरज भासल्यास मनपा नगरसेवकांनीही आपल्या पदांचे राजीनामे देऊन गाळेधारकांना पाठिंबा जाहीर करावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली. अडवाणी यांचे राजीनामा पत्र दुपारी सोशल मीडियावर व्हायरल झाले.
 

भाजप नगरसेवकांची हजेरी हवी - सुनील माळी यांनी भाजप नेत्यांचा पाठिंबा असल्याचे जाहीर केले असता, गाळेधारकांच्या विरोधात कोणताही ठराव आल्यास त्याला भाजपच्या सर्व नगरसेवकांनी महासभेत उपस्थित राहून विरोध केला पाहिजे, अशी मागणी गाळेधारकांनी केली. त्यास माळी यांनी होकार दिला.

 
 आंदोलन सुरूच ठेवण्याचे आवाहन
महाराष्ट्राच्या दृष्टीने गाळेधारकांचे निर्णायक आंदोलन आहे. जळगावसारखी परिस्थिती भविष्यात अन्य महापालिका क्षेत्रातही उद्भवणार आहे. त्यामुळे आंदोलन थांबवू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली गेली. उल्हास साबळे यांनी मनपात २ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा आहे. त्याची पोलिसांनी चौकशी केली पाहिजे, अशी मागणी केली.
 
 

आज मानवी साखळी - आंदोलनाच्या तिसर्‍या दिवशी, गुरुवार २२ रोजी टॉवर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत विशाल मानवी साखळी तयार करून गाळेधारक आपला निषेध नोंदवणार आहेत. सकाळी १० वाजेपासून मानवी साखळी करण्यास सुरुवात होईल.

@@AUTHORINFO_V1@@