मेस्मा कायद्यावरून विधानसभेत गदारोळ, कामकाज स्थगित

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018
Total Views |

शिवसेना आमदार आक्रमक, शिवसेना-काँग्रेसमध्ये हमरीतुमरी

 

 
 
 
मुंबई : 'जोपर्यंत अंगणवाडी सेविकांवरील 'मेस्मा' कायदा सरकार रद्द करत नाही तोपर्यंत सभागृह चालू देणार नाही' अशी भूमिका शिवसेना आमदारांनी घेतल्यामुळे बुधवारी विधानसभेचे काम तब्बल ८ वेळा व्यत्यय आल्यानंतर अखेर दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.
 
 
राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या संपादरम्यान १२५ बालकांच्या मृत्यूंबाबत अंगणवाडी सेविकांवर लावण्यात आलेल्या 'मेस्मा'च्या मुद्द्यावरून बुधवारी विधानसभेत जोरदार गदारोळ झाला. शिवसेना आमदारांनी सातत्याने गोंधळ व घोषणाबाजी करून सभागृहाच्या कामकाजात वारंवार व्यत्यय आणला. शिवसेना आमदार वारंवार अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत तसेच अध्यक्षांच्या मंचावर चढून घोषणाबाजी करत राहिले. यामुळे सभागृहाचे कामकाज दुपारपर्यंत तब्बल ८ वेळा स्थगित करावे लागले. तसेच, याचदरम्यान शिवसेना आमदारांनी विधानसभा अध्यक्षांचा राजदंड पळवून नेण्याचाही प्रयत्न केला. मात्र, अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी तंबी दिल्यानंतर हा प्रयत्न बारगळला. याच गोंधळामध्ये कामकाज चालू ठेवण्याचा अध्यक्षांचा प्रयत्न अपयशी ठरला. तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी अखेर 'आपण सत्ताधारी आहोत याचे भान ठेवा' अशा शब्दांत शिवसेना आमदारांना तंबी दिल्यानंतरही हा गोंधळ सुरूच राहिला.
 
 
शिवसेना प्रतोद सुनील प्रभू हे मेस्मा कायद्याबाबत शिवसेनेची भूमिका मांडत असताना काँग्रेसच्या आमदारांनी त्यांना डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या शिवसेना प्रतोद सुनील प्रभू यांनी भाजप-शिवसेना सरकारऐवजी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारच्या कार्यकाळावर निशाणा साधण्यास सुरूवात केली. तसेच, मेस्मा कायदा व अंगणवाडी सेविकांच्या समस्या हे आघाडी सरकारच्या काळातील पाप असल्याची टीकाही प्रभू यांनी केली.
 
 
यामुळे काँग्रेसचे आमदारही आक्रमक झाले. काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड व सुनील प्रभू यांच्यात यावरून शाब्दिक चकमक झाली. 'आधी आमच्यासोबत असलेले वाघ आता शेळी का झाले आहेत' अशा शब्दांत सुनील प्रभू यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. यामुळे काँग्रेस सदस्यही अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत उतरून घोषणाबाजी करू लागले. अशाप्रकारे शिवसेना-काँग्रेस आमदारांच्या एकत्रित गोंधळात कामकाज चालवणे अशक्य झाल्याने तालिका अध्यक्ष योगेश सागर यांनी दुपारी ३.२० च्या सुमारास कामकाज उर्वरित दिवसभरासाठी स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा केली.
 
 
 
विधानपरिषदेचे कामकाजही तहकूब
 
 
बुधवारी विधानपरिषदेच्या कामकाजादरम्यान अंगणवाडी सेविकांवरील मेस्मा सरकार रद्द करत नाही तोपर्यंत सभागृह आम्ही चालू देणार नाही, असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिला. दरम्यान विरोधकांच्या जोडीला सत्ताधारी शिवसेनेचे सदस्य अनिल परब यांनीदेखील हा मुद्दा उचलून धरत मेस्मा रद्द करण्याची मागणी केली. त्यामुळे गोंधळात सभापतींनी सभागृहाचे कामकाज चार वेळा तहकुब केले. त्यानंतरही विरोधी पक्षाने गोंधळ सुरू ठेवल्याने सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
 
दरम्यान, संपकाळात १२५ बालकांचा मृत्यू झाला म्हणून अंगणवाडी सेविकांवर मेस्मा लावण्यात येणार असेल तर जुलै २०१७ ऑगस्ट २०१७ मध्ये झालेल्या १४०० आणि १२०० बालकांच्या मृत्यूला जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल मुंडे यांनी केला. सरकारी कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दिल्यानंतरच त्यांना मेस्मा लावावा, अशी मागणी त्यांनी केली. विधानपरिषदेतील शिवसेनेचे सदस्य अनिल परब यांनीदेखील अंगणवाडी सेविकांवरील मेस्मा रद्द करण्याची मागणी केली.
 
अंगणवाडी सेविकांचे आंदोलन ही शोकांतिका
ज्या अंगणवाडी सेविकांमुळे राज्यातील कुपोषण कमी झाले त्या अंगणवाडी सेविकांना आंदोलन करावे लागते ही मोठी शोकांतिका असल्याचे मुंडे यावेळी म्हणाले. २१ दिवस आंदोलन सुरू असल्यानंतर त्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत परंतु खाजगी कंत्राटदारांचे पैसे आणि त्यांचे बिले तात्काळ दिली जातात. असे असताना अंगणवाडी सेविकांची बिले सहा महिन्यांपासून का रखडवली जातात असाही सवाल मुंडे यांनी यावेळी केला.
 
 
कुपोषणमुक्त महाराष्ट्रासाठीच 'मेस्मा' कायदा
'कुपोषणमुक्त महाराष्ट्र' करण्यासाठीच अंगणवाडी सेविकांना मेस्मा कायदा लागू करण्यात आला असून त्याबाबत चर्चा करण्यासाठी बैठक घेऊ, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज विधानसभेत निवेदनाद्वारे केले. पंकजा मुंडे म्हणाल्या की, या कायद्याबाबत बैठक घेऊन संघटनांचे म्हणणे ऐकून घेऊ. गेल्या वर्षी राज्यात अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या काळात मागण्या मान्य झाल्यानंतरही काही संघटनांनी संप सुरुच ठेवला होता. त्यामुळे बालकांच्या पोषण आहारावर परिणाम झाला होता, असेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्या मान्य करण्यात आल्या असून सर्वात महत्वाची, मानधन वाढीची मागणी पूर्ण केली आहे. त्याचबरोबर वयाची अट देखील वाढवण्यात आली आहे. माता व बालकांना वेळेवर पोषण आहार देण्याचे काम अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून केले जाते. त्यामुळे कुपोषण मुक्तीसाठीच मेस्मा लावण्याचा निर्णय घेतल्याचे पंकजा मुंडे यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@