उच्च शिक्षणात भारतीय मूळ चिंतनाचा अंतर्भाव व्हावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018
Total Views |

भारतीय विचार मंच आयोजित चर्चासत्रात प्रा.मुरलीधर चांदेकर यांचे प्रतिपादन

 
 
जळगाव :
पूर्वीच्या काळी असलेले गुरुकुलातील शिक्षण हे संस्काराचे होते तर आताचे दिले जाणारे शिक्षण रोजगाराचे असून गुरुकुल ते कुलगुरु या प्रवासाचे गांभिर्याने चिंतन होऊन भारतीय दृष्टिकोनातून शिक्षण देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.मुरलीधर चांदेकर यांनी केले.
 
 
भारतीय विचार मंच, जळगाव यांच्या वतीने मंगळवार, २० मार्च रोजी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘भारतीय दृष्टिकोनातून उच्च शिक्षण’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.चांदेकर बोलत होते. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील अध्यक्षस्थानी होते. मंंचावर एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ.शशिकला वंजारी, ‘ऑर्गनायझर’ या नियतकालिकाचे संपादक प्रफुल्ल केतकर, रा.स्व.संघाचे अ.भा.प्रचारप्रमुख डॉ.मनमोहन वैद्य होते.
 
 
उद्घाटनानंतर प्रफुल्ल केतकर यांनी बीजभाषणात अभारतीय दृष्टिकोनाच्या शिक्षणाने भारतात शिक्षणाचे विखंडन झाले असे सांगून समाजात भेद आणि भिंती उभारण्याचे काम केले गेले. त्या पाश्वभूमीवर भारतीय दृष्टिकोनातून शिक्षण दिले गेले तर एकात्मता निर्माण होईल. कारण भारतीय दृष्टी ही एकात्मिक आहे, असे मत व्यक्त केले. या सत्राच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य व्ही.व्ही.भास्कर होते.
 
 
डॉ.चांदेकर म्हणाले की, समाजाची गरज पूर्ण करण्याची ताकत फक्त शिक्षण क्षेत्रात आहे. समाजाचा विचार हा शिक्षणात झाला पाहिजे. अभ्यासक्रम कालबाह्य झाला तर बदलता येतो, मात्र शिक्षक कालबाह्य झाले तर काय करणार ? असा सवाल करुन त्यांनी बदलत्या प्रवाहात शिक्षण प्रणाली बदलण्याची गरज व्यक्त केली. कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी भारतीय संस्कृतीचा उल्लेख करुन प्राचीन काळात मोठया प्रमाणात शोध लागले होते. मात्र आता मूल्यहिनता आणि संस्कारहिनता वाढीला लागली असून भारतीय जीवनमूल्यांची निकड असल्याचे सांगितले. संयोजक प्रा.विजय लोहार यांनी प्रास्ताविक केले. प्रा.जयेंद्र लेकुरवाळे यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ.अविनाश बडगुजर यांनी आभार मानले. दुपारच्या सत्रात डॉ.मनमोहन वैद्य यांचे व्याख्यान झाले. त्यानंतर डॉ.मुरलीधर चांदेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्राचार्य डॉ.सुभाष राणे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच डॉ.शशिकला वंजारी यांच्या उपस्थितीत व प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली ‘उच्च शिक्षणाच्या बदलत्या प्रवाहात प्राध्यापकांची भूमिका’ या विषयावर गटचर्चा झाल्या. सायंकाळी डॉ.शशिकला वंजारी यांच्या उपस्थितीत व प्र-कुलगुरु प्रा.पी.पी.माहुलीकर यांच्या अध्यक्षतेखाली चर्चासत्राचा समारोप झाला. प्रा.विजय लोहार यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.जयेंद्र लेकुरवाळे यांनी आभार मानले. या चर्चासत्रात उमवि परिक्षेत्रातील सुमारे ३२५ प्राचार्य, प्राध्यापक उपस्थित होते.
 
@@AUTHORINFO_V1@@