आतातरी राजीनामे खिशातून बाहेर काढा, विखे-पाटील यांची बोचरी टीका

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    21-Mar-2018
Total Views |
 
 
 
 
मुंबई : सत्ताधारी पक्ष असूनही शिवसेनेचे आमदार विधानसभेत गोंधळ घालतात. ही जनतेची सरळसरळ दिशाभूल आहे. त्यामुळे, शिवसेनेच्या मंत्र्यांनी आतातरी खिशातील राजीनामे बाहेर काढून सरकारच्या तोंडावर फेकावेत, अशी बोचरी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शिवसेना मंत्री व आमदारांवर केली.
 
अंगणवाडी सेविकांवर लावलेल्या मेस्मा कायद्याला विरोध करत शिवसेना आमदारांनी विधानसभा सभागृह बंद पाडले. या पार्श्वभूमीवर विधानभवनातील पत्रकार परिषदेत विखे-पाटील यांनी बोलताना शिवसेनेवर सडकून टीका केली. ते म्हणाले की, राज्याच्या मंत्रीमंडळात शिवसेनेचे मंत्री बसतात. सर्व निर्णयांचे प्रस्ताव मंत्रीमंडळापुढे जातात आणि तिथे मान्य होतात. आणि त्याच निर्णयांवर शिवसेनेचे आमदार सभागृहात गोंधळ घालतात. हे निर्णय घेतले गेले तेव्हा शिवसेनेचे मंत्री झोपले होते का? असा सवाल विखे यांनी केला. ही जनतेची साफ दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे आतातरी शिवसेना मंत्र्यांनी राजीनामे खिशातून बाहेर काढून सरकारच्या तोंडावर फेकावेत असा टोला त्यांनी लगावला.
 
आम्ही चर्चेला तयार होतो मात्र सत्तारूढ पक्षानेच विधानसभेत गोंधळ घातला. मेस्माच्या नावाखाली शिवसेनेची नौटंकी असल्याचे विखे-पाटील यांनी सांगितले. विधीमंडळातील पुढील धोरणाबाबत विरोधी पक्षांच्या गटनेत्यांची उद्या बैठक बोलावली असून त्यानंतर अधिवेशनाबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचेही विखे-पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले.
 
@@AUTHORINFO_V1@@